चाळीत दिवाळीला चार दिवस आधीच सर्वाकडे फराळाची तयारी चालू असे. करंजी, अनारसे, चिरोटे, चकल्या, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा असे पदार्थ खमंग वासावरून आज कोणाकडे काय केले ते आपोआप सांगून जायचे. चव बघण्याच्या निमित्ताने दिवाळीच्या आधीच बऱ्याच प्रकारचा फराळ पोरांच्या वाटय़ाला यायचा. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फराळाच्या ताटांची देवाणघेवाण व्हायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे थंडीत कुडकुडत लवकर उठून अंघोळी करायला आणि फटाके उडवायला सर्वात आधी कोण उठते याबद्दल आमच्यात चढाओढ असायची.

मी खूपच लहान असताना १९६५-६६ साली आम्ही डोंबिवलीत चार रस्त्यावरील रमा निवास येथे राहायला आलो. रमा निवास म्हणजे दोन्ही बाजूला पाच-सहा घरे व त्यामध्ये लांबच लांब अंगण असलेली चाळ. त्यावेळी डोंबिवली आजच्यासारखी गच्च भरलेली नव्हती. वस्त्या लांबलांब होत्या. रमा निवासमध्ये मी चौथीपर्यंत राहात होते व जवळच्याच टिळकनगर शाळेत जात होते. चाळीत आमची जागा सुरुवातीलाच होती. घराशेजारच्या जागेत आम्ही लावलेला पांढरा व पिवळा सोनटक्का बहरून यायचा आणि दारासमोर पांढरा व मध्येच गुलाबी छटा असलेला गुलाबाचा वेल अंगाखांद्यावर फुले घेऊन उभा असायचा. ही फुले रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्या माणसांचे लक्ष वेधून घ्यायची. आमच्या बाजूच्यांनी लावलेले अनंताचे झाड व इतर शेजाऱ्यांनी लावलेली छोटी-छोटी फुलझाडेही त्यांच्या घरासमोर व परसदारी उभी होती.
रमा निवासातील सर्व कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत होती. दुपारच्या वेळी एखाद्या गृहिणीकडे पापड लाटायचा बेत असे. त्यावेळी आपापले पोळपाट-लाटणे घेऊन इतर गृहिणी तिला मदत करायला यायच्या, हसत खिदळत पापड केव्हा लाटले जायचे ते समजायचेदेखील नाही.
आम्हा लहान मुलांची त्यावेळी लाटय़ा खायची चंगळ असायची. मध्येच उसाचा रस मागविला जायचा. संध्याकाळच्या वेळी आम्ही लपाछपी, लगोरी, गोटय़ा, पतंग उडविणे असे खेळ मनसोक्त खेळत असू. त्यानंतर सांजवेळी प्रत्येक घरात शुभंकरोतीचे मंगल सूर निनादत असत.
एखाद्या दिवशी रात्री जेवल्यानंतर मधल्या अंगणात चाळीच्या शेवटी असलेल्या मोठय़ा झाडाखालील बाजेवर एखादा शूर मुलगा आम्हाला भुतांच्या गोष्टी सांगत असे आणि आम्ही त्या घाबरत-घाबरत, पण कुतूहलाने ऐकत असू. आमच्या शेजारच्या घरात दर गुरुवारी रात्री दत्ताची आरती होत असे. प्रसाद मिळणार म्हणून अस्मादिक पेंगतपेंगत तिथे बसलेले असायचे. एका कुटुंबात जेवताना न बोलायचा दंडक होता. त्याबद्दल मला खूप मजा वाटायची. शेवटच्या खोलीत एकटाच माणूस राहायचा. तो त्याची तपकिरीची पुडी खिडकीच्या बाहेर ठेवायचा. एकदा मजा म्हणून आम्ही सवंगडय़ांनी ती नाकाला लावली आणि िशकांनी असे हैराण झालो की, ती मजा मला अजूनही आठवते. आमच्या समोरच्या बाजूला शेवटच्या घरात राहणाऱ्या या शांत स्वभावाच्या व लांब केसांच्या वहिनी मला खूप आवडायच्या. त्या रोज हिरवी साडी नेसायच्या व दररोज न चुकता तुळशीला पाणी घालायच्या. आमच्या चाळीत कधीही मोठय़ाने भांडणे झालेली मी ऐकली नाहीत. वेळप्रसंगी एकमेकांना मदत करायची सगळ्यांची तयारी असे. पूर्वी गाडय़ा आजच्यासारख्या नेहमी लेट नसायच्या. एकदा गाडय़ा लेट असल्यामुळे ताईला ऑफिसमधून यायला उशीर झाला, तर शेजारचे ती येईपर्यंत आमच्या बरोबरीने तिची वाट बघत थांबले होते. माझ्या दादा आणि ताई या दोघांच्याही लग्नाच्या वेळी आमच्या घराशेजारी मंडप घालून आचाऱ्यांकडून बुंदीचे लाडू करून घेतले होते आणि दोन मोठय़ा डब्यातील उरलेल्या लाडवांचा आस्वाद घेण्यात माझा मोठा हातभार लागला होता. ही एक माझी आवडती आठवण आहे.
