अतुल साठेआपण थोडे जरी संवेदनशील असलो तरी शहरातसुद्धा अगदी आपल्या बाल्कनीतून दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या व जाणवणाऱ्या निसर्गाची अनुभूती आपल्याला नक्कीच येईल. सगळ्या कुटुंबाकरता आनंद, करमणूक व ज्ञान देणारा हा एक हिरवागार पर्याय आहे.
बहुतांश लोकांना निसर्गाबद्दल एक सुप्त ओढ असतेच. पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा सुगंध, नखशिखांत बहरलेला गुलमोहर, पक्ष्यांचा किलबिलाट, श्रावणात अवचित दिसणारं इंद्रधनुष्य किंवा संध्याकाळच्या वाऱ्यावर ऐकू येणारी िपपळपानांची सळसळ.. अशा अनुभवांनंतर काहीच न वाटणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ असतील. काही जण निसर्गाच्या सुप्त ओढीला हौसेच्या रूपात छायाचित्रण, लिखाण, पक्षी निरीक्षण किंवा जंगलभ्रमण अशा प्रकारे व्यक्त करतात, तर काही मोजके लोक या ओढीला आपल्या रोजीरोटीचं साधन बनवू शकतात. आज आपल्या शहरांमध्ये टोलेजंग इमारतींच्या विळख्यात निसर्ग झपाटय़ाने नष्ट होतोय व जो शिल्लक आहे तो पाहायला बहुतांश लोकांना रोजच्या धकाधकीतून वेळ आणि उत्साहच राहात नाही. ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी निसर्ग टिकून असला तरी, तिथेही चंगळवादाने लोकांची अभिरुची बदलत चालली आहे. आजूबाजूला असलेल्या निसर्गाचं महत्त्व व सौंदर्य अनेकांना जाणवतच नाही.
परंतु आपण थोडे जरी संवेदनशील असलो तर शहरातसुद्धा अगदी आपल्या बाल्कनीतून दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या व जाणवणाऱ्या निसर्गाची अनुभूती आपल्याला नक्कीच मिळेल. संपूर्ण कुटुंबाकरता आनंद, करमणूक व ज्ञान देणारा हा एक हिरवागार पर्याय आहे. मुंबईच्या उपनगरात घराच्या बाल्कनीतून मी आत्तापर्यंत ४० प्रकारचे पक्षी नोंदवले आहेत. तसेच आमच्या सुदैवाने व प्रयत्नाने सभोवार िपपळ, देशी बदाम, आंबा, सोनमोहर, जांभूळ, विलायती शिरीष, गुलमोहर, बकान नीम, कडुिलब, शेवगा, नारळ, असूपालव (ज्याला आपण चुकून अशोक म्हणतो) व चाफा असे तरुवर उभे आहेत. विविध ऋतूंत व वेळांना मी बाल्कनीतून नित्यनवीन निसर्गशोभा अनुभवत असतो. पावसाळ्यात तर या सौंदर्यात अधिकच भर पडते. कामाच्या दिवशी सकाळी पाच मिनिटं आणि सुट्टीच्या दिवशी निवांतपणे मी या आनंदात रममाण होत असतो. या आनंदाची एक झलक प्रस्तुत लेखातून आपल्यासमोर मांडत आहे.
पावसाळ्यापूर्वी कावळे घरटी बांधण्यात मग्न असतात. मी अनेक र्वष पाहतोय की विविध लांबीच्या काडय़ा गोळा करून एक ओबडधोबड, पण मजबूत घरटं समोरच्या बदामाच्या झाडावर बांधलं जातं. या वर्षी मोठय़ा पानांच्या छायेत घरटं बांधलं होतं आणि पारंपरिक ज्ञानाला पुष्टी देत यंदा दमदार पाऊस पडतोय! उन्हाळ्यात मान वाकडी करून बाल्कनीतल्या कुंडीखालच्या ताटलीतलं पाणी पिणारा तहानलेला कावळा आणि तिघा-चौघांच्या गटाने लहान पक्ष्यांवर हल्ला करणारा कावळा अशी या पक्ष्याची दोन भिन्न रूपं अनेकदा पाहायला मिळतात.
