गृहसंशोधनासाठी ऑनलाइन पोर्टल्स बाजारात आले आणि त्यांनी कोणत्याही मानधनाशिवाय आपल्या गृहशोधात हातभार लावण्यास सुरुवात केली. आता हे माध्यम खूप पुढे गेले आहे. सध्या गृहशोधासाठी ३० टक्के लोक अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. गृहशोध कार्यात मदत करणाऱ्या काही साइट्स आणि पर्यायांविषयी..

घर शोधण्याचे काम हे एकटय़ा-दुकटय़ाने करण्याचे नसून, त्यासाठी मध्यस्थाची गरज भासतेच. पण अनेकदा मध्यस्थांना त्यांच्या कामाचे मानधन देण्यासाठी पैसे खर्च करणे आपल्याला पटत नसते. याला पर्याय म्हणून ऑनलाइन पोर्टल्स बाजारात आले आणि त्यांनी कोणत्याही मानधनाशिवाय आपल्या गृहशोधात हातभार लावण्यास सुरुवात केली. आता हे माध्यम आणखी पुढे गेले आहे. सध्या गृहशोधासाठी ३० टक्के लोक अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. गृहशोध कार्यात मदत करणाऱ्या काही साइट्स आणि पर्यायांविषयी पाहूयात.
https://www.commonfloor.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला घरखरेदीपासून ते घर भाडय़ाने घेण्यापर्यंतचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांचा वापर करून तुम्ही गृहशोध पूर्ण करू शकता. या संकेतस्थळावर पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या मुख्य शहरांमधील गृहशोध पूर्ण करता येऊ शकतो. यात पुनर्विक्रीसाठीची घरे आणि नवीन प्रकल्पांची माहितीही उपलब्ध आहे. यामध्ये घरांच्या माहितीबरोबरच घर विक्रेत्यांचा तपशीलही आपल्याला उपलब्ध होतो. यामुळे संकेतस्थळाची विश्वासार्हता वाढते. सुमित जैन, ललित मंगल आणि विकास मालपाणी या त्रिकुटाने तयार केलेल्या या संकेतस्थळावर विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये आपल्याला घराची संपूर्ण रचना संगणकावर पाहावयास मिळते; तीही अगदी लाइव्ह. म्हणजे आपल्याला एखादे घर पसंत पडले आणि ते घर कसे आहे हे पाहण्यासाठी आपल्याला दरवेळेस त्या ठिकाणी जाणे शक्य होतेच असे नाही. यामुळे संकेतस्थळावर लाइव्ह ३६० हा पर्याय सुरू देण्यात आला आहे. या पर्यायांमध्ये आपण एखादे घर पूर्ण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर कंपनीने कॉमनफ्लोअर रेटिना नावाचे एक उपकरण तयार केले असून, या उपकरणाच्या माध्यमातून आपण एखाद्या घराला आभासी भेटही देऊ शकतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना घराची निवड करण्यासाठी विविध ठिकाणी फिरणे शक्य होत नाही. अशा वेळी या सुविधांचा फायदा घेऊन ग्राहक घर पाहू शकतात. ही सुविधा वापरण्यासाठी हे उपकरण घेतल्यावर मोबाइल फोनमध्ये त्याचे अॅप डाऊनलोड केले की सुविधेचा फायदा घेता येऊ शकतो. यामध्ये कॉमन फ्लोअरतर्फे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ रेकॉर्डिग केले जाते. त्यानंतर ती माहिती अद्ययावत केली जाते. गृहशोध करणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त असून, ती बिल्डरांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे, असे ललित मंगल यांनी स्पष्ट केले.
http://www.indiaproperty.com/ या संकेतस्थळावर देशभरातील २१ मुख्य शहरांमधील विविध प्रकारच्या वास्तूंचा शोध घेता येतो. आपण एकदा शहर निवडले की किमतीनुसार, परिसरानुसार आपण वास्तूंचा शोध घेऊ शकतो. या संकेतस्थळावर गृहशोधाबरोबरच गृहकर्जाची माहितीही दिली जाते. याचबरोबर तुम्हाला जर गृहखरेदीमध्ये काही अडचण असेल किंवा तुम्हाला गृह गुंतवणूक करावयाची असेल तर त्याबाबतचे तज्ज्ञांकडून मिळणारे मार्गदर्शनही संकेतस्थळांच्या माध्यमातून मिळते. संकेतस्थळावर आपण लाइव्ह चॅटही करू शकतो. तसेच संकेतस्थळावरील ब्लॉगमधील मजकूर वाचूनही आपण गृहखरेदी करताना मार्गदर्शनही मिळवू शकतो. या संकेतस्थळावरही आपण घरांची आभासी पाहणी करू शकतो.
https://housing.com/in या संकेतस्थळावर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमधील विविध वास्तूंची माहिती आपल्याला उपलब्ध होते. यामध्ये गृहखरेदी-विक्री किंवा भाडेतत्त्वावरील वास्तूंचीच माहिती उपलब्ध आहे असे नाही, तर यामध्ये पेइंग गेस्ट, वसतिगृह आदींचा तपशीलही उपलब्ध आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही गृहकर्जाविषयी मार्गदर्शन केले जाते. तसेच संकेतस्थळाने नियुक्त केलेल्या विविध तज्ज्ञांशी आपण विविध मुद्दय़ांवर चर्चाही करू शकतो. यामध्ये पेइंग गेस्ट, वसतिगृह, खरेदी, विक्री, नवीन प्रकल्प असे विविध विभाग करण्यात आले आहेत. यामुळे आपल्याला पाहिजे त्या विभागात जाऊन माहिती मिळवणे सोपे जाते. या संकेतस्थळावरही ब्लॉग उपलब्ध असून, यामध्ये वास्तू खरेदी-विक्रीशी संबंधित तपशिलावर लेखन केलेले आहे.
http://www.99acres.com/ या संकेतस्थळावर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांबरोबरच देशातील एकूण १९ मुख्य शहरांमधील घरे, याचबरोबर व्यावसायिक वास्तूंचा शोध घेता येणे शक्य होते. यात विविध विभागांनुसार शोध घेणे शक्य होते. तसेच आपल्या बजेटनुसारही वास्तूचा शोध घेणे शक्य होते. यात पुनर्विक्रीच्या घरांपासून ते नवीन प्रकल्पांपर्यंत सर्वच प्रकारच्या वास्तूंचा समावेश आहे. या साइटमध्ये आपण आपल्याला पसंतीस पडलेल्या एखाद्या वास्तूची माहिती मिळवल्यावर त्या संदर्भात कुणाशी संपर्क साधायचा याचा तपशीलही यात देण्यात आलेला आहे. तसेच आपण निवडलेली वास्तू दलालाला मध्यस्थ ठेवून विक्री करण्यात येणार आहे की थेट विक्री होणार आहे याचा तपशीलही यामध्ये देण्यात येतो. याचबरोबर आपण निवडलेल्या एखाद्या वास्तूशी साधम्र्य साधणाऱ्या पर्यायी वास्तूही यात सुचविल्या जातात. यात आपण आपल्याला कोणत्या विभागात घर हवे आहे, आपले बजेट किती आहे आदी तपशील भरून दिला की त्या संदर्भातील विविध अपडेट्सही आपल्याला ई-मेल तसेच फोनद्वारे कळविले जातात. यात काही सेवा मोफत आहे तर काही सेवा सशुल्कही उपलब्ध होऊ शकतात.
