घर म्हणजे काय असतं? याचं खरं एकच एक असं उत्तर नाही. प्रत्येकाच्या घराविषयीच्या व्याख्या निराळ्या.. अनुमानं वेगळी.. प्रत्येकाचं घराशी असणारं सख्य वेगळं.. काहींना घरातील अलिप्तता भावणारी, तर काहींना घरातील माणसांचा गोतावळा हवाहवासा वाटणारा.. मग ते आपलं घर असो वा मालिकांमधलं. मालिकांममधील घरं हा प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय. मालिका पाहताना प्रेक्षक जसा त्या भूमिकेतील कलाकाराशी समरस होतो, तसाच तो कलाकार वावरत असलेल्या घराशीही एकरूप होतो. ‘झी मराठी’वरील ‘अस्मिता’ या मालिकेतील ‘सरंजामे निवास’ या घराविषयीही प्रेक्षक असाच जोडला गेला आहे. दिवाळीनिमित्त खास या घराविषयी..
रंजामे-निवास! अस्मिता आणि अभिमानचं घर! अस्मिताच्या कर्तृत्वाचा योग्य तो मान राखणारी सासू, सर्व काही सांभाळून घेणारी अभिमानची आजी. देवाखालोखाल ज्यांचा आदर अभिमानला वाटतो, पण ते आपल्या वडिलांचे खुनी आहेत असा अस्मिताला संशय असणारे मोठे सरकारी अधिकारी- दादासाहेब सरंजामे, थोडी तिखट मिरची असलेली नणंद वैदेही. घरचे सदस्य असल्यागत हरकाम करणारे ‘काका’ अशा तीन पिढय़ा नांदणारी वास्तू!
पहिल्यांदा आपण प्रेमात पडतो त्या अंगणाच्या! अंगण ऐसपैस! त्याला फाटक! एका कोपऱ्यात आंब्याचं झाड, त्याला झकास गोल पार. रात्री खुशाल त्याच्यावर बसून गप्पा माराव्यात वा भेंडय़ा खेळाव्यात. त्याच्या पुढेच जरा बाजूला टेबल-खुच्र्या मांडून थोडय़ा परक्या माणसांच्या आगत-स्वागताची तयारी केलेला. पुढे एक चांगली भोवताली पसरलेली रुंद ओटी. तिला लोखंडी नक्षीदार पट्टय़ांचा कठडा.. त्यामुळे ओटीला एक सुंदर किनार आली आहे. त्या पट्टय़ापट्टय़ातून मुख्य दार आणि दिवाणखान्याचा काही भाग दिसतो आहे. त्यामुळे बंदिस्तपणा बरोबरीनेच एक मोकळीकही जाणवते. या कठडय़ाखाली अंगणात कुंडय़ांमधून रोपे लावली आहेत.
दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूंना दोन गणेश मूर्ती आहेत. त्यांच्यावर सुरेखसे दिवे आहेत. त्यांचा प्रकाश मूर्तीवर पडतोच, पण बाहेर कोण आलेय हे पाहताही येतं. त्याच्या खाली टेबलवर हत्तीच्या आकाराच्या फुलदाणीत फुलांची सजावट. संपूर्ण ओटीच्यावर रंगीबेरंगी काचांच्या खिडक्या आहेत. त्यामुळे शोभा तर वाढली आहेच, पण त्यातून गाळून जाणारा शुभ्र प्रकाश किती तऱ्हेतऱ्हेच्या रंगांची उधळण करीत असेल, याची आपण कल्पना करू लागतो.
दिवाणखान्यात पाऊल टाकताच खानदानीपणा, परंपरा आणि आधुनिकता यांचा संयम जाणवतो. सुटसुटीत, पण टिकाऊ लाकडी सोफा-सेट! हॉलमध्येच डायनिंग टेबल आणि खुच्र्या. खुच्र्याच्या पाठी नक्षीदार उंच, पण त्या सोबतच पांढराशुभ्र काळ्या किनारीचा टेबलक्लॉथ घालून आधुनिकता आणलेली. दिवाणखान्यातून आतल्या घरात जाणाऱ्या भल्या रुंद दारालाही शुभ्र काळ्या किनारीचे हलकेफुलके तरल पडदे- जे वाऱ्याच्या झुळकेनेही झुलतात. शिवाय खाली गालिचा. पण याच हॉलमध्ये तिला गुंगीचे औषध दिले जाते. आतमध्ये दोघांचे शय्यागृह. इथलं वेगळेपण म्हणजे विभागलेले पलंग- जे दोघांमधलं तणावाचं नातं दाखवतात. एक अस्मिताचीही स्वतंत्र खोली. ज्यात तिच्यावर हल्ला होतो तेव्हा तिच्यावर बनावट डॉक्टर-नर्सेसकडून बनावट उपचार केले जातात. अभिमानची अभ्यासिकाही आहे, ती त्याने आता अस्मिताला दिली आहे. पुस्तकांसाठी स्वतंत्र सुटसुटीत रचना. त्यात पुस्तकं. तिथे आत मंद प्रकाश-दिवे. दरवाजे शिसवी लाकडाचे काळेभोर, पण त्याला छेद देणाऱ्या दुधी काचा! एक टेबल-खुर्ची! खाली सुंदर डिझाइनचे जाजम आणि हो, एक व्हाइट बोर्डसुद्धा. कारण या खोलीचा उपयोग अस्मिताचं ऑफिस म्हणूनसुद्धा होतोय. तिचे सहकारी येतात, चर्चा करतात, पुढच्या कृतींची आखणी करतात. मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून व्हाइट-बोर्डवर प्रत्येक मुद्दा लिहिला जातो. एरवी ‘शोधलं की सापडतंच’ हे प्रेरणादायी वाक्य असतं. अर्थातच अभिमानचा अस्मिताला असलेला पूर्ण पाठिंबा मौनातूनही जाणवतो.
