भविष्यातील स्वप्नवत, तसेच नवे बदल अंगीकारणे ही एक शैली बनली आहे. त्यामुळेच अशा स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जातात. त्यात काव्यात्मक कलात्मकतेला साकारण्याकडे अनेकांचा कल असतो. मग ते वास्तव्याचे ठिकाण असो, त्यातील अंतर्गत रचना, संग्रहालय, वाचनालय अशा अनेक बाबींमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते. त्यामुळेच अशा प्रकारची वास्तुरचना साकारताना त्यात गुणवत्ता तसेच सुबकपणा असण्यावर भर दिला जातो.
सध्याचा काळ हा वास्तुरचनेत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याच्या एका संक्रमण अवस्थेतील आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्या पिढीच्या गरजा व आवडीनुसार त्यात आमूलाग्र बदल होताना दिसून येतात. त्यांच्या गरजा ध्यानात घेऊन वास्तुविषयक बाबींची पूर्तता करण्यासाठी नवी परिमाणे सज्ज झालेली आढळतात. मूलभूत वास्तुरचनेतदेखील त्यांचा समावेश होताना दिसून येतो. त्यामुळेच एकात्मिक बदलांच्या दिशेने ही उत्क्रांती होत आहे. मिरर आर्किटेक्चर हा त्यातीलच एक घटक. काचेच्या किंवा आरशांनी सजलेल्या इमारती या ऐश्वर्याचे प्रतीक बनू लागल्या आहेत. मात्र हा उद्देश साध्य करतानाच त्या अधिकाधिक पर्यावरणस्नेही कशा राहतीले, तसेच वातावरणाशी त्या सुसंगत कशा ठरतील, यासाठी त्यांची रचना व सुविधा उपलब्ध होताना दिसून येते. त्यामुळे त्याचा उपयोग अधिक प्रमाणावर होत आहे.
येथे पारदर्शकतेची सुविधा हा एक मुद्दा आहेच, पण त्याबरोबर खेळता प्रकाश आणि काचेच्या माध्यमातून मिळणारा ऊर्जेचा स्रोत यासाठी त्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. इमारतीचा अधिक भाग त्यानुसार कसा बनवला जाईल, याकडे लक्ष दिले जात आहे. त्याशिवाय सौर ऊर्जेचा उपयोग करून घेण्याची क्षमता अशा बांधकामांमध्ये आहे. थंड वातावरणात आतील भागात उबदारपणा टिकवून ठेवण्यासाठीदेखील त्याचा विशेष उपयोग होतो. दिवसाच्या उजेडामुळे विद्युत बचतदेखील होते. त्यामुळेच त्याच्या अतिरिक्त भाराची बचत होते. पर्यावरणप्रेमी असलेल्या या बाबींचा तसेच आर्थिक बचतीचा विचार करून काचेच्या किंवा आरशांच्या इमारतींचा रचना एकूण बांधकामात किती असायला हवी, याची टक्केवारीदेखील विचारात घेतली जाते.
अशा प्रकारच्या इमारती भविष्यात निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांसाठी अधिक प्रमाणावर निर्माण होतील, असा अंदाज आहे. मात्र सध्या तरी हा कल व्यावसायिक संकुलांच्या किंवा इमारतींच्या बाबतीत अधिक असल्याचे चित्र आहे. या इमारतींच्या पारदर्शकतेमुळे दृष्टीस पडणारे चित्र, तसेच गोपनीयता यांच्या बाबतीत निर्माण होणारे चिन्ह याचा प्रश्न अधिक सोपा झाल्याचे सांगितले जाते.
अधिक कार्यशीलता, दुहेरी व कोटेड मिश्रणामुळे त्यातील मजबूतपणा, तापमान नियंत्रणात राहणे, सूर्यकिरणांचा थेट संपर्क यामुळे ग्रीन बिल्डिंगच्या तसेच उष्णदेशीय वातावरणातदेखील त्याचा सर्वसमावेशक वापर करण्याकडे कल वाढलेला दिसून येतो. जास्तीतजास्त नैसर्गिक उजेड, त्याचबरोबर घरातील किंवा कार्यालयातील सर्व अंतर्गत रचना एका नजरेत दिसून येणे, हे त्याचे आणखी उपयोगाचे पैलू आहेत. अशामुळे काम करण्याची क्षमतादेखील वाढीस लागते. काचेच्या या वस्तूंची निर्मिती अशा प्रकारे ऊर्जा नियंत्रण किंवा उपयोगात आणण्याच्या घटकांचा वापर करून केलेली असते. उष्ण वातावरणात सौर किरणांना नियंत्रण करणारे घटक या काचांमध्ये असतात. सूर्याची उष्णता ही नियंत्रित करून आपल्यापर्यंत येते. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत नाही. काहींच्या बाबतीत सौरऊर्जेतून अधिक प्रकाश कसा परावर्तित होईल, असे घटक समाविष्ट असल्यामुळे काचांमुळे आपल्या जागेत उजेड फार मोठय़ा प्रमाणावर येतो. सूर्याच्या उष्णतेचा किंवा ऊर्जेचा आपल्याला आवश्यक असलेला संतुलित उपयोग यातून साध्य करता येतो. याचाच उपयोग उद्या सौर ऊर्जेवरील साधनांच्या वापरासाठीही करून घेता येईल. आपले वातानुकूलित यंत्र त्याच्यावर नियंत्रित झाले तर आपल्या ऊर्जेची तसेच पैशांची बचतदेखील मोठय़ा प्रमाणावर होऊ शकते. सोलर कंट्रोल ग्लास ही विशिष्ट वातावरणात विशिष्ट कारणांसाठी वापरता येऊ शकते. ही बाब नीट ध्यानात घेतली तर त्याच्याबाबत होणारा विरोधदेखील कमी होईल व नव्या बदलानुसार त्यांचा अवलंब होण्याचा वेग वाढीस लागेल. निवासी तसेच व्यावसायिक संकुलांमध्ये त्याचा वापर सर्रासपणे व बिनधिक्कत होताना दिसून येईल. इमारतीच्या आत व बाहेरदेखील आपल्या कामांचे संतुलन, तसेच खासगीपणा राखणेदेखील यात साध्य होणार आहे.
भविष्यातील वाढत्या गरजा विचारात घेता कमीत कमी जागांमध्ये व्यावसायिक कार्य करणे व त्याचा स्वीकार करणे, ही बाब वाढणार आहे. या व्यापारीकरणात कार्यालयीन जागा ही कमीत कमी कशी राहील, हे पाहिले जाईल. त्यामुळेच भिंती किंवा अन्य बांधकामांमुळे वाया जाणारी अतिरिक्त जागा वाचवण्यासाठी काचेच्या बांधकामांचा अधिक उपयोग होणार आहे. युरोप, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व देशांमध्ये तसेच अमेरिकेतदेखील अशा प्रकारच्या कार्यालयांच्या निर्मितीचा कल वाढलेला दिसून येतो. त्यात ते अधिक सक्रिय आहेत. त्यानुसार वास्तुरचनेतील सौंदर्य तसेच त्यातून व्यापकता साध्य करण्याकडे त्यांचा कल असतो. आपल्याकडे हे सर्व साकारण्यासाठी अजून तरी एका दशकाचा काळ लागेल.
(लेखक थ्रीडी आर्किटेक्चरचे संचालक आहेत.)