सहस्र दीपालंकार सेवेसाठी लावलेल्या निरंजनांचा मंद प्रकाश, धुंद करणारा पारंपरिक फुलांच्या हारांचा पसरलेला सुगंध, गायकवृंदांनी गायलेल्या संस्कृत व तमीळ रचनांचे स्वर, गोट्टवाद्यम् व नागस्वरम्च्या वाद्य संगीतानं भारलेला स्थापनामंडप शेकडो तमीळ तेवरांचं सस्वर स्तोम व वेदॠचांचे ‘पठण’, यज्ञवेदीतून निघणाऱ्या आरोग्यकारक धुराचा सुगंध. पानं व द्रोणातून वितरित केला जाणारा स्वादिष्ट व स्वास्थ्यप्रद प्रसाद हे सारे अगदी कल्पनेतलं वाटलं तरी ते आहे वास्तव! वार्षिक ब्रह्मोत्सवाचं! ठिकाण आहे तामीळनाडूतले तंजावर व मंदिर आहे तब्बल १,३०,००० टन एवढा संपूर्ण गॅ्रनाइट वापरून ८१ टन वजनाच्या दगडी एकसंध कळसाला उन्हापावसात समर्थपणे पेलत असलेलं ६३ मीटर उंचीचं भव्य शिखर असलेलं तमीळ शिल्पकला व दक्षिणेतील सुवर्णयुगाची अखंडपणे साक्ष देत असलेलं बृहदीश्वर मंदिर!
तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिचीच्या हवाई अड्डय़ापासून फक्त ६० कि.मी. दूर, चेन्नईपासूनचं अंतर ३२२ कि.मी. व चेन्नई तिरुची रल्वे मार्गावरच्या तंजावर रेल्वे स्थानकापासून फक्त १.५ कि.मी. लांब असलेलं ‘राजराजा तिरुवाईल वा थंजाई पेरिया कोईल म्हणजेच बृहदीश्वर मंदिर (Big Temple) हे राजराजेश्वर चोल राजानं १०१० साली पूर्णत्वाला नेलं व तिथं नायक व मराठा राजांनी अनेक उपमंदिरं बांधली व या मंदिराच्या भव्यतेत अधिक भर टाकली. ३,२०,००० कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या विस्तीर्ण शिवगंगा किल्ल्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या या मंदिराच्या पूर्व व पश्चिमेला खंदक तसेच अभेद्य तटबंदी आहे. तर दक्षिणेकडे अनाईकट कालवा व उत्तर दिशेला शिवगंगा उद्यान आहे. तंजावर शहरातून बृहदीश्वर मंदिराकडे जातानाच इथली सुबत्ता, शिस्त, संस्कृतीबद्दल आस्था जाणवते व या लोकांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देणारे सरल, बकुल, चंदन व प्रवाळ, इ. सदाहरित व बहरलेले वृक्ष जागोजागी दाटीवाटीने असलेले स्वागत करतात.
या भव्य दिव्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी केरलांभकन तिरुवाईल नावाच्या प्रथम गोपुरातून आत जावं लागतं. याचा तळभाग कोरीव दगडांचा असून वरचा भाग विटा व वज्रलेपी चुन्याचं प्लास्टर आहे. हे प्रथम गोपूर दूरूनच चटकन नजरेत भरणारं वा आकर्षित करणारं आहे. राजराजा तिरुवाईल हे दुसरं गोपूर त्यानंतर लागतं. ते ९० फूट उंचीचं व तीन मजली असून त्यावर पुराणकथा, कल्याणसुंदर (शिवपार्वती) व मरकडेय ॠषींचे यमापासून रक्षण करणारा शिव अशा अनेक मूर्ती आहेत. त्यानंतर ५०० फूट ७ २५० फूट क्षेत्रफळावर आतले प्राकार दिसतं. त्याच्या संरक्षक भिंतीला मंडप असून त्यात राजा सरफोजींनी १०८ शिवलिंग स्थापन केली आहेत. या विस्तीर्ण अशा प्रांगणात आल्यावर नजरेत भरतो तो महानंदीचा मंडप. काळ्या रंगाच्या तकतकीत १६ तुळयांच्या आधारावर हा मंडप असून त्यात सुमारे २५ टन वजनाचा १२ फूट उंची, ८ फूट रुंदी व २० फूट लांबीचा विशिष्ट प्रकारच्या दगडाचा अजस्र नंदी मुख्य मंदिराकडे पाहात बसला आहे. एवढा मोठा असून तो दक्षिणेतला नं. २ चा नंदी आहे. यासाठी बनविलेला मंडप अत्यंत देखणा व देव्हाऱ्यासारखा वाटतो. इथून पुढे सुरू होते ती कलात्मकता व भव्यता! मुख्य मंदिर प्रांगणात पश्चिमेला असून येथून मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेली गणेश व मुरुगन (सुब्रह्मण्यम्) अशी दोन उपमंदिरे आहेत. यातलं मुरुगन मंदिर नायक राजानं तर भव्य प्रदक्षिणा मार्ग हा सरफोजी राजांनी बांधला. मुख्य मंदिराच्या उत्तरेला चंडिकेश्वर तर नंदी मंडपाच्या उत्तरेला पार्वती अम्मन मंदिर आहे. पश्चिम दिशेकडे मुख्य मंदिर व अष्टदिकपाल व परिवार देवतांची अशी एकूण ३६ उपमंदिरं आहेत.