नवीन इमारतींच्या बांधकामशैलीत घरटी करायला खूप जागा आयतीच मिळत असल्याने कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे व अधेमधे घरात शिरून ती उच्छाद आणतात. मध्यंतरी चिमण्यांची संख्या फारच रोडावली होती. अलीकडे त्यांचा मंजूळ चिवचिवाट पुन्हा एकदा ऐकू येऊ लागलाय. याच चिमण्या कुंडीत पेरलेल्या धान्यांतून इवल्याशा रोपाने डोकं वर काढलं की लगेच ते खाऊन टाकतात. रोज एकदा तरी साळुंक्यांची जोडी बाल्कनीपुढील छपरावर येऊन बसते. कलकलाट करून त्या आपल्याला चिडवत आहेत असं वाटतं. फार क्वचित वरून काळी, पोट पांढरं व चोचीजवळ भगवा रंग असणारी कवडी मना दिसते. काही वर्षांपूर्वी फिक्या गुलाबी रंगाच्या स्थलांतरित पळस मनासुद्धा मोठय़ा थव्याने जवळच्या िपपळावर उतरलेल्या पहिल्या आहेत.
अनेक वेळा ४-५ पोपटांचा थवा ‘चीर चीर’ आवाज करत वरून उडत जातो. मुंबईकरांच्या रोजच्या लोकल प्रवासाची आठवण करून देतात ते रोज अप-डाऊन करणारे बगळे. सकाळी बगळ्यांचे थवे उपनगरातील जंगल व मोठी झाडं असलेल्या भागातून खाडय़ांकडे जाताना दिसतात; तर सायंकाळी हेच थवे विरुद्ध दिशेने वस्तीच्या झाडांकडे परत येतात. पावसाळ्यात काळ्या ढगांच्या पाश्र्वभूमीवर ते फारच उठून दिसतात. बगळे परत येत असताना वंचक खाडय़ांकडे उडत जात असतात ते रात्री तिथे खाद्य शोधण्याकरता.
एखाद्या शांत दुपारी ‘कुककुक’ असा ओरडणारा तांबट आपलं लक्ष वेधून घेतो. वसंत ऋतू व उन्हाळ्यात दयाळ सुमधुर आवाजात लांबलचक शीळ घालत असतो. पावसाळ्यात त्याची शीळ छोटीशी पण तितकीच गोड असते. वर्षभर बुलबुलचं गायन मनाला सुखावत असतं. चिमणीपेक्षा लहान िशपी ‘टोवीट टोवीट’ असा खणखणीत ओरडत फांद्यांवरून उडय़ा मारताना दिसतो. आंबा मोहरण्याचा व पिवळा जर्द हळद्या दिसण्याचा काळ एकच असतो. उन्हाळ्यात आलेली हळद्याची पिवळी पिसं पावसाळ्यातही काही प्रमाणात दिसून येतात.
