‘अस्मिता’ या मालिकेत अभिमान आणि अस्मिता या प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलावंतांना ‘सरंजामे निवास’ कसं वाटतं, त्या विषयी..

आजवर काही मालिकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या सेटवरच्या घरांमध्ये मी वावरले, पण ‘अस्मिता’ची दोन्ही घरं माझ्या खूप जवळची आहेत. त्यातही मला आधीचं म्हणजे मलिकेतलं माझ्या माहेरचं घर हे आणखीच जवळ. मला वाटतं, ते सासर-माहेर फीलिंगसारखं आहे. आधीचं घर हे मढला आहे. आताही कधी ‘मढला म्हणजे कुमार विलाला शूट आहे’, असं आम्हाला सांगितलं की आम्ही सगळे एकदम खूश होतो; तिथे शूट करण्याची मजा कही वेगळीच. जुन्या घरातली स्टडी रूम, स्वयंपाकघरातले सीन्स, बाहेरचा ओटा, झोपाळा अशा सगळ्या गोष्टींच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तिथली धमाल मी खूप मिस करते. त्या घराच्या बाहेरच्या ओटय़ावर आम्ही सगळे सकाळी नाश्त्याला एकत्र बसायचो. दिवसभरात मोकळा वेळ मिळाला की आमची पावलं ओटा आणि झोपाळ्याकडे वळायची.
जुन्या घराप्रमाणे आता आमचं नवं घर म्हणजे ‘सरंजामे निवास’ही मस्त आहे. या घरातलं सगळ्यात जास्त मला काही आवडत असेल तर ते या घराचं अंगण. ‘सरंजामे निवासा’तही बाहेर ओटा आहे. दुपारनंतर आम्ही सगळे अंगणात गोल करून खुच्र्या टाकून गप्पा मारत बसतो. कधी गाणी, गप्पा, खेळ असा कल्ला सुरू असतो आमचा!
या घराच्या म्हणजे ‘कलामंच स्टुडिओ’च्या आजूबाजूला आणखी दोन-तीन घरं आहेत. समोर एक छोटंसं मंदिर आहे. वडाचं झाडही आहे. आणि एक विहीरसुद्धा! आजूबाजूचं असं वातावरण असल्यामुळे आम्ही गावात आहोत असं सतत वाटत राहतं. मुंबईत शूटिंग सुरू आहे असं वाटत नाही.‘ संरजामे निवास’ची रचना बैठय़ा घरासारखी आहे. याही घरातली स्टडी रूम, स्वयंपाकघर, बाहेरची खोली अशा सगळ्याच ठिकाणी आपलेपणा वाटतो. दोन्ही घरातल्या स्टडी रूम तर फार आकर्षक आहेत. आमच्या कला दिग्दर्शकांनी अतिशय विचार करून त्या डिझाइन केल्या आहेत. म्हणजे ते माझं ऑफिस असूनही तिथे कधीच ऑफिस असल्याचं फीलिंग आलं नाही आणि येतही नाही. त्यामुळे एकूणच सेटवरचं वातावरण खूप प्रसन्न असतं.
मध्यंतरी मे महिन्यात आम्ही लहान मुलांशी संबंधित एक भाग केला होता. आमचं शूट स्टुडिओतच केलं होतं, पण तिथे गावाचा सेट तयार केला होता. तेव्हा लहान मुलांसोबत आम्ही मोठी मंडळीही लहान झालो होतो. ‘सरंजामे निवास’मध्ये बाहेर अंगणात खूप खांब आहेत. त्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या मेकअप रूम्सनाही एक खांब आहे. सेट लावणं, लाइट्स करणं अशी तांत्रिक कामं सुरू असायची तेव्हा आम्ही सगळे दुसरीकडे खांब-खांब खेळायचो. सोबतीला क्रिकेट तर असायचंच. हा भाग आम्ही एप्रिलमध्ये शूट केला होता. त्यामुळे एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीत लहान मुलं जशी धमाल करतात तशी आम्हीही केली. अगदी कैऱ्या पाडण्याची मजाही अनुभवली. अंगणात कैरीचं एक मोठं झाड असल्यामुळे कैऱ्या पाडण्याचा आनंद घेता आला. अंगणात आम्ही फक्त कल्लाच करत नाही तर अनेकदा अभ्यासही सुरूअसतो. आम्ही आता पुस्तक वाचन सुरू केलंय. रोज एकाने असं एकेक प्रकरण वाचायचं. या निमित्ताने वेगवेगळी पुस्तकं वाचून होतात. खेळण्या, मस्ती-मजासोबतच साहित्याचा आस्वादही आम्ही घेत असतो. होळी, गुढीपाडवा, श्रावण, गणपती, नवरात्र असे सगळेच सण आम्ही ‘सरंजामे निवासा’त साजरे केलेत. त्यामुळे अर्थातच हे घर माझ्यासाठी खूपच जिव्हाळ्याचं आहे.
आम्ही कलाकार आमच्या घरापेक्षा मालिकेतल्या घरांमध्ये अधिक वावरत असतो. त्यामुळे ते आमचं दुसरं घरच असतं. घर म्हटलं की प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी असं सगळंच आलं. ‘सरंजामे निवास’ने आणि आधीच्या घराने मला हे सगळंच दिलं. नुसत्या चार भिंतींचं घर हे ‘घर’ नसतंच. त्यात माणसं हवीतच. माझंही तसंच आहे. घरात माणसं असावीतच. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. मग ते घर मोठं असो वा लहान. माणसांची लगबग त्यात हवीच. मी शूटला गेले की, माझा पहिला प्रश्न असतो की, ‘आज कोण कोण आहे सेटवर’. मला इतकी सवय झालीय इथल्या माणसांची. बैठं घर मला खूप आवडतं. ‘सरंजामे निवास’ मला हाच आनंद देतं. मालिकेतला तो घराचा सेट असला तरी माझ्यासाठी ते घर म्हणूनच माझ्या मनात एकदम ‘सेट’ झालंय.
mayuri.wagh01@gmail.com
शब्दांकन : चैताली जोशी