मा झ्या आठवणीतील गाव म्हणजे अलिबाग तालुक्यातील नागाव. अलिबाग तालुक्याला अष्टागर म्हणत. आठ गावांचा समुदाय. पूर्वी येथे खाडीत साखरेची दोन गलबते बुडाली होती म्हणून तिला साखरखाडी नाव पडले. खाडीवर पूल नव्हता तेव्हा आक्षीतून अलिबागला एक आणा देऊन तरीतून जावे लागे. पुढे आक्षीचा खांब, नंतर माझे नागाव. काय त्याचा डौल सांगावा, ना नावाची पर्वा, ना सृष्टिसौंदर्याचा गर्व, नावच त्याचे नागाव. गावाला शिवकालीन, पेशवेकालीन काय डौल. त्या गावाला ना भय, ना चिंता. भीमेश्वर ते नागेश्वर या दोन सुरांनी गावाच्या सीमेवर ठाण मांडून गावाच्या रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. देवळासमोर तळी तशीच आहेत, आजूबाजूच्या वस्त्या वाढलेल्या आहेत. पण देवळाचे पावित्र्य राखले आहे. एका बाजूला सागर ‘खबरदार, कोणी गावाकडे वाकडी नजर फिरवील तर,’ असे गर्जून बजावत होता, तर दक्षिणमुखी देवी दक्षिणेकडे करडी नजर ठेवून होती. समुद्राकडे जाताना दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते. त्यात वाल, चवळी, मूग, मटकी, राजगिरा पेरलेला असायचा. मध्ये एक सामुदायिक विहीर होती त्यावर रहाटगाडगे बसवलेले, ते पायाने चालविले जायचे. ओल्या वालांच्या शेंगांची उसळ व मडक्यातील पोपटीची मजा काय सांगू, खाण्याच्या अनुभवाशिवाय नाही कळणार. समुद्राकडे जाताना पाऊल पाऊल वाळू तुडवून जावे लागे. त्याच्या बाजूला घर होतं. तिला बंदरवाडी म्हणत. माझ्या आजीच्या बहिणीचे घर तिथे होते. तिच्याकडे जाताना बलगाडी नसली तर वाळूतून जावे लागे. आता वाळू गायब झाली. कुठे गेली असेल एवढी वाळू? मी विचार करू लागले. समुद्राच्या वाळूवर सीतामाई सुंदर रांगोळ्या काढायची, असे आम्हाला सांगितले जायचे. त्या पाहण्यात खूप मजा यायची. नंतर कळले, निरनिराळे किडे वाळूतून इकडून तिकडे जाताना त्या कलाकृती तयार होत असत. मला त्या समुद्राची दया आली. घोडे, उंट, घोडागाडय़ांची गर्दी होती, माणसांचा कोलाहल नुसता. समुद्राचा रंगही बदलल्यासारखा वाटला. निळा निळा  रंग कोठे गेला, वर निळे आकाश आणि खाली निळेभोर पाणी. अहाहा, काय ती शोभा! समुद्रावर उभे राहिले की समोर दिसे तांदूळखाद्या खडक. तिथे म्हणे एक तांदळाचे गलबत बुडाले होते म्हणून त्याला तांदूळखाद्या म्हणत. आता तिथे दीपगृह आहे. समुद्राकडे तोंड करून उभे राहिले की उजव्या हाताला खांदेरी डोंगर व डाव्या हाताला उंदेरी, गमतीने आम्ही गाणे म्हणत असू. ‘खांदेरी-उंदेरी ह्या दोन्ही जावामध्ये कुलाबा घेत हवा’ कुलाब्याचा किल्ला हो, जंजिरा म्हणजे पाण्यात बांधलेला आहे. ओहोटी असेल तेव्हा चालत जाता येते. पण भरतीच्या वेळी होडीने जावे लागते. ओहोटीच्या वेळी नागावहून किनाऱ्याने अलिबागपर्यंत चालत जाता येते.
आता आमचे घर म्हणाल तर ते आहे खालच्या आळीत. ही आळी शंभर घरांची होती. मध्ये रस्ता आणि दोन्ही बाजूला घरे-वाडी, शेते अशी रचना. आमच्या घराच्या भोवती पक्का सिमेंटचा कोट. घराच्या मागे-पुढे शेणाने सारवलेले अंगण. मागच्या अंगणात तुळशी वृंदावन. दिवाळीनंतर तुळशी वृंदावन कावेने रंगविले जायचे. त्यावर भेंडीच्या ठशांनी डिझाईन काढले जायचे, जणू साडी व त्यावरील बुट्टे सुंदर दिसायचे. तुळशी वृंदावन हिरव्यागार झाडांनी मोहरलेले असायचे. हिरव्या बांगडय़ा, काळी पोत त्यामुळे ते अधिक नयनरम्य दिसायचे. मग यथावकाश गुरुजींना विचारून मुहूर्तवेळ ठरवायची. तोपर्यंत घरात फराळाचे पदार्थ व्हायचे. साजूक तुपातला बदाम-बेदाणा, केशर घातलेला शिरा हवाच. करंज्याही पाहिजेत. या वेळी ओल्या नारळाच्या करंज्या व्हायच्या. शेव, चकल्या, शंकरपाळे, चिवडा असे सर्व पदार्थ भरलेले ताट नवेद्याला असायचे. तसेच एक ताट गुरुजींना द्यायचे. १०-१२ वर्षांचा मुलगा हातात बाळकृष्ण घेऊन लग्नासाठी उभा करायचा, मंगलाष्टके म्हणून लग्न पार पडायचे. जमलेल्या बायकांना हळदी-कुंकू, साखर किंवा पेढा-वडी दिली जायची, तर सर्व लहान मुलांना फराळाचे पदार्थ, असा लग्नाचा थाट. आता वाडीतील झाडांच्या कैऱ्या, आवळे, चिंचा, शेतातील बोरं आलेली असायची. मग काय, रोज शाळेतून आल्यावर दुपारी मेजवानी. आम्ही बहिणी कैऱ्या चिरूर त्यात मोलकरणीकडचा ताजा मसाला घालून पोटभर खायचो, आत्यासुद्धा डोळा मिटून ‘आंबट गं आंबट’ म्हणत चार फोडी खायची. त्यावेळी एवढे ‘व्हिटामिन सी’ खाल्ले की ते आतापर्यंत पुरते आहे.
माझ्या लहानपणी म्हणजे १० वर्षांपर्यंत आमचे जुने मातीचे घर होते. स्वयंपाकघर, माजघर, चार बाजूंना पडव्या, वरची ओटी, खालची ओटी, कोठार माळा होता. नंतर माझ्या वडिलांनी पाया व ढांचा तोच ठेवून पक्क्या विटांचे, सिमेंटचे घर बांधले. माळा उंच करून माडी केली. घराला माझ्या आजीचे अन्नपूर्णा हे नाव दिले. स्वयंपाकघराची रचना अशी होती की, घराच्या वेशीपर्यंत नजर जायची. त्याला एक मोठी खिडकी होती. ओटीवरच्या झोपळ्यावर बसलेला पाहुणा स्वयंपाकघरातून दिसे. माडीवर घराच्या पुढच्या बाजूस गॅलरी, मग मोठा दिवाणखाना, स्वयंपाकघराच्या वरच्या माडीवर साठवणीचे धान्य ठेवण्याचे तांबा-पितळेचे हंडे, तपेल्या. त्या एवढय़ा मोठय़ा असायच्या की, त्यात आम्ही लपत असू. घर रस्त्यालगत असल्यामुळे सतत आला-गेला असायचा. िदडी दरवाजा लोखंडाचा, बाजूला बलगाडीसाठी लाकडी कवाड, उजव्या हाताला म्हशींचा गोठा, डाव्या हाताला बलांचा गोठा, विहीर. नंतर वाडी व पुढे शेत. वाडीत आंबा, चिंच, रिठा, बांबू, केळी यांची झाडे. विहिरीजवळ पाणी साठवण्याची टाकी. त्याच्या बाजूला गरम पाणी तापवण्यासाठी चूल, त्यावर तांब्याचे तपेले, पाणी काढण्यासाठी ओगराळ. शेतात चार महिने तांदूळ व आठ महिने कडधान्य, भाज्या, वाल, चवळी, मूग, मटकी, राजगिरा, कोिशबीर, लाल-हिरवा माठ, पोकळा होत असे. वडील आजारी पडले, आम्ही चौघी बहिणींची लग्ने झाली, काकू-आत्याही नव्हत्या. त्यामुळे शेतजमिनी कुळ कायद्यात गेल्या.
त्या वेळी भल्या पहाटे घरोघरी जात्यावर ओव्या म्हणून पिठे दळली जायची. पापड, कुरडया, सांडगे घरोघरी व्हायचे. दक्षिणेकडील पडवीत उखळीत पोहे कांडले जायचे. चुलीवर आई मोठय़ा पातेल्यात पेंढय़ांचा दादरा बांधून आत पाणी उकळत ठेवून फेण्या करायची. त्याच्याशी साईचे दही. काय मजा असायची! घरच्या साळीच्या लाहय़ा, राजगिराच्या लाहय़ा, फोडलेले हरभरे, वाल, कुरकुरीत पोहे हे खायची मजा औरच! आम्हाला ओल्या नारळाची चटणी खूप आवडायची, अगदी रोजसुद्धा. कधी मोठय़ा बायकांना चटणी वाटायचा कंटाळा आला की म्हणत, ‘हवी असेल तर वाटून घे’. मग झाले, आम्ही नारळ खवून, कधी चिंच, कधी आवळा, कधी कैरी, कधी लसूण-कोिथबीर घालून पाटय़ावर वाटलेली चटणी पाच मिनिटांत तयार आणि स्वत: केल्याचा आनंद काही वेगळाच असायचा. पोहे तर केव्हाही होत. कोळाचे पोहे, फोडणीचे दडपे तर कधी कांदा- कोिशबीर, ओले खोबरे, कच्चे तेल घालून केले जात. आजीचा कायदाच होता, मी पोहे मागितले की तिला नाही म्हणायचे नाही. दाराशी शेत आहे व वाडीत नारळ आहे. बाजारातून काही आणा, असे तर नाही ना. मग काय माझी मान ताठ.
