सगळ्या वाडीची रखवाली प्रिन्स उत्तम करीत असे. रेल्वे स्टेशनवरून हमालाच्या डोक्यावर सामान लादून किंवा टांग्यातून सामान उतरवून घेणारे पाहुणे प्रिन्सच्या नजरेतून कधीही सुटले नाहीत. त्यांच्या सोबत वाडीमधले कोणी असले तर ठीक; नाहीतर प्रिन्स भुंकून भुंकून त्यांना हैराण करीत असे. माझ्या वडिलांना प्रिन्सकडून खास ट्रीटमेंट मिळत असे. वडील रात्री उशिरा दुकान बंद करून मुंबईहून लोकलने घरी येत. आमच्या घरातून दूरवरून रस्त्यावरून येणारे माणूस दिसत असे. वडिलांना येताना बघून प्रिन्स त्यांना आणायला पळत जात असे आणि मग त्यांच्या चालीने घरापर्यंत त्यांची सोबत करीत असे.
प्रिन्सचं नाव निघालं की मन भू्तकाळात म्हणजे वयाच्या सात-आठ वर्षांच्या काळात जातं. घर मालकांची मोठी वाडी होती. वाडीमध्ये तीन-चार दुमजली इमारती, काही बैठय़ा इमारती, पुढे-मागे चिंच, बोरी, जांभूळ अशी रान-मेव्याची झाडं आणि मागे एका बाजूला मोठी विहीर. सगळी घरं भरलेली. घर मालकांचा स्वत:चा बंगला साधारण एक किलोमीटर अंतरावर. प्रिन्स- आमच्या मालकांचा कुत्रा. स्वत: मालक, त्यांची मुलं यांची फेरी वाडीत रोज नियमित होत असे. येताना प्रिन्स त्यांच्याबरोबर येत असे, पण परत जायची वेळ आली की हा स्वत:च्या मर्जीचा मालक! वाडीमध्ये लहान-मोठी अशी ५० मुलं होती. प्रिन्सला खायला देण्याची धडपड सगळ्यांची सारखीच असे. बहुतेक हा अमेरिकन फॉक्सहाउंड (प्युअर ब्रीड नाही) असावा. दोन फूट उंच, हलका तपकिरी रंग आणि एखाद्या राजकुमाराला शोभेल असाच चेहेऱ्यावरचा रुबाब. लहान मुलं याच्या पाठीवर बसून ‘घोडा घोडा’ करीत. प्रिन्सला त्याचा कधी त्रास झालेला दिसला नाही. पोळीचा तुकडा मिळाला की स्वारी खूश. आमच्या घरी त्याला कायम पार्ले ग्लुकोजची दोन बिस्किटं ठरलेली. आई कायम बिस्किटांचा स्टॉक ठेवत असे.
सगळ्या वाडीची रखवाली प्रिन्स उत्तम करीत असे. रेल्वे स्टेशनवरून हमालाच्या डोक्यावर सामान लादून किंवा टांग्यातून सामान उतरवून घेणारे पाहुणे प्रिन्सच्या नजरेतून कधीही सुटले नाहीत. त्यांच्या सोबत वाडीमधले कोणी असले तर ठीक; नाहीतर प्रिन्स भुंकून भुंकून त्यांना हैराण करीत असे. माझ्या वडिलांना प्रिन्सकडून खास ट्रीटमेंट मिळत असे. वडील रात्री उशिरा दुकान बंद करून मुंबईहून लोकलने घरी येत. आमच्या घरातून दूरवरून रस्त्यावरून येणारे माणूस दिसत असे. वडिलांना येताना बघून प्रिन्स त्यांना आणायला पळत जात असे आणि मग त्यांच्या चालीने घरापर्यंत त्यांची सोबत करीत असे. रात्री साडेनऊच्या सुमाराला वडिलांना घेऊन आला की प्रिन्स त्यांच्याकडून लाड करून घेऊन मग स्वत:च्या घरी जात असे. आमच्या घरात प्रिन्सला कधीही यायची परवानगी होती. एकदा आम्ही सारे सकाळीच घराला कुलूप लाऊन मुंबईला गेलो होतो. रात्री उशिरा परत येत होतो. लांबवरून घरात लागलेले दिवे बघून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली. घरी आल्यावर शेजाऱ्यांनी सांगितले की कधीपासून प्रिन्स दारावर उडय़ा मारून आवाज करीत होता. त्या गडबडीत त्याच्या पायांनी स्विच दाबून दिवाही लागला होता. वडिलांनी दार उघडून त्याला कुरवाळल्यावर प्रिन्स शांतपणे निघून गेला. प्रिन्सला आमच्या घरातल्या पलंगाखाली झोपायला फारच आवडत असे. प्रिन्स या जगातून गेल्यावरही बाहेर जाताना पलंगाखाली बघितल्याशिवाय कुलूप न लावण्याची सवय घरातल्या सगळ्यांनाच लागली.
