माणूस हा समूहाने राहणारा प्राणी आहे असे आपण नेहमी म्हणत असलो, तरी घरांच्या समस्येचा विचार करताना आपण सामूहिक गरजांचा विचार क्वचितच करतो. शंभर वर्षांपूर्वी किंवा त्याआधी मात्र सामूहिक गरजांचा विचार करून घरे बांधली जात असत. उदाहरणार्थ, चाळींमध्ये सामूहिकरीत्या वापरल्या जाणाऱ्या लांब-रुंद गॅलरीला तेथे राहणाऱ्या सर्वाच्याच जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असे. घरात जाण्या-येण्यासाठी त्याचा वापर होत असे. शिवाय मुलांना खेळण्यासाठी, मोठय़ांना एकमेकांशी बोलण्यासाठी, बायकांना गप्पा मारण्यासाठी, कपडे वळत घालण्यासाठी, पाण्याची पिंपे, सामानाच्या मोठय़ा पेटय़ा ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होत असे. अनेकदा तर रात्री व दिवसा झोपण्यासाठी लोक त्यांचा वापर करीत. शिवाय फुलझाडांची हौस काहींना भागविता येत असे; तर गणपती, दिवाळी आणि इतर सामूहिक उत्सवांच्या काळात त्यांचा वापर प्रेक्षक-गॅलरी म्हणून होत असे. सामूहिक गॅलरीचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक महत्त्व मोठे होते. पु. ल. देशपांडे व इतर अनेक लोकांच्या लिखाणातून त्याचे सुंदर वर्णन आपण आवडीने वाचतो.
चाळींमध्ये सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक नळ असत. काही चाळींमध्ये सामूहिक विहिरी, कपडे आणि भांडी धुण्याच्या जागा असत. तेथील अंगण सर्वासाठी उपलब्ध असे. शंभर वर्षांपूर्वी मुंबईमध्ये गरीब लोकांसाठी शासनाने बी.डी.डी. चाळी बांधल्या तेव्हाही तेथे ८ फुटी प्रशस्त सामायिक पॅसेज आणि दोन्ही बाजूला एका खोलीची लहान घरे अशीच व्यवस्था केली होती. वास्तुरचना करताना इमारतींची उंची, रुंदी, दर्शनी बाजू, वास्तुशैली याबाबत सामूहिकतेला महत्त्व असे. त्यामुळेच मरीन ड्राइव्हसारखा भाग सुंदर दिसे. अनेक वैयक्तिक गरजा सामूहिक सोयींमुळे भागत. त्याद्वारे सामूहिक जीवन समृद्ध होत असे. मात्र खाजगीपणा जोपासणे तेथे अवघडच असे. सामूहिक भांडण-तंटेही होत असत. असे असूनही चाळी, वाडे, वाडय़ा अशासारख्या इमारतींच्या प्रकारांमुळे सामूहिक आणि वैयक्तिक जीवनात एक समतोल राहत असे.
आज शहरातील अनेक कुटुंबे समृद्ध झाली आहेत. इमारतींच्या नव्या रचनेमुळे अनेक बाबतीत गरीब लोकांनाही स्वत:चे स्वातंत्र्य आणि खाजगीपणा जपणे शक्य झाले आहे. मुख्य म्हणजे पाणी, शौचालय, बाथरूम अशा सोयी प्रत्येक घरात करता येत असल्यामुळे त्याबाबतीत सामूहिक जागांची गरज कमी झाली आहे.
याच काळात सामूहिकदृष्टय़ा मात्र आपण अतिशय दरिद्री नव्हे आंधळेच झालो आहोत, असे म्हणावेसे वाटते. आजकाल जुन्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्बाधणीच्या प्रकल्पांच्या संदर्भात ज्या मागण्या तेथील रहिवासी करीत असतात त्यातून हे सहजपणे प्रत्ययाला येते. अशा प्रकल्पांमध्ये प्रत्येकाला घर मोठे हवे असते. गाडीसाठी वाहनतळ हवा असतो, पण जिने, पॅसेज, अशा सामायिक जागा कमीत कमी हव्या असतात. मात्र नव्या इमारतींच्या भोवती हवा-उजेडासाठी पुरेशी मोकळी जागा असावी, मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या, सुरक्षित जागा असाव्यात, लोकांना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी गॅलरी नाही तरी छोटा बगीचा किंवा सावली देणारी जागा असावी, सामायिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणेची सोय असावी, नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे असावीत, घरात, संकुलात काम करणाऱ्या मोलकरणी, सुरक्षारक्षकांसाठी, गाडीचे ड्रायव्हर, सफाई, माळीकाम करणाऱ्या लोकांची सोयही असावी याबाबतीत विचार केला जात नाही.
