नाशिक शहराच्या वाढीसाठी चौफेर असणारा वाव, प्रमुख शहरांशी दळणवळणाच्या
दृष्टीने असणारी सुविधा, शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्टय़ा होणारा विकास, नैसर्गिक शुद्ध हवा.. या कारणांसाठीच मुंबई, पुण्याची मंडळी ‘सेकंड होम’साठी नाशिकचा प्रामुख्याने विचार करू लागली आहेत.
भौगोलिक स्थान, दळणवळणाच्या सुविधा, महाराष्ट्रातील अन्य बडय़ा शहरांशी जोडली गेलेली नाळ; अशा अनेकविध कारणांमुळे लोकांमध्ये नाशिकचे आकर्षण वाढत आहे. परिणामी नाशिकमध्ये आपले किमान एकतरी घर असावे असे अन्य शहरांमधील लोकांना वाटू लागले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक बडे गृहप्रकल्प नाशिकमध्ये आकारास येत असून, त्यामुळे नाशिकची आगळीवेगळी ओळखही निर्माण होऊ पाहात आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिले जात असलेल्या मुंबईचे; आणि महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणून पुणे या शहरांचे स्थान अबाधित आहे. परंतु शहराच्या चौफेर वाढीसाठी हव्या असणाऱ्या सुविधांबाबत या दोन्ही बडय़ा शहरांना मर्यादा येऊ लागल्या आहेत. दिवसेंदिवस इतर राज्यांमधून येणाऱ्या लोंढय़ाचा भार उचलणे अशक्य होत आहे. त्यामुळेच प्रगतीसंदर्भातही या शहरांमध्ये एक साचलेपण आले आहे. प्रचंड वर्दळ आणि वाहतुकीमुळे या शहरांमधील वातावरणासही फटका बसला आहे. त्यामुळेच सर्व भौतिक सुविधांसह नैसर्गिक वातावरणाची साथ मिळणाऱ्या ठिकाणांचा शोध या शहरांमधील नागरिक घेऊ लागले. त्यासाठी या दोन्ही शहरांपासून साधारणपणे १९० किलोमीटरवर असलेल्या नाशिकला पसंती देण्यात दिली जात आहे. शहराच्या वाढीसाठी चौफेर असणारा वाव, सर्वच प्रमुख शहरांशी दळणवळणाच्या दृष्टीने असणारी सुविधा, शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्टय़ा होत असणारा विकास आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण म्हणजे नैसर्गिक शुद्ध हवा. नाशिककडे आकर्षित होण्यासाठी हे सर्वकाही पुरेसे आहे.
या कारणांमुळेच मुंबई, पुण्याची मंडळी ‘सेकंड होम’साठी नाशिकचा प्रामुख्याने विचार करू लागली आहेत. सर्व सुविधायुक्त ‘टाऊनशिप’ ही संकल्पना शहरात वाढीस लागली असून, त्याअंतर्गत अनेक प्रसिद्ध विकासक नाशिकमध्ये पाय रोवू लागले आहेत. आरामदायी सदनिकांना आता सर्वच स्तरातून मागणी वाढू लागल्याने त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड हा परिसर अशा सदनिकांसाठी आणि बंगल्यांसाठी ओळखला जातो. सदनिका खरेदीसाठी शहरातील सर्वाधिक दर याच भागांमध्ये आहे. साडेचार हजार ते साडेसहा हजार रुपये प्रतिस्क्वेअर फूट असा या भागातील दर आहे. अशोक स्तंभापासून तर थेट गंगापूर गावापर्यंत आलिशान गृहप्रकल्प या परिसरात दिसतील. या भागात असलेली वाहतूक व्यवस्था आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे हे त्यासाठी विशेष कारणीभूत म्हणता येईल. याशिवाय शहरातील इतर भागांत साडेचार ते साडेपाच हजार रुपये प्रतिस्क्वेअर फूट असा सदनिकांना भाव आहे. सर्व प्रकारच्या सुविधांचे ‘पॅकेज’ असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या संख्येतही वाढ होत आहे. स्वतंत्र पार्किंग, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मंदिर, सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारची व्यवस्था देण्याकडे विकासकांचा अधिक कल आहे. ज्याप्रमाणे सुविधा त्याप्रमाणे सदनिकांच्या किमती वाढविल्या जात आहेत. मध्यमवर्गीयांनाही किमती परवडण्यासाठी बडय़ा विकासकांकडून सवलतींची खैरात केली जात आहे. प्रकल्पांचे भूमिपूजन होण्याआधीच नोंदणी करणाऱ्या पहिल्या २० किंवा ५० ग्राहकांची सर्व प्रकारच्या करांपासून मुक्तता, सोडत पद्धतीत नंबर लागल्यास कार किंवा इतर वस्तू जिंकण्याची संधी अशा प्रकारचे आमिष दाखविले जात असून, ग्राहकांची मानसिकता हेरून विकासकांकडून सर्व प्रकारच्या फंडय़ांचा वापर केला जात आहे.