अशा या प्रिन्सच्या आयुष्यात लहान वयात घडलेल्या एका घटनेचे रहस्य कधीच उलगडलं नाही. ‘पाणी आण, पाणी आण’असं म्हटलं की प्रिन्स घाबरून पळून जात असे. कोणी म्हणत, की तो लहान होता तेव्हा आमच्या घर मालकांकडच्या स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी त्याच्या अंगावर गरम पाणी टाकले होते. (‘पाणी’ या शब्दाचा उच्चार आणि त्याला जोडलेल्या गरम पाण्याची संवेदना हे समीकरण त्याच्या डोक्यात कसे बरे फिट बसले होते?) प्रिन्स खूप जगला. म्हातारा झाल्यावर आमच्या वाडीतल्या त्याच्या फेऱ्या बंद झाल्या. शेवटी चौकशी केल्यावर तो गेल्याचे कळले.
माझ्या लहानपणीच्या कुत्र्यांच्या आठवणी सुखद होत्या, त्यामुळे माझ्या मुलांनी जेव्हा कुत्रा आणायचा हट्ट केला, तेव्हा मी फारसे आढेवेढे घेतले नाहीत. मुंबईच्या उपनगरात असलेल्या आमच्या फ्लॅटला मोठी गच्ची होती. (कुत्रा पाळायला फ्लॅट पुरेसा प्रशस्त होता) जवळच एक कॅथलिक तरुण कुत्र्याची पिल्ले विकत असे. मुलांनी आजीबरोबर जाऊन एक छोटे पांढरे पॉमेनीरियन ( हेही प्युअर नव्हतेच) जातीचे पिल्लू निवडून ठेवले होते. थोडे दिवस थांबून आम्ही त्याला घरी आणले. अंतर फार नव्हते. त्याला हातात उचलून घेऊन आम्ही मोठय़ा रस्त्याने चालतच येत होतो. रस्त्यावरून डबल डेकर गेली की पिल्लू थरथरत होतं. त्याचं जन्माला आल्यावरचं नाव ‘स्विटी’ होतं, पण आम्हाला त्याचं नाव बदलायचं होतं. कोणी म्हटलं, स्विटीच बरं आहे. कोणी म्हटलं, ‘डायमंड’ ठेवा. पिल्लाचा शुभ्र पांढरा रंग आणि मऊ  स्पर्श लक्षात घेऊन मी ‘फेदर्स’ हे नाव सुचवले आणि ते सगळ्यांना आवडले. पण शेवटपर्यंत आपलं ‘स्विटी’ हे नाव फेदर्स विसरला नाही. फेदर्स खूपच देखणा होता. शुभ्र पांढरा रंग, काळे भोर, भावदर्शी डोळे आणि काळे नाक. उंची अर्थातच कमी. फेदर्स छान वाढत होता. मुलं त्याचा वाढदिवस कौतुकाने साजरा करीत. फेदर्स शाकाहारी होता. आंबा आणि सकाळचा बशीभर चहा (साखर घातलेला) हे फेदर्सच्या आवडीचे पदार्थ. आजीने केलेली तव्यावरची गरम पोळी, भाकरी, ब्रेड, वाटाणे, काकडी आलटून-पालटून त्याच्या जेवणात असे. पेढा, ग्लुकोजची बिस्किटे ट्रीट म्हणून.
फेदर्स सहा वर्षांचा झाला आणि आम्ही मुंबईचे घर सोडून अमेरिकेला कायमचे सगळ्यांनाच नेण्याचे ठरविले. भरपूर पैसे खर्च करून फेदर्सला अमेरिकेला नेले. केलेल्या खर्चाच्या तुलनेत फेदर्सची विमानातली व्यवस्था अजिबात नीट नव्हती.  दोन दिवसांच्या प्रवासानंतर आणि ३० तासांनंतर फेदर्स परत आम्हाला भेटला. फेदर्सच्या आयुष्यातले ते सर्वात वाईट दोन-तीन दिवस असावेत. इथून पुढे फेदर्सला फक्त मायाच मिळाली. आजी आणि नातवंडंही फेदर्सच्या खास आवडीची माणसं, पण लवकरच त्याला माझी आणि मुलांच्या वडिलांचीही सवय झाली. आजी रोज संध्याकाळी घराच्या बागेत पूजेसाठी फुले काढून मागच्या अंगणात थोडा वेळ त्याच्या संगतीत बसून त्याच्या अंगावर हात फिरवीत, त्याला टाल्कम पॉवडर लावून, त्याच्या गळ्यात साखळी अडकवून त्याला साइड वॉकवरून फिरायला नेत. आई-वडिलांबरोबर फिरायला निघालेली छोटी मुले आजींच्या परवानगीने खाली बसून फेदर्सच्या पाठीवर हात फिरवून त्याच्या अंगाला येणाऱ्या सुगंधाचं कौतुक करीत. छोटय़ा कुत्र्यांचं आयुष्य आठ-नऊ  वर्षांचं असतं असं सांगितलं की आमची मुलं म्हणत, ‘नाही, नाही, १२-१३ र्वष!’ आजींचं वय वाढलं आणि त्या एकदा घरातच पडल्या. त्यांचं ते शेवटचं दुखणं! फेदर्सलाही वयाच्या १४व्या वर्षी म्हातारपणीच्या दुखण्याने पुरतं घेरलं. बहिरेपणा, संधिवात, मोतिबिंदू अशा सगळ्या दुखण्यांनी तो अगदी जेरीस आला.
