गेल्या काही वर्षांमध्ये किंवा दोन-तीन दशकांमध्ये आपल्या बाजारात पाश्चात्त्य देशात दिसणाऱ्या अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. जर्मन किचन किंवा युरोपियन किचनच्या जाहिराती जागोजागी दिसतात. त्यांच्या स्वयंपाकघरात असणारी आकर्षक स्वरूपातील टेफ्लान या द्रव्याचा लेप दिलेली विविध भांडी आपल्याकडे कधी लोकप्रिय झाली हे लक्षातही आले नाही. टेफ्लान लेपाच्या तव्यात डोसे छान होतात यावर अनेक गृहिणींचे एकमत (!) झालेले देखील
दिसले. मात्र, किमतीत त्यासाठी भरपूर पैसे
मोजावे लागतात हे हळूहळू लक्षात येऊ  लागले. शिवाय ही भांडी घासण्याचे काम जिकिरीचे आहे या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष झाले किंवा त्यातील बारकावे न समजल्यामुळे अशा उपकरणांमुळे काय त्रास होऊ  शकतो हे फारसे लक्षात आलेच नाही. युरोपातील किंवा अमेरिकेतील स्वयंपाक संस्कृती आणि खाण्याच्या सवयी ह्या आपल्यापेक्षा फार वेगळ्या आहेत हे लक्षात न घेता आपण हे बदल स्वीकारत गेलो. पण या दोन भिन्न पद्धती जर एकत्र आल्या तर काय होऊ  शकते, हाच नेमका विचार वाचकांपुढे मांडायचा आहे.
प्रगत देशांमध्ये गृहिणी स्वयंपाकघरात फारसा वेळ खर्च करीत नाहीत. कारण आपल्यासारखा स्वयंपाक त्यांना करावाच लागत नाही. बहुतेक अन्नपदार्थ तयार स्वरूपात किंवा अर्धपक्व  स्थितीत त्यांच्या बाजारात उपलब्ध असतात. तयार अन्नाची पाकिटे आणावयाची व गरम करून खायची किंवा फार तर थोडेफार शिजवायचे यावर त्यांचा स्वयंपाक पूर्ण होतो. मायक्रोवेव्ह ओव्हन्स, कुकिंग रेंज म्हणजेच विविधगुणी शेगडय़ा आणि शीतपेटय़ा (रेफ्रिजरेटर) त्यांच्या स्वयंपाकघरांची गरज लक्षात घेऊन विकसित करण्यात आले; तशीच टेफ्लानचा लेप दिलेली भांडी त्यांच्याच गरजा लक्षात ठेवून विकसित केली गेली, हे सत्य आपण लक्षात घ्यावयाचे आहे. तळणे, फोडण्या देणे, खरपूस भाजणे, परतणे अशासारख्या पाककृती त्यांच्याकडे नसतात. आपल्याकडे मात्र भाज्या धुऊन घेऊन सोलणे किंवा निवडणे, तांदूळ निवडणे, कणीक चाळणे व भिजविणे, पोळ्या लाटणे व भाजणे, पुऱ्या तळणे, विविध पद्धतीच्या चटण्या करणे, आमटीला फोडणी घालणे, भजी, पापड, समोसे, वडे इत्यादी गोष्टी तळणे, वांगी भाजणे, थालीपीठे तेलात लावणे, कोथिंबीर निवडणे, काकडी चोचणे व तिची कोशिंबीर करणे यासारखा शाकाहारी किंवा त्यापेक्षाही कठीण असलेला मांसाहारी स्वयंपाक बनविण्यासाठी २ ते ३ तास तरी वेळ स्वयंपाकघरात आपल्या गृहिणींना खर्च करावा लागतो व बऱ्याच वेळा निरुपायाने किंवा आलिया भोगासी असे म्हणत त्यांना ते स्वीकारावेच लागते.
अशा भिन्न प्रकारच्या स्वयंपाकाच्या पद्धती अस्तित्वात आहेत तेव्हा या पद्धतींमध्ये जी आयुधे किंवा उपकरणे वापरायची आहेत त्यात फरक असायलाच हवा, असे आपल्याला विज्ञान सांगेल यात शंकाच नाही. टेफ्लानचा लेप दिलेली भांडी बनविण्याचे श्रेय रॉय प्लंकेट नावाच्या शास्त्रज्ञाला जाते. जसे विज्ञानातील अनेक शोध अपघाताने लागतात तसाच टेफ्लानचा लेप दिलेली भांडी बनविण्याचा शोध देखील अपघातानेच लागला, असे म्हणावयास हरकत नाही. शीतपेटीमध्ये कोणता थंडक अधिक क्षमतेने वापरता येईल यावर त्यांचे संशोधन चालू होते व त्यासाठी ते वेगवेगळ्या पदार्थाच्या चाचण्या घेत होते. टेट्राफ्ल्युरोएथिलिन नावाचा वायुरूप पदार्थ त्याच्या विविध गुणधर्मामुळे त्यांनी निवडला व त्याचे प्रयोग सुरू केले.