मखमलाबाद नाका, पाथर्डी, इंदिरानगर, देवळाली, औरंगाबाद रोड हा भागही झपाटय़ाने विकसित होत आहे. शहरातील इमारतींसाठी असणारी २० मीटर उंचीची मर्यादा आता ४० मीटपर्यंत वाढविण्यात आल्याने त्याचा परिणाम या भागात अधिक प्रमाणावर दिसू लागला आहे. एरवी अधिकाधिक सात मजल्यांपर्यंत असणाऱ्या इमारती आता तेरा मजल्यांपर्यंत पोहोचल्याने विशाल इमारतींची संख्या वाढू लागली आहे. नाशिकमधील मालमत्ता- मग ती कोणत्याही प्रकारची असो, दिवसेंदिवस तिच्या भावात वाढ होत असल्याने एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही नाशिककडे पाहिले जात आहे. याच कारणामुळे आज नाशिक शहरात मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत निम्म्याहून अधिक मुंबई आणि पुण्याची मंडळी आहेत. मुंबई आणि पुण्यातील महागडय़ा वास्तूपेक्षा नाशिकमध्ये घर घेणे या मंडळींना अगदी सहजगत्या परवडण्यासारखे असते.
महाराष्ट्रातील बहुतेक शहरांना अलीकडे पाणीटंचाईची समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावू लागली आहे. निम्म्या मुंबईची तहान भागविण्याचे काम तर नाशिक जिल्ह्यातील एकटा इगतपुरी तालुका करतो. तरीही उन्हाळ्यात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये पाणीपुरवठय़ात कपात करण्याची वेळ येते. या पाश्र्वभूमीवर नाशिककर हे समाधानी म्हटले पाहिजेत. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी गोदावरी नाशिककरांची तहान भागविण्यास सक्षम आहे. गोदावरीवर बांधण्यात आलेले गंगापूर धरण अपवाद वगळता दरवर्षी शंभर टक्के भरतेच. त्यामुळे नाशिकला टंचाईच्या समस्येस फारसे सामोरे जावे लागत नाही. इतर शहरांमधील विकासकांचे लक्ष नाशिककडे येण्याचे हेही एक महत्त्वपूर्ण कारण होय. त्याशिवाय औद्योगिकदृष्टय़ा होत असलेली प्रगती नाशिकमध्ये स्थायिक होण्यासाठी आकर्षित करत आहे. औद्योगिकतेशिवाय कांदा, द्राक्ष, डाळिंबांमुळे नाशिक कृषी क्षेत्रातही अग्रेसर होऊ पाहात आहे. द्राक्षांपासून तयार होणाऱ्या ‘वाइन’मुळे तर नाशिकची ‘वाइन खोरे’ म्हणून प्रसिद्धी झाली आहे. याशिवाय तीर्थक्षेत्र, उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था, या सर्व कारणांमुळे नाशिक गुंतवणुकीसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे. नाशिकबाहेरील ३० पेक्षा अधिक बडय़ा विकासकांनी त्यामुळेच नाशिकमध्ये प्रकल्प सुरू केले आहेत. अशा वाढत्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या विकासासही हातभार लागत आहे.