अनेकदा आपण आपल्या इमारतीत किंवा घरात दुरुस्तीचं किंवा नूतनीकरणाचं काम करायचं ठरवतो; तेव्हा कंत्राटदाराला आपण बोलावल्यावर तो आपल्याला कामाचा दर वेगवेगळ्या प्रकारे सांगतो. त्यात तो सांगतो की, जर सामानासकट कंत्राट देणार असाल, तर एक भाव आणि तुम्ही कामासाठी लागणारं सामान आणून देणार असलात, तर मजुरीचा अमुकएक भाव पडेल. हे ऐकल्यावर आपल्याला नेमका कोणता निर्णय निवडावा, आपला कशात फायदा आहे, ते कळत नाही. दुसऱ्या प्रकारात सामान आणण्यापासूनची सर्व जबाबदारी आपण कंत्राटदारावर सोपवू शकतो. यातही दोन उपप्रकार आहेत. सामानाचे पसे, मजुरी आणि कंत्राटदाराचा नफा या सर्वाची गोळाबेरीज करून तो कामाची अंदाजित एकरकमी किंमत सांगू शकतो. किंवा एकूण कामाचे तो वेगवेगळे घटक पाडतो आणि प्रत्येक घटकासाठीचा प्रतिएकक दर सांगतो. उदाहरणार्थ, लाकडी वॉर्डरोबचे समोरून दिसणारे क्षेत्रफळ काढून त्याचा प्रतिचौरस फूट दर, टाइल्स बसवायचा प्रतिचौरस फूट दर, प्लॅस्टिरगचा प्रतिचौरस फूट दर किंवा काँक्रीटिंगचा प्रतिघनफूट दर इत्यादी. या दरात सामानाचे, मजुरीचे आणि त्याच्या नफ्यासह इतर सर्व खर्च समाविष्ट असतात. दुसऱ्या मुख्य प्रकारात कंत्राटदाराला आपण सर्व सामान आणून देतो व तो फक्त मजुरीचे पसे आपल्याला सांगतो. यात अर्थातच त्याचा नफाही समाविष्ट असतो.
आता या दोन्ही प्रकारांचे फायदे व तोटे जाणून घेऊया. पहिल्या प्रकारात फायदा हा की, सामानापासून सर्व काही आणण्याची जबाबदारी कंत्राटदाराने उचललेली असल्यामुळे, आपल्याला कसलीही धावपळ करावी लागत नाही. कंत्राटदार आपल्या खूप परिचयातला आणि विश्वासातला असेल, तर या पद्धतीने काम करून घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु तसं नसेल, तर मग मात्र ही पद्धत नुकसानकारक ठरू शकते. कारण आपल्याला सांगितलेल्या दर्जाच्या आणि कंपन्यांच्या वस्तूच तो आणतो की, आपल्याला उच्च दर्जाच्या वस्तूंचे भाव सांगून प्रत्यक्षात मात्र कमी दर्जाच्या वस्तू वापरतो, याकडे लक्ष द्यावं लागेल. कामाच्या घटकांसाठी जर प्रतिएकक दर सांगितला असेल, तर या दरात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, याची आधी खातरजमा करून घ्यावी. कारण मागाहून जर अमुक एक घटक त्या दरात धरले नव्हते, असं जर कंत्राटदाराने सांगितलं तर त्या घटकांसाठी वेगळी किंमत तो आकारू शकतो.
सामान विकत घेताना लावला जाणारा व्हॅट अर्थात मूल्यवíधत कर भरून जेव्हा कंत्राटदार सामान विकत घेतो, तेव्हा तो हा कर आपल्या खिशातून भरत नाही, तर तो आपल्याच बिलात लावतो. त्यामुळे त्याच्याकडे सामान विकत घेतल्याची बिलं मागावी आणि कुठल्या वस्तूंवर नेमका किती टक्के व्हॅट भरला याचा तपशील मागून घ्यावा. तो सामान विकत घ्यायला जाईल तेव्हा शक्यतो मोठय़ा रकमेच्या सामानाच्या खरेदीच्या वेळी आपण स्वत: त्याच्याबरोबर गेलो तर या सर्व गोष्टींची शहानिशा करता येईल. तसंच आपल्याला हव्या असलेल्या टाइल्स किंवा इतर वस्तूंची डिझाइन, रंग इत्यादी गोष्टींचीही निवड करता येईल.
कंत्राटदार फार ओळखीचा नसेल तर सामान आपण विकत आणून द्यावं. त्यात काही कठीण किंवा फार तांत्रिक किंवा न समजण्यासारखं
असं काही नसतं. चार दुकानांमध्ये भाव विचारला आणि भावात फरक का आहे, हे जाणून घेतलं की, त्याच्या दर्जातला फरक हळूहळू कळायला लागतो. सामान आणून देण्याची धावपळ करावी लागली तरी सामानाच्या किमतीत आणि दर्जात फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी असते. तसंच आपण
चार दुकानं फिरून भाव काढत असल्यामुळे कमी किमतीत चांगला दर्जा कुठे मिळेल, याचीही आपल्याला कल्पना येऊ शकते. मात्र, या प्रकारात एकच तोटा होऊ शकतो. मजुरी जर दिवसावर आकारली जात असेल तर कंत्राटदाराला केवळ मजुरीतून पसे मिळत असल्याने मजुरी वाढवण्याकडे म्हणजेच कामाला लागणारे दिवस वाढवण्याकडे त्याचा कल असू शकतो. त्यामुळे काम करताना वेळ काढूपणा तर केला जात नाही ना, याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यावरही एक उपाय असा की, केवळ मजुरीवर जर आपण काम देणार असू, तर मजुरी ही कामाच्या दिवसांवर न मोजता, कामाच्या स्वरूपानुसार आणि आकारमानानुसार मजुरीचा भाव ठरवावा. उदाहरणार्थ, विटांचं बांधकाम करायचं असेल किंवा प्लॅस्टिरग करायचं असेल, तर या कामाला लागणाऱ्या दिवसांवर मजुरी न ठरवता विटांच्या बांधकामासाठी घनफुटावर, प्लॅस्टिरगसाठी चौरस फुटांवर दर ठरवावा. म्हणजे कामाच्या आकारमानानुसार दर असल्यामुळे दिवस वाढवण्याकडे मजुरांचा कल असणार नाही.
अर्थात, काम करून घेताना आपली नेहमीच फसवणूक केली जाईल, असं मानण्याचं कारण नाही. परंतु आपल्या परीने काळजी घेणं हे केव्हाही चांगलं!    मनोज अणावकर- anaokarm@yahoo.co.in
सिव्हिल इंजिनीअर