७९३ फूट ७ ३९७ फूट क्षेत्रफळावर मुख्य मंदिर असून ते पूर्णपणे दगडी आहे. सुमारे १५ फूट उंचीच्या पायऱ्या चढून मुख्य मंदिरात गेल्यावर अजस्र पाषाणात कोरलेल्या खांबांनी बनलेला महामंडप, अंतराळ मंडप, आराधना मंडप, मुख्य मंडप व नटराज मंडप असे सहा भाग आहेत. महाद्वारातून प्रवेश केल्यावर गर्भगृहासमोर अठरा फूट उंचीचे विराट आयुध पुरुष द्वारपाल व योद्धे यांच्या दगडी मूर्ती आपल्यावर करडी नजर ठेवून असतात. थोडं पुढे सरकल्यावर नजर आपोआप स्थिर होते ती १३ फूट उंचीच्या काळ्याकभिन्न पण ते अत्यंत तेजस्वी विशेष जातीच्या पाषाणात कोरलेलं महाशिवलिंगावर जे अदवल्लन (नृत्यात तरबेज) अशा मूळ चिदम्बरमच्या नटराज मंदिराच्या धर्तीवर बनविण्याचा उल्लेख सापडतो. हे महाशिवलिंग कमळाच्या पाकळ्यांनी बनलेल्या श्रीपीठावर स्थित असून श्रीपीठाचा वरचा भाग ऊध्र्वमुखी पद्म ६० फूट परिघाचं व ६ फूट व्यासाचं व त्याचबरोबर एक कोरीव गोमुख हे सर्व एका दगडात कोरलेलं जाणवतं. हे शिवलिंग म्हणजे ‘राजराजेश्वर मुदिय परमस्वामी’ म्हणजे इथली मुख्य देवता! या गर्भगृहावर असलेलं मुख्य शिखर १५ फुटांहून अधिक उंचीच्या उपपीठावर तब्बल तेरा मजल्याचं ६१ मीटर (२१६ फूट) उंचीचं मोठय़ा दिमाखात उभं असून मुख्य शिखराच्या चारशे दिशांना दगडी नंदी बसवलेले आहेत. या मुख्य शिखराची प्लिंथ ४६ मीटर ७ ३१ मीटर ऐवढय़ा भूभागावर आहे. हेच शिखर ‘दक्षिणमेरू’ म्हणून ओळखले जाते. या मुख्य शिखराखाली मजबूत दगडी खांबामध्ये स्थित दोन मजली गर्भगृह असून त्याच्या दोन भिंती वरील अवाढव्य बांधकामाला आधार देऊन त्याचं वजन पेलतात. या दोन भिंतींमधील मोकळ्या मार्गामध्ये भिंतींवर रुद्रमूर्ती दशभुजा शिव व चोल कालातील अत्युत्तम रंगचित्र असल्याचं आढळलंय. हे गर्भगृह मुख्य शिखर म्हणजे विमान, महाशिवलिंग हे सर्व अद्भुत वास्तुकलेचा दुर्मिळ आविष्कार मानले जातात. या मुख्य मंदिरात भरतनाटय़म्च्या १०८ नृत्यस्थिती मोठय़ा शिलाखंडात कोरलेल्या आढळतात. मुख्य शिखराचा कळस सोन्याने मढवलेला असून त्यावर मराठा राजांच्या नावांचा उल्लेख आहे व पुढील काळात परदेशी आक्रमण होणार असल्याचं भाकीत करणाऱ्या आकृतीशी आहेत. हा सुवर्णकलश (कळस) १२ फूट उंचीचा असून त्याला एक आगळी तकाकी वा चमक आहे. मुख्य शिखर म्हणजेच श्रीविमानावर कोरलेली लाखो शिल्पं व आकृती तसेच पुराणकथा टिकावी म्हणून विशिष्ट माती व चुन्याच्या मिश्रणाचा थर लावलेला असल्यामुळे या शिखराचा रंग खूप भावतो.