एके दिवशी संध्याकाळी त्यांनी त्या वायूचे हवेशी मिश्रण करून घर गाठले. दुसऱ्या दिवशी प्रयोगशाळेत जेव्हा ते आले त्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ते मिश्रण गायब झाले होते व त्या परीक्षा नळीत त्यांना पांढरी स्फटिकीय भुकटी त्यात सापडली. थोडय़ा अभ्यासानंतर ही भुकटी म्हणजे टेट्राफ्ल्युरोएथिलिनचे अनेक रेणू एकत्र येऊन त्याचे रूपांतर पॉलीटेट्राफ्ल्युरोएथिलिनमध्ये झाले आहे असे त्यांच्या लक्षात आले. ग्लुकोजचे अनेक रेणू एकत्र आले की स्टार्च किंवा सेल्युलोज बनते तसाच हा काहीसा प्रकार असतो असे म्हणावयास हरकत नाही. या संशोधनाचे पेटंट त्यांना १९४१ साली मिळाले होते. या पेटंटवर आधारित टेफ्लान नावाच्या पदार्थाची निर्मिती डय़ू पॉन्ट नावाच्या कंपनीने सुरू केली. या पदार्थाला काहीच चिकटत नाही हा त्याचा एक असाधारण असा गुणधर्म होता. पण या पदार्थाचा वापर स्वयंपाकाची भांडी किंवा उपकरणावर लेप देण्यासाठी म्हणून करावा असे त्यावेळी त्यांना वाटले नाही. तसा वापर करावा
असा हट्ट मार्क ग्रेगरी नावाच्या फ्रेंच अभियंत्याच्या पत्नीने त्याच्याजवळ धरला. कारण या पदार्थाचा जो गळ मासे पकडण्यासाठी म्हणून मार्क वापरत
होता त्याला काहीही चिकटत नाही व तो खराब होत नाही असे तिच्या लक्षात आले होते. म्हणजेच रोजच्या जीवनात निरीक्षण किती महत्त्वाचे असते हे तिने सिद्ध केले! १९५४ मध्ये या अभियंत्याने मग आपल्या पत्नीचा हा हट्ट पुरा करण्यासाठी टेफल म्हणजे
टेफ्लान व अल्युमिनियम यांचा जोडपदार्थ तयार करून त्याची भांडी त्यांनी बनविली. १९६१ साली अमेरिकेत ही उपकरणे बाजारात आली. १९९० मध्ये विकिरणाने त्यावर प्रक्रिया करून त्यातील रेणूबंध अधिक घट्ट बनविले गेले व ह्या पदार्थाने स्वयंपाकघरावर पूर्ण कब्जा मिळविला असे म्हणावयास हरकत नाही.
टेफ्लानच्या रचनेत अशी कोणती जादू आहे की पदार्थ त्याला चिकटून बसत नाहीत? टेट्राफ्ल्युरोएथिलिन म्हणजे कार्बन व फ्ल्युओरिन या अणूंनी बनलेला हा रेणू आहे. यातील फ्ल्युओरिनचे अणू कार्बनच्या अणूंचे संरक्षक कवच म्हणून कार्य करतात. तेल किंवा इतर कोणत्याही पदार्थाची कार्बनच्या रेणूंशी कसलीच आंतरक्रिया हे फ्ल्युओरिनचे अणू होऊ  देत नाहीत. त्यामुळे हे पदार्थ भांडय़ाच्या पृष्ठभागाला चिकटत नाहीत. फ्ल्युओरिनचे अणू टेफ्लानच्या रेणूंना गुळगुळीत बनवितात, त्यामुळे तेलासारखे रेणू टेफ्लानच्या रेणूंना न चिकटता घसरगुंडीवरून घसरावे इतक्या सहजतेने त्यावरून घरंगळत राहातात. टेफ्लानचा लेप दिलेले अल्युमिनियमचे उपकरण म्हणूनच झपाटय़ाने लोकप्रिय होत गेले.
आता असा प्रश्न पडू शकेल की टेफ्लानच्या रेणूंना तेल किंवा इतर अन्नपदार्थ चिकटत नाहीत, तर मग त्याचा लेप अ‍ॅल्युमिनियम किंवा इतर धातूंच्या पृष्ठभागावर कसा चिकटतो? लोखंड रंगविताना जसा त्याला आधी रेड ऑक्साईडचा हात मारतात व मग ते हव्या त्या रंगाने रंगवितात तसाच काहीसा प्रकार या टेफ्लानच्या बाबतीत देखील केला जातो. एका विशिष्ट रसायनाचा थर अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांडय़ावर आधी देऊन मग त्यावर टेफ्लानचा थर चढविला जातो. त्यानंतर ते भांडे ४३०अंश सेल्सियस तापमानाला ३ ते ५ मिनिटे तापवितात. त्यामुळे
सर्व थर एकमेकाला अगदी पक्के चिकटून जातात व भांडय़ाच्या आतील बाजूस बसलेला टेफ्लानचा थर मग आपली किमया दाखविण्यास सुरुवात करतो. या थरांचे प्रत्येक कंपनीचे प्रमाण वेगवेगळे असू शकते, त्यामुळे त्यांच्या किमतीत फरक पडू शकतो. त्यावर त्यांचा टिकाऊपणादेखील अवलंबून असतो.  या भांडय़ांची आणि उपकरणांची कार्यक्षमता या विविध थरांच्या एकसंधपणावर व एकजिनसीपणावर अवलंबून असते असे आतापर्यंतच्या चर्चेवरून लक्षात आले असेलच.  ही भांडी जर खूप तापविली तर हे विविध थर तुटू शकतात व त्यांचे अंश मग अन्नात मिसळू शकतात. या भांडय़ांमध्ये वडे, समोसे, करंज्या किंवा चकल्या का तळायच्या नाहीत हे आता वाचकांच्या सहजपणे लक्षात येईल. कारण सातत्याने तळत राहण्यासाठी आपल्याला भांडे त त्यातील
तेल सारखे तापवत ठेवावे लागते व या उच्च तापमानाला मग गडबड होऊ  शकते. पाश्चात्त्यांच्या स्वयंपाकघरात असे तळणे नसते (म्हणून आपल्या स्वयंपाकाची चवदेखील नसते.) म्हणून ही भांडी
तिथे अगदी वाजवी व योग्य आहेत. इथे आपल्याकडे मात्र वापरायचीच असतील तर तारतम्यानेच ती वापरायला हवीत. ही भांडी स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यावर चरे पडणार नाहीत याची दक्षता आवर्जून घेतली पाहिजे. स्वयंपाक रांधतानासुद्धा धातूचे चमचे किंवा उलथने अथवा झारे वापरू नयेत. तर त्यासाठी लाकडाच्या किंवा टेफ्लानच्याच उपकरणांचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारणपणे हे टेफ्लानचे थर तीन ते पाच वर्षे टिकतात. म्हणजे ३ ते ५ वर्षांनी भांडी बदलणे आपल्याला भाग आहे! वापरा आणि फेका या पाश्चात्त्य संस्कृतीशी सुसंगत हे असेल, पण ते आपल्या संस्कृतीत बसते का याचा विचार करावा लागेल!

नेहमी वापरण्यात असलेल्या टेफ्लानच्या उपकरणांबाबतीत घ्यावयाची काळजी
* या भाडय़ांमध्ये पदार्थ बनविताना ते कमीत कमी तेलात किंवा तुपात बनवावेत. घरातील सदस्यांच्या व भांडय़ांच्या प्रकृतीसाठी ते अगदी योग्य असते!
* या भांडय़ांमध्ये स्वयंपाक करताना मध्यम किंवा मंद ज्योतीचाच वापर करावा. तीव्र ज्योतीचा वापर केला तर भांडय़ाचे तापमान भरभर वाढते. त्यामुळे भांडय़ातील विविध थरांची रचना बिघडू शकते. अशा भांडय़ाचे एकजिनसीपण टिकविणे मग अवघड होऊन बसते.
* रिकामे भांडे पेटत्या शेगडीवर ठेवून सामानाची जुळवाजुळव करू नये, अन्यथा भांडे तापत राहते.
* टेफ्लानच्या तव्यावर डोसा किंवा भाकरी अथवा पोळी करताना ती उलटण्यासाठी लाकडाचा किंवा टेफ्लानचा सराटा वापरावा.
डॉ. शरद काळे -sharadkale@gmail.com
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र