स्थानिक स्थलांतर करणारा कावळ्याहून लहान शिक्रा हा शिकारी पक्षी ठराविक ऋतूत आपल्या आवाजाने लक्ष वेधून घेतो. क्वचित डोक्यावर पट्टेरी तुरा असलेला फिका तपकिरी हुदहुद पटांगणात काही खाद्य मिळतंय का पाहायला येतो. याशिवाय खंडय़ा, पाकोळी, घार, नाचण, फुलटोच्या व कोतवाल असे पक्षीगण दर्शन देतच असतात किंवा आपल्या वैशिष्टय़पूर्ण आवाजाने अस्तित्व जाणवून देतात. हवेत एकाच जागी आपल्या पारदर्शक पंखांवर तरंगणारे चतुर आणि रंगीबेरंगी फुलपाखरं जी लहान मुलांकरता नेहमीच एक आकर्षण असतात, ती आमच्या बाल्कनीतून नेहमी दिसतात. रात्रीच्या वेळी किचकिचाट करणारी मोठी वटवाघळं (फ्लाइंग फॉक्स) गूढपणे आपले विशाल पंख फडकावत उडताना दिसतात. अधे-मधे पिपीस्ट्रील हे छोटय़ा जातीचं वटवाघूळ दृष्टीस पडतं. गेल्या काही वर्षांत आमच्या भागात खारींची संख्या लक्षणीय वाढली आहे. कुंडीतल्या गोकर्णची फुलं व शेंगा आपल्या इवल्याशा पंजांत पकडून खाताना त्या गोंडस दिसतात. अलीकडेच सोनटक्क्याचा नवीन आलेला कोंबही या खादाड खारींनी कुरतडला. पूर्वी आमच्या इमारतीजवळ पाणथळ असताना विविध आकारचे बेडूक व निरनिराळे साप पावसाळ्यात नेहमी दिसत. काही मोठय़ा जातीचे बेडूक आकर्षक फिक्या हिरव्या रंगाचे असत. शिशिरातील पानगळ, वसंतातील नवी पालवी व विविधरंगी फुलोरा, उन्हाळ्यातील मोहर, पावसाळ्यातील भरजरी हिरवा साज आणि नेहमीची वाऱ्यावरची सळसळ अशा अनेक रूपांत वृक्षांच्या दुनियेतील नवलाई खुणावत असते. वसंत ऋतूत िपपळ, सोनमोहर व आंब्याला नवीन पोपटी किंवा तांबूस पालवी आली की ही झाडं शालू नेसलेल्या सुंदर तरुणीसारखी दिसतात! देशी बदामाचं झाड लांबून पाहिलं की इडली करायच्या पात्रासारख्या याच्या सर्व बाजूला ३-४ स्थरात वाढलेल्या फांद्या दिसतात. याच्या नाजूक पांढऱ्या फुलांवर असंख्य कीटक रुंजी घालत असतात. याची हिरवी फळे लहानपणी आम्ही दगडाने ठेचून उकलून खायचो.
उन्हाळ्यात आंब्याच्या मोहराचा घमघमाट जाणवल्याशिवाय राहात नाही. आमच्या इमारतीच्या आवारातील तीन रायवळ आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांपासून बनलेलं पन्ह व आंबेडाळ आम्ही दरवर्षी खातो. जांभळं पिकली की त्यांचा खालच्या रस्त्यावर सडा पडतो व तो रंगून जातो. बकान नीमच्या झाडाला येणारी नाजूक पांढरट जांभळी फुलं सुंदर दिसतात, तर शेवग्याची पांढरी फुलं लगेच नजरेत भरतात. विलायती शिरीषच्या गडद हिरव्या अफाट पसाऱ्यावर तंतुमय गुलाबी फुलं उठून दिसतात. सोनमोहरची पिवळी धम्मक पॉपकॉर्नसारखी फुलं वातावरण तेजस्वी बनवतात. पावसाळ्यात भरभरून येणारी लाल व पांढऱ्या चाफ्याची फुलं अनेक लोक पूजेसाठी घेऊन जाताना दिसतात.
निसर्ग अनुभवण्याचा कळस म्हणजे पावसाळ्यापूर्वी दिसणारा संध्याकाळचा शेंदरी प्रकाश, मे महिन्यातील ऊन-मळभीचा खेळ, धोधो पावसात स्तब्ध उभी असलेली झाडं, श्रावणात घटकेत येऊन जाणारा पाऊस व त्यानंतरच्या उन्हात दिसणारी ताजीतवानी रसरशीत पानं. सृष्टीच्या अशा असंख्य लीला अवती-भवती चालू असतात. आपल्या मनात इच्छा असेल आणि थोडं खिडकीबाहेर पाहण्यासाठी वेळ काढला तर दैनंदिन आयुष्यात एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती पुन्हा पुन्हा मिळत राहील, यात शंका नाही.