स्वयंपाकघरही अगदी बारकाव्यानिशी दिसतं. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मोठय़ा-मोठय़ा तांब्या पितळेच्या जोडीने रंगी-बेरगी, फुलां-फुलांची डिझाइन असलेली धातूची भांडी, काचेची भांडी सुखाने नांदताहेत. चमचे-पळ्या, बटाटय़ाचं सोलाणं, पुरण यंत्र अशा सर्व वस्तू त्यांच्या त्यांच्या जागेवर आहेत. पूर्ण दोन भिंती भरून फडताळं वर आणि खाली. त्या दोहोंच्यामध्ये ओटा. त्यावर शेगडय़ा, मिक्सर इ. फडताळांच्या लाकडी दारांचा एकसुरीपणा तोडण्याकरिता काही दारं काचांची. पुरणपोळ्यांचा प्रयत्न करणारी अस्मिता या किचनमध्ये दिसते तेव्हा ते अगदी परिपूर्ण वाटतं. पण जेव्हा तिला अभिमानसाठी खास केक बनवत असताना चक्कर येते तेव्हा तेच पसारा पडलेलं किचन, उडालेलं पीठ, उघडून ठेवलेले डबे, चाळणी अशा तपशिलांसह दिसतं.
यातल्या अशाच काही छोटय़ा-मोठय़ा वस्तू लक्ष वेधून घेतात. लटकवलेली पितळी घंटा, धातूची छोटी सायकल, संगमरवराचा मोठासा हत्ती, भिंतीवर टी. व्ही. इ. पण यातली पेंटिंग्ज खास म्हणता येतील अशी त्यांच्या विषयानुसार त्या त्या विशिष्ट खोलीत ठेवलेली.. यशस्विता आणि महत्त्वाकांक्षेचं प्रतीक असलेला घोडा, भौमितिक रचनेचं चित्र, दोन मैत्रिणींच्या गप्पांचा पकडलेला क्षण, एका शालीन स्त्रीच्या मुक्त आनंदाचे संयत दर्शन घडविणारे चित्र. यामुळे सर्व घराला रसिकतेचा स्पर्श लाभतो.
या सर्वावरून नजर फिरत असतानाच त्या घरातल्या माणसांचे भावबंध, सासूचे ‘सासू’ या भूमिकेतून ‘आई’ होणं, दादासाहेबांच्या बाबतीत खरं काय नि खोटं काय, हे न कळल्यामुळे अस्मिता आणि अभिमानमध्ये एकमेकांबद्दल असलेली पराकोटीची ओढ-प्रेम असूनही आलेला दुरावा! पण दोघांपैकी कोणालाही काहीही झालं- म्हणजे जिवावरचा प्रसंग असो वा साधं खरचटणं तरी त्यांच्या जिवाची होणारी उलघाल हे घर पाहतंय. असा हा सरंजामे निवास! खरंखुरं घर नसून एक ‘सेट’ आहे हे कळलं की आश्चर्य वाटतं.
या कौटुंबिक कहाणी आणि रहस्यमय घटना अशा दोन पैलूंना घेऊन मालिकेला वेगळेपणा आणलाय तो कथा-पटकथा लेखक ज्योती-सागर, संवाद लेखक अस्मिता जोशी, सप्रेम कुलकर्णी व निर्माता-दिग्दर्शक संगीत कुलकर्णी यांनी. रांगोळीच्या ठिपक्यांना कौशल्याने जोडून सुरेख आकृती बनवणं, त्यात रंग भरून त्या आकृतीला पूर्णत्व आणणं हे काम कला-दिग्दर्शक संतोष पांचाळ यांनी केलं आहे. अशी ही वास्तू दिवाळीत कंदिलांनी आणि रांगोळीने आणखीच साजिरी आणि ऐटबाज दिसते.
meenagurjar1945@gmail.com