नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि तबलावादक निखिल फाटक यांच्या कलात्मक घराविषयी..

काही घरं खूप वाचणारी असतात. काही घरं खूप ऐकणारी असतात. काही घरं खूप बोलकी असतात, तर काही घरं एकदम गंभीर असतात. आजच्या लेखातलं घर मात्र अगदी श्रावणासारखं हसरं-नाचरं आहे! तिथे वावरणाऱ्या छोटय़ा पावलांशी खेळता खेळता ते एकदम सुरेखशी गिरकी घेतं, तबल्याचा ठेका धरतं, नृत्याचे मुक्त पदन्यास करतं, गॅलरीतल्या झाडा-कुंडय़ांत रमतं आणि देवघरातल्या धूप-दीपासोबत शांतावत जातं. हे घर आहे नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि तबलावादक निखिल फाटक यांचं!

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले
Sanjay Gaikwad hunted tiger
“मी वाघाची शिकार करून त्याचा दात…”, संजय गायकवाडांचा अजब दावा; म्हणाले, “बिबट्यांना मी सहज…”
Shivaji Maharaj Jayanti Kagal
कोल्हापूर : पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून कागलच्या रंगमंचावर अवतरली शिवसृष्टी

शर्वरी आणि निखिलचं घर आहे पुण्याच्या सिंहगड रोड भागात. थोडी आतल्या बाजूला असलेली त्यांची बिल्डिंग ही त्या रस्त्यावरची शेवटची बिल्डिंग असल्यामुळे तिथे रहदारीचे आवाज नाहीयेत. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असूनही खूप शांतता आहे. शर्वरीच्या मते, घर ही गोष्ट नशिबावर अवलंबून असते. कधी पटकन मनासारखं घर मिळून जातं, तर कधी खूप शोधाशोध केली तरीही मनासारखं सगळं मिळेलच याची खात्री देता येत नाही. लग्न ठरल्यावर दोघांनी मिळून घर शोधायला सुरुवात केली. सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या शर्वरीच्या आत्याने त्यांना या घराविषयी सांगितलं. पण आधी भाडय़ाच्या घरात राहायचं आणि मग सवडीने स्वत:चं घर घ्यायचं असं त्यांनी ठरवलं असल्यामुळे आत्याचं म्हणणं त्यांनी सुरुवातीला फार मनावर घेतलं नाही. मात्र आत्याने ‘एकदा घर तर बघा, घ्यायचं की नाही ते नंतर ठरवा,’ असं म्हटल्यामुळे दोघंही घर बघायला गेले. बिल्डिंगच्या इथे डेड एन्ड असल्यामुळे प्रायव्हसी असणारं, जांभळाची-आंब्याची वगैरे पुष्कळ झाडं आजूबाजूला असणारं, भरपूर हवा, उजेड असणारं घर त्यांना मनापासून आवडलं. तिथे गेल्यावर त्यांना खूप प्रसन्न वाटलं. शिवाय घर खरेदीचं आर्थिक गणितही व्यवस्थित जमलं. त्यामुळे लग्नानंतर शर्वरीने याच घरात ‘गृहप्रवेश’ केला!

मोकळी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या १२०० चौरस फुटांच्या या घरात छान मोठा हॉल आहे. हॉलला जोडून ऐसपैस गॅलरी आहे. तिथे शर्वरीने कुंडय़ा ठेवून छोटीशी बाग केलीय. जास्वंद, मोगरा, जाई, शेवंती, गुलाब, रातराणी अशा फुलझाडांच्या जोडीला कढीपत्ता, क्रोटन, पाम्स अशी झाडंही आहेत. शर्वरी घरी असली की बागेला पाणी घालणं, झाडांची काळजी घेणं हे सगळं आवडीने करते. या गॅलरीत तिने आर्टिस्टिक फर्निचर केलंय. तिथे बसून शांतपणे चहा-कॉफी प्यायला तिला फार आवडतं. ही गॅलरी म्हणजे शर्वरीची या घरातली खास जागा आहे. शर्वरीच्या घरात दोन बेडरूम्स आहेत. त्यापैकी एका बेडरूमचा वापर ‘रियाजाची खोली’ म्हणून होतो. शर्वरीचे पती निखिल फाटक हे उत्तम तबलावादक आहेत. त्यामुळे ही खोली तबला आणि नृत्याच्या रियाजासाठी वापरली जाते. हल्लीच्या नवीन घरांमधल्या बेडरूम्स खूप छोटय़ा असतात, वॉर्डरोब आणि बेड एवढय़ात खोली संपूनच जाते; पण शर्वरीच्या घराच्या बेडरूम्स मात्र ऐसपैस आहेत. त्यामुळे मास्टर बेडरूममध्येही फर्निचर असलं तरी वावरायला मोकळी जागा राहते. स्वयंपाकघरही मोकळं, सुटसुटीत आहे. ‘देवघर’ ही सुद्धा या घरातली खास जागा आहे. बिल्डरने फ्लॅट डिझाइन करतानाच हे छोटंसं स्वतंत्र देवघर केलेलं आहे. तिथे खिडकीला ‘ओम’च्या आकाराची जाळी आहे. देवघराचं अध्र्या उंचीचं दार शर्वरीने छोटय़ा छोटय़ा घंटा लावून सजवलंय. देवघरात शर्वरी आणि निखिल दोघांचेही ‘देव’ म्हणजे घुंगरू आणि तबला आहेत, नटराजाची मूर्ती आहे. भेट म्हणून मिळालेल्या विठोबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. नाशिकहून आणलेले लामणदिवे, समया, घंटा आहेत. दोघांनाही पितळी मूर्ती वगैरे खूप आवडतात, पण घराची लांबी-रुंदी लक्षात घेऊन अशा मूर्ती किंवा अँटिक वस्तू आणण्याचा मोह ते आवरता घेतात! शर्वरीच्या मते, घराचं म्युझियम न करता मोकळं आणि वावरायला सोपं असं घर असावं. त्यामुळे जास्त फर्निचर, सामानाची गर्दी त्यांनी घरात केलेली नाही. अर्थात त्यांना प्रिय असलेली कीबोर्ड, कागुल आणि इतर काही वाद्यं, म्युझिक सिस्टीम, पुस्तकांचं शेल्फ हे मात्र घरात आहे. शर्वरी-निखिल यांचा मुलगा शर्विल आता चार वर्षांचा आहे. इतक्या लहान वयातही त्याला वस्तू नीटनेटक्या ठेवायची आवड आहे. त्यामुळे त्याची खेळणी तो त्याच्या कपाटातच ठेवतो.

या घरात आल्यानंतर शर्विलचा जन्म झाला. दोघांच्याही कार्यक्रमांची संख्या वाढली, या घरातल्या सकारात्मक ऊर्जेमुळे घरातल्या सगळ्यांना रोजच्या जगण्याची ऊर्जा मिळाली, मिळतेय. त्यामुळे शर्वरी आणि निखिलच्या मनात या घराने स्वत:चं घर निर्माण केलंय असं म्हणायला हरकत नाही!

अंजली कुलकर्णी-शेवडे

anjalicoolkarni@gmail.com