याशिवाय इतर काही संकेतस्थळे
– http://www.makaan.com/
– http://www.magicbricks.com/
– property.sulekha.com
– propertywala.com
– proptiger.com
– realestateindia.com
संकेतस्थळांची विश्वासार्हता
या संकेतस्थळावर जी माहिती दिली जाते ती माहिती घर मालकाने किंवा बिल्डरांनी भरलेली असते. ती तशीच्या तशी माहिती संकेतस्थळावर दिली जाते. या माहितीचा काही तपशील संकेतस्थळांतील संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासून घेतला जातो. यामुळे त्यातील माहितीबाबत विश्वास ठेवता येऊ शकतो. पण ही माहिती पूर्णत: अचूक असेल, अशी जबाबदारी कोणतेही संकेतस्थळ घेत नाहीत. असे असले तरी अद्याप या संकेतस्थळांवरून माहिती मिळवलेल्या घर विक्रेत्याने फसविल्याची प्रकरणं फारशी समोर आलेली नाहीत. व्यवहार करताना दोन्ही पक्ष समोरासमोर येऊन व्यवहार करतात. अनेकदा संकेतस्थळही मध्यस्थाची भूमिका पार पाडतात, यामुळे संकेतस्थळांच्या विश्वासार्हतेला अद्याप तडा गेलेला नाही.
अनेक गोष्टींची माहिती आपल्याला ऑनलाइन मिळत आहे. गृहखरेदी, विक्री यांबाबतही अनेक ऑनलाइन पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.
(टीप – वरील सर्व संकेतस्थळांचे अॅप्सही अॅप बाजारात उपलब्ध आहेत.)
गृहशोधाविषयीच्या काही सर्वेक्षणातील नोंदी
६० टक्के भारतीय स्वत:च्या घराला पसंती देतात, तर ४० टक्के भारतीय भाडय़ाच्या घराला पसंती देतात.
३२ टक्के लोक कुटुंबाची गरज म्हणून घर घेतात, तर १९ टक्के लोक भाडय़ातून होणाऱ्या उत्पन्नासाठी घर खरेदी करतात. ४८ टक्के लोकांना स्वत:ची वास्तू असावी असे वाटते. तर एक टक्का लोक समाजाच्या दडपणाखाली वास्तू खरेदीचा निर्णय घेतात.
स्वत:ला राहण्यासाठी पहिले घर घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल सध्याच्या घरापेक्षा मोठे घर असावे म्हणून घर घेणारे लोक आहेत. तर गुंतवणुकीसाठी घर घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. गुंतवणुकीसाठी घर घेणाऱ्यांचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक ३५ टक्क्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात घर खरेदीचा निर्णय घेण्यासाठी ५७ टक्के लोक सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी घेतात, जो देशातील इतर शहरांच्या तुलनेत खूप जास्त आहे. तर पुण्यात हा निर्णय घेण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा अवधी घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
घर खरेदीसाठी एक कोटीपेक्षा जास्त बजेट असलेल्यांची संख्या १० टक्के आहे, तर ८० लाख ते एक कोटीदरम्यानचे बजेट असलेल्यांची संख्या आठ टक्के आहे. २० ते ४० लाख रुपयांचे बजेट असलेल्यांची संख्या सर्वाधिक ३६ टक्के तर ४० ते ६० लाखांपर्यंतच्या घरांना पसंती देणाऱ्यांची संख्या ३१ टक्के आहे. १५ टक्के लोक ६० ते ८० लाखांपर्यंत आपले बजेट ठेवतात.
लोकांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांच्या आवडीचे घर मिळत नसल्यामुळे घर भाडय़ाने घेणे पसंत केल्याचे ५९ टक्के लोकांनी सांगितले. तर ९ टक्के लोकांना त्यांच्या दरमाह खर्चात काही बदल करण्याची इच्छा नसते. तीन टक्के लोकांना नोकरीसाठी सतत प्रवास करावा लागत असल्यामुळे भाडय़ाचे घर घ्यायचे असते. तर २४ टक्के लोकांना विकतच्या घरापेक्षा भाडय़ाच्या घरात जबाबदाऱ्या कमी असतात असे वाटते. उर्वरित पाच टक्क्यांना मेंटेनन्स आकार भरावे लागत नसल्यामुळे भाडय़ाच्या घरात राहणे आवडते.
(स्रोत : कॉमनफ्लोअर डॉट कॉमचा ‘बाय विरुद्ध रेंट’ हा अहवाल )
नीरज पंडित -niraj.pandit@expressindia.com