अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला न मिळालेला दिलासा, वाढलेला सेवाकर यांमुळे बांधकाम क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे. तरीही आजचा गुढीपाडवा आशेचा किरण घेऊन येईल, अशी अपेक्षा आहे.
गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. या सणाला आपल्याकडे फार महत्त्व आहे. हिंदू नववर्षांचा प्रारंभ गुढीपाडवा या सणाने होतो. त्यामुळे नव्या वर्षी चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन वस्तूंची खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यात आयुष्यभर ज्या हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न आपण उराशी बाळगत असतो- ते आपल्या स्वप्नातील स्वत:चं हक्काचं घर घेण्यासाठी लोक धडपड करत असतात.
यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला फार काही सवलती मिळाल्या नाहीत. त्यामुळे थोडे मंदीचे वातावरण आहे. तरीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर विक्री मोठय़ा प्रमाणात होईल व या क्षेत्राला गती मिळेल, असा बांधकाम व्यावसायिकांना विश्वास आहे. परंतु येथे काही विशेष मुद्दय़ांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
छोटय़ा व्यावसायिकांकरिता मुद्रा बँकेची स्थापना केली तसेच या व्यावसायिकांना काही गृहकर्ज देणाऱ्या बँकेची स्थापना करणे गरजेचे आहे. कारण २०२२ पर्यंत जी घरे निर्माण केली जातील, ती घरे सर्वच्या सर्व पसे देऊन विकत घेण्याची क्षमता आज गरीब व दुर्बल गटाकडे नाही व ते इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसल्याने त्यांना गृहकर्जही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यापाशी घरे घेण्यास पसे उपलब्ध करून देण्याची व त्यासाठी अशा बँकेची गरज आहे. २०२२ पर्यंत सर्वासाठी घर अशी घोषणा करणाऱ्या सरकारने अर्थसंकल्पात मात्र त्यावर विचार केलेला नाही. परवडणारी घरे बांधणाऱ्यांना काही विशेष सवलती तसेच गृहकर्जासाठी कमी व्याज दर अशा काही अपेक्षा होत्या; परंतु त्या पूर्ण होण्यासाठी बांधकाम क्षेत्राला या बजेटमध्ये फारसे काही मिळाले नाही. ही सर्वसामान्यांना परवडणारी घरे अथवा २० टक्के म्हाडासाठी बांधून देण्यात येणारी घरे यांच्या विक्रीसाठी विकासकांना फार मोठय़ा जाहिराती परवडणार नाहीत. त्यामुळे आपल्याला उपयुक्त जागी उपलब्ध असणारी घरे ही ग्राहकांना समजणार नाहीत. यासाठी Stock Exchange  च्या धर्तीवर Real Estate Exchange निर्माण केल्यास बांधकाम क्षेत्रातील व्यवहाराला गती मिळेल व त्यात पारदर्शकताही निर्माण होईल.
सेवाकर वाढला असल्याकारणाने घरे अंशत: महाग झाली आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या रेपो रेट कपातीमुळे व्याजदर कमी होऊन ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असून, गृहकर्ज स्वस्त होण्याकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून बघायला हरकत नाही. नजीकच्या काळात रेपो रेट अजून कमी होईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. गुढीपाडव्यानिमित्त घर खरेदीसाठी हा एक सकारात्मक मुद्दा ठरणार आहे. या पाश्र्वभूमीवर आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरखरेदी चांगली होईल, असा विश्वास वाटतो.