‘वास्तुरंग’ पुरवणी व त्यातील प्रत्येक माहितीप्रद लेख म्हणजे ज्ञानाचा खजिनाच! संग्रही ठेवण्यासही उपयुक्त. भाऊच्या धक्क्य़ाची कहाणी वाचून तर आमच्याही पिढीला माहीत नसलेली खूप माहिती कळली व त्या धक्क्य़ाची नवी ओळख पटली. लेखक अरुण मळेकर यांना धन्यवाद.
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या लक्ष्मण हरिचंद्रजी उर्फ भाऊ रसूल यांचे नावही ऐकीवात नव्हते. एका युद्धसाहित्य व यंत्र बनविणाऱ्या कारखान्यातील अव्वल कारकून असल्या भाऊंची दूरदृष्टी व कल्पकता खरोखर वाखाणण्यासारखीच आहे. त्या काळीही वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीवर उत्तम योजना आखून ते व्यावसायिक तर झालेच. परंतु अनेक कष्ट उपसून त्यांनी मुंबईच्या प्रवाशांची सोय होऊन बंदरामार्गे होणाऱ्या व्यापाराही चालना दिली. अनेकवेळा पदरमोड करून त्यांनी मुंबईकरांसाठी ज्या अनेक सोयी-सुविधा त्याकाळीही उपलब्ध करून दिल्या. त्या त्यांच्या कर्तृत्त्वास खरोखर तोड नाही. त्यांची अफाटबुद्धीमत्ता, अपारकष्ट करण्याची वृत्ती, निस्पृहता व प्रामाणिकपणा यावर त्यावेळचे इंग्रज अधिकारीही खूश होते. भाऊंच्या कर्तृत्त्वावर त्यांचा निस्सीम विश्वास होता व त्यामुळे  त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून हे सत्कार्य केले गेले असेल.
आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे अथक परिश्रमामुळे लोकांच्या सोयीसाठी उभारलेले हे बंदर साऱ्या देशांत परिपूर्ण व आदर्श व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. भाऊंची तत्त्परता व कौशल्य यावर खूश होऊन इंग्रजांच्या राज्यातील ‘ईस्ट इंडिया’ या कंपनीनेही त्यांना प्रथमपासून शेवटपर्यंत या बंदराच्या बांधकामाचा व सर्वसुधारणांचा दीर्घकालीन मक्ता दिला होता यावरूनच त्यांची व त्यांच्या कामाची महती कळते. आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा सर्वात कळस म्हणजे त्यांनी म्हणजे भाऊनी स्वकष्टानी बांधलेल्या या मुंबई बंदराला त्यावेळच्या गव्हर्नरचे म्हणजे ‘कारनॅक’ साहेबांचे नाव द्यावे ही त्यांनी केलेली सूचना! आज आज ‘कारनॅक’ बंदरपेक्षाही भाऊचा धक्का हे नावच समाजमनावर खोलवर कोरले गेले आहे व ते तसेच अजरामर होणार. असे निस्वार्थी मनाचे, कठोर परिश्रम करणारे, प्रतिकूल परिस्थितीतही समाजाच्या सोयीसाठी झटणारे भाऊ प्रत्येक पिढीत तयार झाले तर खरोखर देशाची प्रगती नक्कीच झपाटय़ाने होईल. पण आत्ताचे समाजाचे व राजकारणाचे चित्र पहाता मन उदासच होते.
‘सलाम’ त्या भाऊच्या धक्क्य़ाला व ‘त्रिवारवंदन’ आपले अजिंक्य हे नाव खऱ्या
अर्थाने सार्थ करणाऱ्या लक्ष्मण अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांना!
 शुभदा कुळकर्णी