गृहसंकुलातील अस्वच्छता ही मूषकांच्या वावराला प्रामुख्याने कारणीभूत ठरते. गृहसंकुलातील जागा स्वच्छ ठेवली, कचराकुंडी वेळीच रिकामी केली तरच मूषकांच्या त्रासापासून सुटका होईल.
मूषक म्हणजे उंदीर. ग्रामीण भागात तो जसा शेतकऱ्यांचा शत्रू तसाच शहरात तो सदनिकाधारक व बंगलेवाल्यांचासुद्धा! रात्री सर्व वास्तूवर बिनधास्त राज्य करणारा हा लहान, पण उपद्रवी प्राणी दिवसा मात्र निशाचर असतो. मूषक हे गृहसंकुलात असले तर ते सदनिकेत हमखास येतातच, कुठल्याही उद्वाहनाचा वापर न करता ३०-४० मजल्यांपर्यंतचे त्याचे सदनिकामधील वास्तव्य भल्याभल्यांना अंचबित करते. अतिशय छोटा असलेला हा शाकाहारी सस्तन प्राणी तसा खूपच चपळ आहे. घरात जेथे अडगळ जास्त तेवढे हे महाशय सुरक्षित. पुठ्ठय़ांची मोठी खोकी सामान अथवा कागदपत्रांनी भरलेली असल्यास उंदरांना ते सुरक्षित ठिकाण ठरते.
उंदीर घरात येण्याचा मुख्य मार्ग म्हणजे स्वयंपाकघरास जोडलेला सांडपाण्याचा पाइप. या पाइपमधून सतत अन्नाचे कण वाहत असतात. त्याचा वास आणि स्वाद याच्या लालसेने त्यांचा घरात प्रवेश होतो. रात्री खिडकी अथवा तिची फट उघडी राहिली असेल तर त्यांना घरात येण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिल्यासारखे आहे. घरात उंदीर आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्यांची रात्रीच्या निरव शांततेत चालू असलेली खुडबूड उपयोगी पडते. मात्र बंद शयनगृहात वातानुकूलित यंत्रांच्या आवाजात अनेकदा ते समजत नाही. अशा वेळी किचनच्या ओटय़ावर थोडे तांदूळ अथवा ब्रेडचा तुकडा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो गायब असेल अथवा त्याची जागा बदललेली असेल तर त्याच्या अस्तित्वाची खात्री होते. घरात पडलेल्या काळसर लहान लेंडय़ांवरूनही त्यांचे अस्तित्व ओळखता येते. उंदीर शोधण्याच्या मोहिमेत पळापळ तर होतेच, पण त्याचबरोबर घरात नासधूस होऊन माणूस दमून जातो. महत्त्वाचे म्हणजे या युद्धात मूषकच अनेक वेळा विजयी होतात. शक्यतो घरात उंदीर संख्येने एक-दोनच असतात. खरे तर ते वाट चुकलेले वाटसरूच मात्र सदनिधारकाच्या मर्जीनुसार काही आठवडय़ांचे पाहुणे सहज होतात. दारे- खिडक्या दररोज रात्री व्यवस्थित बंद करणे, घरातील अन्नधान्य, फळे उघडय़ावर न ठेवणे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, किचनमधील बेसीन तसेच धुलाई यंत्राची जाळी घट्ट बसवणे ही साधी पथ्ये पाळून आपण मूषकांना सदनिकेपासून दूर ठेवू शकतो. घरात अन्न मिळाले नाही तर उंदीर संगणक अथवा वायिरगवर हल्ला चढवतात, अनेक वेळा बहुमूल्य ग्रंथसंपदा फस्त करतात आणि सर्व प्रकरण महागात जाते, सोबत मनस्ताप वेगळाच. लाकडी फíनचर कुरतडण्यामध्ये हा प्राणी तरबेज असतो. तो जमिनीवर झोपलेल्या लोकांच्या पायाचा चावाही घेऊ शकतो.
सध्या बाजारात विविध प्रकारची उंदीरनाशके विकत मिळतात. त्यांचा वापर करून मूषकराजाचा बंदोबस्त करता येतो. मात्र हे सदनिकेपुरते ठीक, पण गृहसंकुलासाठी कठीण काम आहे.
अस्वच्छता ही उंदरांना कायम आमंत्रित करत असते. गृहसंकुलाबाहेर असणारी कचराकुंडी हे मूषकाचे गोकुळच. यामुळेच त्यांचा आतमध्ये प्रवेश सोपा होतो. गृहसंकुलातील मूषक रात्री अन्न शोधण्यासाठी ड्रेनेज अथवा बागेतील अडगळीच्या ठिकाणी असलेल्या बिळातून बाहेर पडतात. खाली अन्न मिळाले नाही तर किचनपाइपच्या आत अथवा गॅलरी पाइपवर चढून सदनिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. जेथे ड्रेनेज असेल तेथे औषध टाकणे, किचनपाइपवर चढू नये म्हणून जमिनीलगत अडथळा तयार करणे, उंदीर पकडण्यासाठी पाइप जेथे जमिनीस स्पर्श करतात तेथे प्रलोभन सापळे लावणे ही उपाययोजना सोसायटीत तयार करता येऊ शकते.
 महापालिकेतर्फे प्रत्येक वार्डामध्ये उंदीर मारण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक कक्ष असतो. तेथील अधिकारी त्यांना विनंती केल्यावर स्वत: गृहसंकुलात येऊन यशस्वी कार्यवाहीसुद्धा करतात. गृहसंकुलात कावळ्यांची वाढलेली संख्या मूषकराजांच्या मजबूत वसाहतीचे दर्शक असते. त्याचबरोबर संकुलातील मंदीर, वृक्षपूजन, समारंभ, उत्सव आणि जेवणावळी मूषकाचे प्रमाण वसाहतीमध्ये लक्षणीयरीत्या वाढवत असतात. परिसर स्वच्छता हाच त्यावर एकमेव उपाय आहे. गृहसंकुलातील जागा स्वच्छ ठेवणे, कचरापेटय़ा रिकाम्या करणे, औषध टाकून बिळे बुजवणे, किचनपाइप नियमित साफ करणे या उपायांनी मूषकसंख्येवर नियंत्रण मिळवता येते. मूषकांमुळे पूर्वीसारखी रोगराई पसरत नसली तरी घरात शिरलेला उंदीर रहिवाशांची झोप पूर्णपणे उडवू शकतो. घरात आलेल्या त्यांच्या जोडीस वेळीच बाहेर काढणे इष्ट अन्यथा त्याचे बाळंतपण किती खर्चीक होऊ शकते याचे अनेक सदनिकाधारक साक्षीदार आहेत. म्हणूनच घटनेचे साक्षीदार होण्यापेक्षा गुन्हेगारास प्रोत्साहन न देणे हा जास्त सुरक्षित उपाय आणि अशा उपायांची सुरुवात स्वत:च्या  सदनिकेपासून झाली तर गृहसंकुल सहजपणे मूषकमुक्त होऊ शकते, हे तज्ज्ञांनी सांगण्याची काय गरज?

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता