एक दिवस रस्त्यात मला एक मांजर दिसली. तिच्या पायाला दुखापत झाली होती. ती लंगडत चालत होती. मी तिला घरी आणलं. प्रेमानं तिच्या पाठीवरून हात फिरवला, खायला-प्यायला घातलं. या आदरातिथ्याने तिलाही खूप बरं वाटलं असावं. औषध-पाण्याने तिचा पाय हळूहळू बरा झाला. तिला आमच्या घरातला हा आपलेपणा इतका भावला की ती आमची होऊन घरातलीच एक सदस्य झाली.
तिचे नाव मी ‘मिली’ ठेवले. मला मिळाली म्हणून ‘मिली’. ‘मिली’ माझी सर्वात लाडकी होती. तिनंही काही दिवसांतच सर्वाना प्रेम लावलं.  करडय़ा रंगाची मिली सारखी म्याँव म्याँव करत, अंग घासत, चाटत, पायात घुटमळायची. रात्रभर बाहेर राहून सकाळी बरोबर पावणे सहाला दारात हजर व्हायची. जोरजोरात ओरडून, दार वाजवून उघडायला लावायची. तिची वेळ इतकी पक्की ठरलेली होती की त्यावर आपण आपले घडय़ाळ लावावे.
पुढच्या पायांवर उभे राहून दुधाची ताटली स्वत:कडे ओढून घ्यायची तिची सवय होती. प्रेमाने बोलत तिला दूध-पोळी भरवावी लागे. अर्थात, हे आमचेच लाड होते आणि तीसुद्धा ते पुरवून घेई. खाऊन झाले की तिच्यात नवा जोश यायचा. खेळ, मस्ती करून दमली की पलंगावर जाऊन अंग चाटून हळूहळू ती झोपी जायची. गप्पा मारलेल्या तिला खूप आवडत, पण रागावले तर तिचा अपमान होई. बोललेले सर्व तिला समजे. त्याला ‘म्यँाव’ करून ती प्रतिसादही देत असे.
एक दिवस तिने आम्हाला ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली. मग तर तिचे आणखी लाड सुरू झाले. तिच्या खाण्यापिण्याची बडदास्त ठेवण्यात आली. तिला या दिवसात शिळी पोळी चालायची नाही. ताजी पोळी- त्यातूनही ती गरम असेल तर ती खूश असायची. असे सर्व डोहाळे पुरवून घेत एक दिवस तिने चार गोंडस पिल्लांना जन्म दिला. डोळे मिटलेली ती गोड नाजूक पिल्लं पाहून मी खूश झाले. आमचे घर जणू गोकुळ बनले. मिलीचं बाळंतपण, पिल्लांचं बालपण, त्यांचं बारसं, त्यांचं चालणं, पडणं, धावणं, दंगा, त्यांचं म्याँव म्याँव हे सगळं मी अनुभवलं. खरंच मिलीने आणि तिच्या पिल्लांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं.
मिली मांजर असली तरी ती एक आई होती. ती आपल्या बाळांना शिस्त लावताना, त्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकवताना, प्रसंगी  रागावताना पाहून मी थक्क झाले. एक दिवस तिने आपल्या पिलांसाठी मऊ लुसलुशीत उंदीर शोधून आणला, पण मी तिला घरात येऊ दिले नाही. तेव्हा ती बराच वेळ रागाने ‘म्यॉंव म्यॉंव’ करीत राहिली. त्या दिवशी मी तिला घरात घेतले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र ती आमच्यावर रागावून पिल्लांना घेऊन निघून गेली. आम्हाला खूप वाईट वाटलं. खरं तर तिच्या दृष्टीने ती योग्य होती. तिला रागावल्याबद्दल उगाचंच अपराधी वाटू लागलं. मनाला चुटपूट लागून राहिली. वाटलं, बहुतेक तिच्याशी आपला ऋणानुबंध इथवरच होता. पण थोडय़ाच दिवसांत तिचा राग शांत झाल्यावर ती पिल्लांना घेऊन परत आली. घर परत आनंदी झालं. पिल्ले आता आमच्याकडे रुळली होती. दूध-पोळी खाऊ लागली होती. हे पाहून एक दिवस निश्चिंत मनाने ती कायमची निघून गेली. पिल्लांनीही आम्हाला लळा लावला. मोठी होऊन तीसुद्धा आपापल्या मार्गाला निघून गेली. आणि आमचं घर कायमचं रितं झालं.
तिच्याबरोबर अनुभवलेले दिवस, तिच्या आठवणी, घरात, मनात कायम घर करून राहिल्या आहेत. तिचा वक्तशीरपणा, स्वच्छता, प्रेमळपणा, स्वाभिमान- न बोलता खूप शिकवले तिने आम्हाला. ती गेली असली तरी तिच्या आठवणी कायम आहेत. ती येईल, कुठेतरी भेटेल, माझी ओळख पटली की हळूच ‘म्याँव’ करेल म्हणून आजही माझी नजर तिला सारखी शोधत असते.