ओटीवर चार महिने पुराण होत असे. पुराणिक बुवा पोथी घेऊन यायचे. त्यांना बसायला पाट, टेकायला पाट, पोथी ठेवायला चौरंग, त्याच्या बाजूला रांगोळी, आळीतल्या बायका ऐकायला यायच्या. भिक्षेकरी फार क्वचितच येई. त्यांना तांदूळ दिले जात. म्हैस असल्यामुळे दूध-दुभते भरपूर, ताक मागायला लोक येत. घरापुरते ताक ठेवून बाकीचे सर्व  दिले जाई.
माझी आजी तशी ठेंगणी-ठुसकी, गहुवर्णाची, सदा आनंदी, हसरी, पांढरे स्वच्छ लुगडे, डोक्यावरून पदर घेतलेली. ती लाल अलवण कधी नेसली नाही. मला आजी आणि अत्याचा खूप लळा असल्यामुळे मी नागावला राहायचे. माझ्या वडिलांनी पुढाकार घेऊन गावात इंग्रजी शाळेचे चार वर्ग सुरू केले. त्याच्या पायाभरणीसाठी सर्वपल्ली राधाकृष्णन आले होते. लोकांकडून देणग्या मिळवून एसएससीपर्यंत शाळा सुरू केली. एक वर्ग माझ्या आजोबांच्या नावाने बांधला. ते सक्रिय कार्यकत्रे होते. पुढे ते आजारी पडल्यामुळे काही करू शकले नाहीत.
माझ्या वडिलांच्या लहानपणापासून आमच्याकडे एक गडी होता. त्याचे नाव राम. खाली लुंगीवजा धोतर व अंगात एक जाकीट. बारा महिने हाच त्याचा पोशाख. खूप प्रेमळ होता तो. घरचे काम करीत असे आणि आम्हाला रामायणातील, महाभारतातील गोष्टीही खूप रंगवून सांगायचा. आठ महिने तो आमच्या घरी राहायचा व चार महिने त्याच्या गावाला शेतीच्या कामासाठी जायचा. त्याला लिहिता-वाचता येत नसे. पण पुराणिक बुवांनी वाचलेल्या अख्यायिकांचा तो सर्वाना अरथ (अर्थ) सांगायला गावाला जायचा. तो गावाला जायला निघाला की आम्हाला अक्षरश: रडायला येई; इतका प्रेमळ होता तो. जाताना म्हणायचा ‘तिकडे मोठी माणसं, म्हातारे लोक, बाया-बापडय़ा आहेत, त्यांना नको का अरथ सांगायला’. मग आम्ही जा म्हणायचो. सकाळच्या न्याहारीत त्याला दोन भाकऱ्या, लसणाची चटणी, दुपारी केळीच्या पानावर भात, त्यात मध्ये खड्डा म्हणजे अळ करून त्यात थोडीशी आमटी, बस. रात्री काही नाही. दिवसभर काम करत असे. दुपारी फक्त १० मिनिटे जमिनीवर अंग टेकत असे. त्याला आजारी पडलेला मी कधी पहिलेच नाही. नंतर आम्ही मुंबईला आल्यावर तो त्याच्या गावालाच गेला, तो परत आलाच नाही, पण त्याला आम्ही कधीच विसरलो नाही.      
असा हा प्रेमाचा गोतावळा. तीन दिवसांच्या गावाच्या सहवासात असंख्य आठवणी उचंबळून आल्या आणि त्या काळात गेल्यासारखे वाटले. वयाच्या ८० व्या वर्षी शरीराला आणि मनाला उभारी देऊन गेल्या. कमी साधने आणि सुविधा आम्हाला खूप शिकवून गेल्या. प्रेमाने आणि श्रद्धेवर जगण्याचे बाळकडू मिळाले. त्याच्याच जोरावर आयुष्यात कर्तव्ये, जबाबदाऱ्या आम्ही पार पाडू शकलो. आम्हाला घडवणारे धन्य ते गाव आणि ते गावकरी.    

Explosion tire shop near Sangola
सोलापूर : सांगोल्याजवळ टायर दुकानात स्फोट; एकाचा मृत्यू, दुसरा जखमी
buldhana, bear, three cubs, temple, dongarshewali village,chikhali tehsil, viral video,
VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Death of a person Bhadravati Taluka
चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला