ही पाहा माझ्या घरातली समृद्ध बाग! हिरवाईचा अनोखा उत्सवच चालू आहे माझ्या घरात. बाल्कनीतल्या वेली तर आता लेकुरवाळ्या झाल्या आहेत. हिरव्यागार पानांमधून लहान-मोठी पिवळी फुले, फुलांच्या थोडे खाली स्प्रिंगसारखे अतिशय कोवळे पोपटी दोरीपेक्षाही बारीक हात (हे धागे स्वत:साठी उंच उंच वाढण्यासाठी आजूबाजूच्या भागी घट्ट पकड धरून ठेवतात.) दोऱ्याभोवती घट्ट पकडून वरवर चढतात. दुधीची मोठी पाने, गडद पिवळी मध्यम आकाराची फुले, बाजूला मटकी आणि मुगाची वेल आहे. तिची नाजूक गडद पोपटी पाने, पिवळी आणि निळी नाजूक फुले खूप सुंदर दिसतात. त्यांच्या शेजारी पांढरी मोगऱ्याची फुले उठून दिसतात. गुलाबी अधिक अबोली रंगाची लिली पंधरा दिवस छान राहते. लाल भोपळ्याची पानेसुद्धा मोठी आणि हिरवीकंच असतात. याची फुले
पिवळी अधिक केशरी रंगाची छटायुक्त आणि पांढऱ्या चाफ्याच्या आकाराची दिसतात. एप्रिल- मेच्या दरम्यान लावलेल्या या वेलींना जून महिन्याच्या अखेरी फलधारणा सुरू झाली. आता लाल भोपळा, दुधी आणि टरबुजाची फळे सर्वाचे लक्ष आकर्षून घेतात. माझ्या घरी येणारे सर्व पाहुणे प्रथम या मंडळींना भेटतात आणि नंतर पाहुणचार घेतात.
स्वयंपाकघराच्या खिडकीत कढीपत्ता, पुदिना, गवती चहा, अळू, कोरफड अशी बहुगुणी औषधी झाडे आहेत. खिडकीत जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे झाड आहे. त्यामुळे दिवसाच्या प्रत्येक प्रहरी प्रसन्नता आणि चेतना असते.
याशिवाय दही आणि आईस्क्रिमच्या सर्वात लहान आकाराच्या डब्यांमध्ये औषधी बाटलीच्या छोटय़ा कपामध्ये (जे झाकण औषध पिण्यासाठी बाटलीच्या झाकणावर येतं ते), औषधी बाटलींच्या चमच्यांमध्ये, संक्रांतींच्या सुगडय़ांमध्ये.. ही छोटी छोटी वीस-पंचवीस झाडे एवढी गोड दिसतात की घरसजावटीसाठी अन्य वस्तूंचा विचारही मी करू शकत नाही. श्रीमंत निसर्गाने एक पैसाही न घेता माझ्या घराची शान वाढवली आहे.
माझ्या घरातला दुसरा अलंकार आहे माझा छोटासा पाण्याचा कारंजा! एका रस्त्याच्या बाजूला मला राजस्थानी लोकांनी विक्रीस ठेवलेले मातीचे पसरट, कोरीव काम असलेले भांडे, कासव आणि गवळणीची मूर्ती मिळाली. त्या सर्वाना घेऊन एक कारंजाची मोटर आणून मीठ-मिरी ठेवण्याचे जोकरच्या आकाराचे भांडे ठेवून त्यावर कंदिलाची काच ठेवून कारंजा तयार केला आहे. शांततेत वाहणाऱ्या पाण्याचा नाद खूप समाधान देतो.
माझ्या घरातील ही निसर्ग हिरवाई माझं मन सदैव प्रसन्न ठेवणारे खरे सखे-सोबती आहेत.