चाळीत दिवाळीला चार दिवस आधीच सर्वाकडे फराळाची तयारी चालू असे. करंजी, अनारसे, चिरोटे, चकल्या, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा असे पदार्थ खमंग वासावरून आज कोणाकडे काय केले ते आपोआप सांगून जायचे. चव बघण्याच्या निमित्ताने दिवाळीच्या आधीच बऱ्याच प्रकारचा फराळ पोरांच्या वाटय़ाला यायचा. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फराळाच्या ताटांची देवाणघेवाण व्हायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे थंडीत कुडकुडत लवकर उठून अंघोळी करायला आणि फटाके उडवायला सर्वात आधी कोण उठते याबद्दल आमच्यात चढाओढ असायची. अंघोळी आटोपल्यावर आम्ही सारे देवळात जात असू. देवळातून आल्यावर फराळाचा समाचार घेतला जाई. त्यानंतर रांगोळी काढणे व चाळीतील इतरांच्या रांगोळ्या पाहून सर्वात चांगल्या रांगोळीचे कौतुक होत असे.
रमा निवासच्या बाजूला व समोर रस्त्याच्या पलीकडे भलेमोठे अंगण होते. वर्षांतून एकदा चांदण्या रात्री सर्व कुटुंबे मिळून बाजूच्या अंगणात एकत्र जेवण बनवीत असत व हसतखेळत त्याचा स्वाद घेत असत. रस्त्यालगतच्या समोरच्या अंगणात एक गरीब लहान बहीण-भाऊ त्यांच्या मामाबरोबर रहात होते. खेळाचे चक्र चालवून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. एखादे वेळी रात्रीचे जेवण उरले तर ते आम्ही त्यांना नेऊन देत असू. ती मुले आम्हाला कधी कधी रात्री चक्रावर बसवून खुशीने गोलगोल फिरवीत असत. अशी ही आमची रमा निवास व त्यातल्या या आठवणी. चौथीनंतर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. हळूहळू आमचे एकेक शेजारीही नवीन ठिकाणी राहायला गेल्याचे कळले. आता त्या पूर्वीच्या घरोब्याला सगळे पारखे झाले आहेत. आज रमा निवासच्या परिसरात मोठय़ामोठय़ा इमारती ऐटीत उभ्या राहिल्या आहेत. आसपास गर्दी व वाहनांची वर्दळ आहे. त्यात आमची रमा निवास हरवली आहे.

आमच्या चाळीत कधीही मोठय़ाने भांडणे झालेली मी ऐकली नाहीत. वेळप्रसंगी एकमेकांना मदत करायची सगळ्यांची तयारी असे. पूर्वी गाडय़ा आजच्यासारख्या नेहमी लेट नसायच्या. एकदा गाडय़ा लेट असल्यामुळे ताईला ऑफिसमधून यायला उशीर झाला, तर शेजारचे ती येईपर्यंत आमच्या बरोबरीने तिची वाट बघत थांबले होते.