अशा या सुमारे १००० वर्षांपूर्वीच्या अप्रतिम कलेच्या नमुन्याची दखल तंजावरचं बृहदीश्वर, दारासुरम्चं ऐरावतेश्वर व गंगाई कोंडा चोलेश्वर या तीन चोल मंदिरांची दखल घेऊन या तिन्ही मंदिरांना २००४ मध्ये युनेस्कोने The Great Living Chola Temples या शीर्षकाखाली World Heritage Sights चा दर्जा देऊन इथल्य कलेचा सन्मान, कदर केली आहे.
हे मंदिर पाहताना प्रकर्षांनं एक जाणवतं की वास्तू व वैदिक शिल्पशास्त्राला समर्पित स्थपति व मूर्तिकार तसेच इतर कारगिरांनी कलेबरोबर अध्यात्म साधनाही केली असावी. देवतांना मनुष्यरूपात दाखविताना त्या देवतांद्वारे अध्यात्मिक संदेशही अभिव्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. मीर्तीची दृष्टी, भुवया, शारीरिक स्थिती व त्यांची आयुधं तसेच अलंकार हे सर्व पाषाणात घडविताना कारागिरांची सौंदर्यदृष्टी, आध्यात्मिक पाश्र्वभूमी, त्यांचं शिक्षण व भक्ती या गुणांचं प्रकटीकरण होताना स्पष्टपणे जाणवतं.
मुळात दुर्धर त्वचारोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी गुरूंच्या आज्ञेनुसार शिवमंदिर बनविण्याचा संकल्प या राजांनी सोडला होता, असं तज्ज्ञ व वयोवृद्ध व्यक्ती सांगतात. म्हणून या मंदिराचं बांधकाम साधं पण अतिभव्य, नेटकं व प्रमाणबद्ध असं झालं व अवघ्या आठ वर्षांत ते पूर्णत्वाला नेलं गेलं. मंदिराच्या रचनेत व प्रत्येक भागावर राजांच्या बुद्धिमत्तेची छाप दिसते. एवढेच नव्हे तर स्थापत्य शिल्प, शास्त्र व वास्तू साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्थांचं सूसंचालन, परदेशनीती, दूरदृष्टी, पराक्रम, नौदलावर हुकमत, प्राचीन भारतीय परंपरांबद्दल आस्था व दृढ विश्वास आणि सर्वात म्हणजे कर्तव्यदक्षता, प्रजाहितैषी राज्यकारभार या सर्वाबरोबर पल्लवांच्या कलेचा वारसा पुढे नेऊन राजराजेश्वर राजानं आपला सर्वकालीन श्रेष्ठतम आदर्श निर्माण केला. इथं मंदिराची व परिसराची उत्तम देखभाल व स्वच्छता एवढंच नव्हे ब्रह्मोत्सवाबरोबरच शिवरात्री, आद्र्रादर्शन, तैपूशम, मासी मघम्, स्कंदषष्ठी व विनायक चतुर्थी तसेच राजराजेश्वर जयंती अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते. आगम शास्त्रातील निर्देशानुसार इथले शैव ब्रह्मवृंद सर्व धार्मिक विधी व सोपस्कार अत्यंत तळमळीने पार पाडत असतात.
इथली कलाकुसर, कारागिरी, राज्यकर्त्यांचं समर्पण व भक्ती तसंच संकल्पशक्ती या सर्वाची प्रचीती घेत आपण जेव्हा मंदिराबाहेर पडतो तेव्हा ही शिल्पं मनात रेंगाळत राहतात व अनेक अनुत्तरित प्रश्नही गर्दी करतात. इथल्या सारपल्लम या चार कि.मी. अंतरावर असलेल्या गावातील दगडांच्या खाणीतून ८१ टन वजनाचा अवाढव्य दगड इथपर्यंत कसा आणला असेल? तो कळसासाठी २१६ फूट एवढय़ा उंचीवर सुरक्षितपणे चढवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान त्या काळात वापरलं असेल? शिवलिंगासाठी वापरलेला विशिष्ट जातीचा एवढा मोठा रत्नसदृश दगड तोही एकसंध, देशाच्या कुठल्या भागात सापडला असेल, त्यावर गंधाचे कायमस्वरूपी पट्टे मारण्यासाठी कोणतं गूढ रसायन वापरलं असेल? तीन मजली व ९० फूट उंचीचं, दिवसभरात कधीही सावली न पडणारे गोपूर बांधताना कोणतं वैज्ञानिक तत्त्व वापरलं असेल? कोण ते वैज्ञानिक ज्यांच्याकडे अशी दिव्य शक्ती व बुद्धी होती?