वास्तवात खाजगी आयुष्य जोपासण्याच्या गरजेबरोबर सामूहिक गरजा वाढतात. त्या भागल्या तरच सर्वाचे खाजगी आणि सामूहिक जीवन सुकर, समृद्ध आणि सुरक्षित होते. मात्र याबाबत जागरुकता दिसत नाही. गेली दोन-तीन दशके घरबांधणीच्या संदर्भात सामूहिक गरजांचा विचार संपूर्णपणे मागे पडला आहे. याचे कारण खाजगी विकासक केवळ नफ्याचा, वास्तुरचनाकार केवळ इमारतीचा, तर ग्राहक केवळ स्वत:च्याच घराचा विचार करतात. म्हणूनच आजच्या आणि भविष्यातील सामूहिक गरजांच्या विचार करणे शासनाला आवश्यक झाले आहे. त्यासाठी चाळींच्या वास्तुशैलीचे पुनरुज्जीवन करावे असे म्हणता येणार नाही.
शासनाने आखलेले समूह विकास धोरण हे आज आवश्यक आहे आणि त्याचे स्वागत करायला हवे. त्यासाठी शासनाने नव्या इमारती आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी वाढीव चटई क्षेत्र दिले आहे. जुन्या इमारतींमधील घरे लहान होती. लोक त्यात दाटीवाटीने राहत. १०० वर्षांपूर्वी मुंबईतील गरीब लोकांच्या चाळींमध्ये सरासरी क्षेत्रफळाचे प्रमाण दरडोई केवळ २५ चौ.फूट इतके होते. बी.डी.डी. चाळी बांधताना ते ४० चौ. फूट असावे असे मानले गेले, तर आता ते किमान ६० मानले जाते. चार माणसांचे घर किमान २५० चौ.फूट असावे असा नियम आता करण्यात आला आहे. घरांचा आकार वाढविण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र आवश्यक आहे. या काळात मध्यम आणि श्रीमंत लोकांच्या घराबाबतच्या अपेक्षा त्यांच्या मिळकतीच्या प्रमाणात वाढल्या आहेत. खाजगी विकासक त्यांच्या त्या अपेक्षा पूर्ण करतात. मात्र गरिबांसाठी घरे बांधली जात नसल्याने शासनाने खाजगी प्रकल्पांना २० टक्के जास्त चटई क्षेत्र देऊन सेवा देणाऱ्या लोकांना २५० चौ.फुटांची घरे उपलब्ध करून देण्यासाठी नियम केला आहे.
घरांसाठी जास्त जागेची अपेक्षा पूर्ण करताना वैयक्तिक आणि सामूहिक गरजा भागविण्यासाठी केलेला हा नियम मध्यम आणि श्रीमंत लोकांना जाचक वाटतो. तो रद्द करण्यासाठी विकासकांच्या नावे काहींनी शासनाला अर्जही दिले आहेत. वास्तवात याच वर्गात आजकाल मुले, वृद्ध, वयस्कर आणि महिलांचे एकाकीपण वाढले असल्याची खंत व्यक्त होते. असे एकाकीपण टीव्ही, भांडी-धुण्याची यंत्रे, टेलिफोन-मोबाइल यांनी कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न फारसे सफल होत नाहीत. त्यासाठी सेवा देणाऱ्या लोकांची गरज वाढली आहे. लोकांचे सान्निध्य, सहवास आणि त्यांच्याशी होणारे संवाद ही सर्वाची मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरज असते. पण हे ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत. मोठी-मोठी घरे आणि वाढीव चटई क्षेत्र आपले वैयक्तिक स्टेटस वाढवीत असली तरी मानसिक आणि सामाजिक खुजेपणा लपवू शकत नाहीत.
सामूहिक जीवन समृद्ध करण्याकडे आपण जास्त लक्ष दिले तर वैयक्तिक कमतरता असूनही सामूहिक समृद्धीचे असंख्य फायदे आपल्या सर्वानाच मिळतील. समूह योजनेचे धोरण हे सर्वात आधी सामूहिक समृद्धीचा विचार करणारे धोरण आहे. त्यात वैयक्तिक घराचा विचार केला जातोच; उदाहरणार्थ घरांच्या संदर्भात सामूहिक नळ किंवा सामूहिक शौचालय व सामूहिक गॅलरी यांचे पुनरुज्जीवन करावे असा काही त्या धोरणामागचा उद्देश अजिबात नाही.
मात्र चाळींमध्ये लांब-रुंद गॅलरी, जी महत्त्वाची भूमिका बजावत असे. त्या भूमिकेसाठी सुयोग्य जागा निर्माण करणे हा समूह धोरणाचा उद्देश आहे. मग ती जागा इमारतींच्या मधील चौक, मधल्या मजल्यावरची सामूहिक गच्ची, बागीचे, जिन्यासमोराच्या मोकळ्या जागा यामुळेही भागू शकेल. म्हणूनच समूह विकास योजनेसाठी जे वाढीव चटई क्षेत्र शासनाने उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपयोग काही प्रमाणात खाजगी आणि काही प्रमाणात सामूहिक गरजा भागविण्यासाठी केला पाहिजे. वाढीव चटई क्षेत्र सामूहिक भल्यासाठी असून ते केवळ विकासकांच्या नफ्यासाठी नाही हे लक्षात घ्यायला हवे.