त्याच्या डॉक्टरांनी मग त्याच्या आयुष्याच्या उतरणीची कल्पना आम्हाला दिली आणि शेवटचा निर्णय घ्यायची वेळ आली. फेदर्सला शांतपणे त्याच्या शेवटच्या प्रवासाला पाठवायचे ठरले. मी घरी केलेल्या पेढय़ाचा तुकडा त्याला भरवला. आजी खूपच आजारी होत्या. फेदर्सला त्यांच्या पायाजवळ नेले. गाडीत बसायला त्याला कधीच आवडले नाही. मनाविरुद्ध असा हा शेवटचा प्रवास फक्त १० मिनिटांचा होता. मुलांनी त्याला उचलून घेतले आणि शेवटचे इंजेक्शन घेऊन फेदर्सने मान टाकली. त्याची साखळी, खेळायचा बॉल मुलांनी त्याची आठवण म्हणून अजूनही जपून ठेवले आहेत.
मुलीची मुलगी मोठी (५-६) वर्षांची  झाली आणि त्यांनी एक अजून जन्माला न आलेल्या कुत्र्याला विकत घ्यायला एका बाईला पैसे दिले. ती बाई कुत्र्यांच्या ब्रीडिंगचा व्यवसाय करीत असे. पॅचेस एक महिन्याची झाली आणि कौतुकाने तिचं घरी आगमन झालं. ३-४ पिलांपैकी सगळ्यात कुरूप दिसणारं पिल्लू नातीने पसंत केलं. त्या पिल्लाला चांगलं घर मिळण्याची शक्यता रूप नसल्याने फारच कमी होती, हे माझ्या हळुवार मनाच्या नातीच्या लक्षात यायला वेळ  लागला नाही. पॅची ही किंग चार्ल्स कॅवेलिअर स्पनिएल जातीची आहे. लहानशा चणीची, काळ्या, पांढऱ्या रंगावर थोडे ब्राऊन पॅचेस असलेली पॅची खूप चुळबुळी आहे. आजोबा एकदा असंच पॅचेसच्या रूपाबद्दल नातीला न आवडणारं बोलून गेले आणि पस्तावले. नातीच्या तोंडून पाच मिनिटांचं पॅचीचं गुणगान ऐकल्यावर आजोबा म्हणाले, ‘‘वा! तुझी व्होकॅब्युलरी (शब्द भांडार?) जोरात वाढते आहे!’’
पॅची आहे मात्र फारच हुशार. संध्याकाळी घरातले सगळे थोडा वेळ एकत्र बसून टीव्ही बघतात. पॅची एक दिवसही टीव्ही बघणं चुकवत नाही. सगळी जणं सोफ्यांवर स्थानापन्न झाली, की बाईसाहेब डौलात येऊन सगळ्यांच्या मधे कार्पेटवर बसून टीव्ही बघतात. रोज न चुकता टीव्हीच्या मागे जाऊन एकदा खात्री करून घेतात की पडद्यावर दिसणारी सारी माणसं फक्त पडद्यावरच दिसत आहेत आणि टीव्हीमागे लपून बसलेली नाहीत ना! पॅचेस तिचं डब्यातलं जेवण  जेवते, बिस्किटं खाते, पण तिचा आवडता खाऊ म्हणजे फ्रीझरमधे ठेवलेल्या फरसबीच्या फ्रोझन शेंगा. पॅचेस ‘गुड गर्ल’ सारखी वागली की तिला शेंगा मिळतात. स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना जमिनीवर काही पडलं (भाजींची देठं, तुकडे, वगैरे)की पॅचेस विजेच्या चपळाईने येऊन ते मटकावते. माझी मुलगी तिला हँड-व्हॅक (छोटा झाडू) म्हणते. रात्रीच्या आणि दुपारच्या झोपेसाठी पॅचीचं  छोटंसं घर लॉन्ड्री रूममधे ठेवलेलं आहे. मोठ्ठा पिंजरा फॅमिली रूममधे आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांना कुत्र्याची भीती वाटत असली, तर अशा वेळी पॅचीची रवानगी पिंजऱ्यात. नात खोलीत झोपलेली असते, तेव्हा पॅची तिच्या दाराबाहेर शांतपणे तिच्या उठण्याची वाट बघत असते.
असे हे माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर मला भेटलेले कुत्रे. आयुष्याच्या संध्याकाळी तीनही कुत्र्यांनी दिलेले सुख-दु:खांचे क्षण मनाच्या एका कोपऱ्यात मी जपलेले आहेत.