ऋतू अंत:साद घालतो. वारा घोंघावतो. नारळाची झावळी अवचित कोसळल्यामुळे अंगणामध्ये हलकल्लोळ माजतो. पावसाची वार्ता घेऊन येणारी मुंग्यांची लांबलचक रांग भिंतीवरून जात असते. आडदांड वाऱ्यामुळे खिडक्यांची दारे आपटतात. पडदे पिंगा घालतात.

पं चक्रोशीत ऋतुराज वसंताचा दिमाखदार मुक्त संचार चालू असतो. गुलमोहर, बहावा, नीलमोहर, चाफा यांच्या रंगवर्षेसोबत आमराईच्या घनदाट पसाऱ्यात नर कोकीळ प्रणयाराधनात शब्दश: आकंठ बुडून पंचम आळवत असतात. घरातल्या जीवघेण्या उकाडय़ाला कंटाळून टेकडीवरच्या वनात जावे तर तिकडे झाडोऱ्यांमध्ये नयनमनोहर पिसारा फुलवून थुईथुई नाचणारे मोर त्यांच्या आर्त केका लांडोरींना प्रणयाचे आवाहन करत असतात; तर रात्री मनातला चकोर चंद्राचे थेंब पिण्यास अधीर..! ‘मेघासी मयूर आणि चंद्रासी चकोर’ यांचा अज्ञात संवादसेतू अंतरिक्षात विहरत राहतो. विरही प्रेमिजनांना वैशाखवणव्याची काहिली असह्य होत असताना थोडासा दिलासा मिळतो, तो अंगणातल्या मोगऱ्याच्या गंधमोहिनीमुळे. काळभान नसलेला आगंतुक वळीव घनव्याकूळ होत दूर कुठेतरी डोंगररांगांवर कोसळल्याची गंधवार्ता घेऊन थंडगार वारा अंगणात येतो. हृदयामध्ये तो मृद्गंध भरभरून घेताना अवघी तृष्णाच विलय पावते. आगंतुकपणे सुख दार ठोठावू लागले तर कशी तारांबळ होते आपली!
वळिवाच्या पावसाने दिलेली धुवाधार सलामी म्हणजे आगामी वर्षांऋतूची सजल-सघन नांदीच! आसपास लांबलेल्या त्या सावळ्याच्या सावल्या ऋतूच्या कधी चाहुली देतात, कधी फसवी झूल पांघरून हूल देतात. पण त्या ऋतुसंधीची घालमेल काय सांगावी? घरीदारी अंधारून आलेले.. आता कोसळणार, आता बरसणार असे वाटत असताना हुलकावणी देत पसार होणारे फसवे पांढरे ढग.. नुसतेच पोकळ आश्वासन. दुपारीच संध्याकाळ झाल्याचा भास आणि घरात एक सुनसान उदासी झाकलेली असते. खिडकीतून घरात येणाऱ्या फिकट सावळ्या प्रकाशाला मृद्गंधाचा लेप. उदयही नाही आणि अस्तही नाही असा मधलाच कोंदाटलेला प्रहर. पाऊस आणि घर यांमध्ये जणू काळ थबकल्यासारखा. स्तब्ध. नीरव. मनात फक्त कवितेचे शब्द-
‘दुपारीच कशी बरे होई संध्याकाळ?
ऊन दडे मेघाआड.. फिकट आभाळ
घरामध्ये दाटला हा सावळा प्रकाश
वेगळेच होई जग, वेगळेच भासऽ’
अशा वेळी चार भिंतीत बसून राहणे शक्य तरी असते का? ऋतू अंत:साद घालतो. वारा घोंघावतो. नारळाची झावळी अवचित कोसळल्यामुळे अंगणामध्ये हलकल्लोळ माजतो. पावसाची वार्ता घेऊन येणारी मुंग्यांची लांबलचक रांग भिंतीवरून जात असते. आडदांड वाऱ्यामुळे खिडक्यांची दारे आपटतात. पडदे पिंगा घालतात. खिडकीवर झुकलेली मधुमालतीची सपुष्प फांदी दंगा करते. जाईची काळीसावळी कांती शहारते. जुईचा नाजूक पोपटी पोत थरथरतो. पारिजातकाला केशरी डोहाळे लागतात. कमरेत झुकून वाऱ्याच्या तालावर डोलणारी कण्हेर. त्यातच पाखरांचा धिंगाणा. सोबत अंगणातला पाचोळा भिरभिरत उडत खिडक्या-दारांतून घरात येतो. मला बाहेर बोलावतो. अशा वेळी घरात बसवते का?
‘कशी बसू घरामध्ये? अंगणाची साद..
किलबिल चोचीमध्ये अवखळ नाद..
