‘वास्तुरंग’ मधील (१८ एप्रिल) विश्वास सकपाळ यांचा ‘नवीन आदर्श उपविधी स्वीकारणे गरजेचे’ हा लेख वाचला. त्यातील सूचना उपयुक्त आहेत. नवीन उपविधीमध्ये पुढील गोष्टींचा उल्लेख नाही :-
(१) निवडणुकीचे नियम- हे नियम का वगळले हे समजत नाही. मी असे वाचलेले आठवते की, ज्या गृहनिर्माण संस्थांची सभासद संख्या १०० पेक्षा कमी आहे त्यांना निबंधकांना बोलावण्याची तरतूद वगळली आहे. त्यामुळे लहान गृहनिर्माण संस्थांच्या सोसायटींचा खर्च व वेळ वाचणार आहे. हल्ली कार्यकारी समितीत येण्यास सभासद उत्सुक नसतात. त्यामुळे जे सभासद हजर राहतात त्यांनाच बाबापुता करून समितीवर घेतले जाते व कारभार चालविला जातो.
(२) जुन्या उपविधीमध्ये एखाद्या सभासदाने आपला ब्लॉक भाडय़ाने दिला तर त्या सभासदाला देखभाल खर्चाच्या १० टक्के रक्कम सोसायटीला द्यावे लागत असत. ही तरतूदच काढून टाकल्याने सोसायटींना बिनभोगवटा शुल्क (Non- occupancy charges) आकारता येणार नाही.
उपविधीबरोबर अनेक परिशिष्टे जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे सदनिका हस्तांतरित करताना आकारावयाचा प्रीमियम दर दर्शविणारा आदेश, बंधपत्राची तरतूद वगळली आहे, इत्यादी महत्त्वाच्या परिपत्रकांच्या प्रती उपविधीसोबत जोडल्यास ते सर्व उपयुक्त ठरणार आहे.
– वसंत चिकोडीकर