पानापानांवर कसा रेंगाळला काळ?
वेष पालटून आला जणू काही माळ..!’
वेष पालटून आलेल्या ऋतूचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच. पाऊस म्हणजे सर्जनाचा सेतू. आसुसलेल्या धरणीला पायसदान देत तिचे डोहाळे पुरवणारा लोभसवाणा प्रियकरच. ‘सुजलां सुफलां’चे अभिमंत्रण करत वसुंधरेला सश्यश्यामला करणारा, थेंबांचा उखाणा घालणारा मस्त कलंदर..! ओसरीवर बसून पावसाची भुरभुर अंगावर घेत कॉफीचा भुरका मारताना मनात शब्द उतरून येतात. पावसासारखीच व्याकूळ कविताही आसुसलेली असते-
‘अंगणी आभाळ येते घेऊनी पाऊसधारा
शिंपुनी जातो धरेला कृष्णमेघांचा फवारा
रंगगंधांच्या सवे आनंद नाचू लागतो
‘जीवना’चे दान द्याया तो दयाळू वर्षतो..
विझवुनी तृष्णा धरेची साद घाली निर्मितीला
पाहुनी अंकुर हिरवा जाणवे ती देवलीला..’
असा हा घनव्याकूळ पाऊस घरीदारी रिमझिमत राहतो. तो नेमेचि येतो. ऋतुचक्राचे एक आवर्तन असतो तो. पण रसिक कलावंतांना तो प्रिय सखा भासतो. तो आपल्याच तंद्रीत असतो. आपल्याच मस्तीत. पण प्रत्येक ऋतूत नव्या आठवणी देऊन जातो. घर म्हणजे पंचमहाभूतांपासून आणि कीटक-प्राण्यांपासून लाभणारा निवारा. त्या निवाऱ्याला ‘आप’ (जल) हे महाभूत जणू आव्हान देते. अहेतुक. नकळत. पाऊस घरात काय काय थैमान घालतो? कधी भिंतीवर ओल येते. कधी पोपडे पडतात. कधी भिंत कोसळते, कलथून खांब पडतो! कधी दारे फुगतात आणि खिडक्या दाटतात. कधी पागोळ्यांतून, कधी पन्हाळ्यातून थयथयाट करतो पाऊस. कधी कौले तुटतात, तर कधी छपराचे पत्रेच उडून जातात. कधी चंद्रमौळी घर, तर कधी सिमेंट काँक्रीटचे घरही चक्क गळू लागते. अंगणातल्या तळ्यातले पाणी घरात घुसते कधी, तर कधी गॅलरीत पाणी साठते. चिखलाने पडवी मलीन होते. एकीकडचे काही स्वच्छ करावे तोवर दुसरीकडे हा राडारोडा..! किती आवरावे? नि किती उपसावे?
चहाच्या रंगाच्या पाण्याचे वेगवान प्रवाह रस्त्यांवरून उताराकडे घरंगळत जातात. तेच कधी घरात, झोपडीत घुसतात. त्याच्या नैसर्गिक वाटा आपण बंद केल्यात ना! नव्या नागरीकरणाच्या रेटय़ामध्ये पावसाला बंदिस्त केले जातेय साचेबद्ध कृत्रिम नाल्यांमधून, बांधीव संकुचित नदीपात्रांतून. डांबर आणि सिमेंटनी घट्ट थापलेल्या भूमीला शोषून घेता येत नाही आद्र्रता. सिमेंट-डांबराने वांझ केली गेलेली माती शोषतही नाही आणि फळतही नाही. घरात घुसलेल्या त्या नतद्रष्ट पावसाला वृथाच शिव्याशाप देत रागे रागे हुसकून लावताना ‘त्राहि भगवान’ होते माणसाचे. निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे, हे त्याला कळते, पण वळत नाही. एकेकाळी हवाहवासा असणारा हा प्रियकर पाऊस नकोसा होतो. त्यासाठी कवितासुद्धा भावव्याकूळ होते-
‘पाऊस नकोसा होतो.. घुसळून टाकतो माती
तो अडेलतट्टू हट्टी.. कोसळतो दिवसा-राती
पाऊस नकोसा होतो.. निष्पाप भुईला शाप
दुष्काळ लादतो ओला.. अन् सृष्टीचा थरकाप..’
पण मग घरात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाशी कसे वागावे? त्या दयाघनाशी करावी मैत्री. त्या जलदाधराचे काढू नये उणेदुणे. त्या कृष्णमेघाशी घालू नये हुज्जत. त्या जीवनाला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारावे. कसे ते कळले, एकदा कोकणात मी सहलीला गेले होते तेव्हा. तिथे वाडीवर घरगुती जेवण छान मिळते. तसे जेवण झाल्यावर त्या घराची ओसरी, पडवी, बगिचा असे सारे पाहत असताना मला एका कोपऱ्यात पाचोळा, लाकूडफाटा, नारळाच्या करवंटय़ांचा नि झावळ्यांचा ढीग दिसला. सुपारीची टणक टरफले साठवून ठेवलेली दिसली. मालकिणीला त्याविषयी विचारले तर म्हणाली, ‘पावसाळ्याची तयारी. कोकणात म्हॉप पाऊस. झडीचा. घरातून बाहेर पडता येत नाही. मग करवंटय़ाच घालतो चुलीत. झावळ्या नि शेणाने गोठा शाकारणार. बटाटा, कांदा, लाल भोपळे ठेवलेत साठवून. तेच खाणार. माती लई वाहून जात्ये. धूप होत्ये. म्हनून जांभा दगडांचा बांध घालतो वरल्या अंगाला. ‘तो’ पाहिजे असतोय ना, मग करायची तयारी.’ पाऊस हवा, तर त्याचे रंग-ढंगही सहन करायला हवेत, हेच सांगितले त्या कोकणी बाईने. निसर्गाशी समरस कसे व्हायचे, ते असे.
मला शहरातल्या घरांमधला पाऊस आठवला. उंबरठय़ावर धडकून झिरपून आत येणारा. भिंतीवरच्या पोपडय़ांतूनही चित्रविचित्र आकृती काढणारा. गॅलरीतल्या काचेवर वाऱ्यासोबत थडकणारा. खिडकीत कवितेसारखा भुरभुरणारा. टेरेसमधल्या कॅनपीमध्ये बसून वाफाळलेल्या भज्यांचा नि कॉफीचा आस्वाद घेणारा. रेनकोटमध्ये लपणारा. हिल स्टेशनवर पाऊस एन्जॉय करण्यासाठी कॅजुअल सुट्टी टाकायला लावणारा. पावसात अडकल्याने उशीर होत असलेल्या जिवलगाची वाट पाहणारा. अविरत कोसळणाऱ्या पावसाने घरात कोंडलेल्या बिच्चाऱ्या पोरांना ‘बोअर’ करणारा. त्याची रिपरिप ऐकत खेळलेले घरेलू बैठे खेळ आणि गाण्यांच्या भेंडय़ा ऐकत बसणारा..
खरं तर, तो संजीवक पाऊस येणार म्हणून सर्वानाच करावी लागते त्याच्या स्वागताची तयारी. त्याच्या संभाव्य उलाढालींचा बांधावा लागतो आधीच अंदाज आणि करावी लागते कल्पक तजवीज. राहावे लागते दक्ष आणि आगामी घडामोडींसाठी सज्ज. त्याला अडवून, साठवून ठेवावे लागते सत्पात्री. अतिरिक्ताला वाहू द्यावे उताराकडे त्याच्या बेताने. घराप्रमाणे समाजालाही व्हावे लागते जागृत. सरकारलाही आखाव्या लागतात पावसाळी कामांच्या योजना. पावसाला आडवून, जिरवून पेरावे लागते नवे बीज.
घरादारावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि दैनंदिन जीवनाची गती कुंठित करणाऱ्या पावसाने अतिरेक केला की मग मती कुंठीत होते. त्याला सांगावे लागते विनवून की बाबा, आता आवर तुझ्या घनभारित पखाली. पुरे कर तुझी आर्जवी संततधार आणि गुंडाळ तुझे पाण्याचे गच्च गाठोडे. आता निरोप दे आणि जा बाबा दिगंतराला. आणि हो! ये पुन्हा पुढल्या वर्षी नेमाने. न विसरता.
‘अरे पावसा, राजसा.. नको घालूस थैमान
उबगली ही धरती.. आता बैस तू गुमान
तुला नाही का ठाउक.. घाम गळतो शेतात
त्याचे मोती होण्याआधी.. का रे नाचतो जोमात?
अरे सावळ्या सजला.. घेई घेई रे निरोप
येई पुढल्या सालात.. पुन्हा चैतन्यस्वरूप..’
मी कविता म्हणत असतानाच अंगणातल्या डबक्यातून एका बेडकाने टुणकन उडी मारली आणि तो खिडकीजवळ आला. ‘डरांव डरांव’ अर्थात, ‘पुनरागमनाय च’ म्हणत पावसाला सोबत घेऊन तो दूरदेशी जाण्यास निघाला. त्याच वेळी लख्ख उन्हाची केशरी तिरीप घरात रांगू लागली.
(टीप : लेखातील काव्यपंक्ती लेखिकेच्याच आहेत.)

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी