आज आपण फ्लॅट संस्कृती स्वीकारली असली तरी प्रत्येकास आपली स्वत:ची बाग असावी अशी इच्छा असते. फळ झाडे नसली तरी किमान फुलझाडे तरी या बागेत असावीत असे वाटते. ही हौस घरातील गॅलरीमध्ये कुंडय़ांत फुलझाडे लावून पूर्ण केली जाते. घरातील कुंडय़ांमध्ये फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब केसांत माळताना, फोडणीसाठी कुंडीतील कढीपत्ता घालताना, पुदिना अथवा कोथंबिर वापरताना गृहिणीला होणारा आनंद हा अनुभवयाचा असतो, तो शब्दांत सांगता येत नाही.
रोपवाटिकेतून आणलेले छोटेसे रोप खतपाणी घालून वाढवताना,  त्यांना किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेताना आपण त्यामध्ये गुंतत जातो. पूर्वी चाळीमध्ये राहत असताना कॉमन गॅलेरीमध्ये जवळपास १३ घरांपकी १० जणांच्या घराबाहेर कुंडय़ांमध्ये जास्वंद, झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, गुलबक्षी, रातराणी, तुळस, कोरफड, सदाफुली यांसारखी अनेक झाडे लावली जात. चाळीत राहण्याचा एक फायदा असा असायचा की, काही दिवस फिरावयास गेल्यास झाडांची काळजी शेजारी घेत असत. अगदी नि:संकोचपणे शेजाऱ्यास पाणी घालण्यास सांगून जाता येत असे. आजही अनेक चाळकऱ्यांचा हा अनुभव असेल.
नोकरीला लागल्यावर मुंबईमध्ये फ्लॅट घेतला आणि चाळीतून फ्लॅटमध्ये राहावयास आल्यावर येथेही कुंडय़ांमध्ये झाडे लावली. परंतु कामानिमित्त अथवा बाहेरगावी फिरायला जाताना प्रत्येक वेळी शेजाऱ्यांकडे कुंडय़ा ठेवाव्या लागत. विशेषत: गणपतीत गावी जाताना आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताना! यामुळे कंटाळून झाडे काढून टाकली. परंतु काही दिवसांनी पुन्हा झाडे लावण्याचे ठरविले. बाहेर जाताना यावेळी मित्राने सुचविल्याप्रमाणे प्रत्येक कुंडीत एक अर्धा लिटरची पाण्याची बाटली एक छोटेस छीद्र पाडून ठेवली. ही कल्पना चांगली होती, पण काही बाटल्या लवकर रिकाम्या होत, तर काही रिकाम्या होत नसत.
रसायनशास्त्रामध्ये शिक्षण घेतले असल्यामुळे कॉलेजपासून ते नोकरीमध्ये आजतागायत Chromatography (वर्णलेखाशास्त्र- रासायनिक पृथक्करणाची एक पद्धत)शी सतत संपर्क असतो. या पद्धतीमध्ये द्राव्य जे असते (उदा. पाणी) ते capillary action  – केशिका क्रिया – अरुंद जागेत पाण्याची गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर चढण्याच्या क्रियेने वर चढते अथवा खाली उतरते, या तत्त्वाचा वापर झाडांना पाणी घालण्यासाठी करण्याचे ठरविले. मे महिन्यात गुजरातला ६ दिवसांसाठी जाताना प्रथम प्रयोग केला व तो यशस्वीही झाला. घरी आल्यावर सर्व झाडे टवटवीत होती. नंतर गणपतीतही गावाला  ६ दिवसांसाठी जाताना दुसऱ्यांदा प्रयोग केला व तोही यशस्वी झाला. माझ्या कार्यालयातील मित्राला हा प्रयोग करण्यास सांगितले व त्यानेही बाहेर जाताना हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले.
हा प्रयोग अतिशय सोपा आहे. एका कपडय़ाचे (शक्यतो सुती) लांब तुकडे करावेत. जितक्या कुंडय़ा तेवढे या सुती कापडाचे तुकडे करावेत. कपडय़ाचे एक टोक कुंडीतील मातीत तर दुसरे टोक एका पाण्याने भरलेल्या बादलीत, असे प्रत्येक कुंडीसाठी करावे. साधारण ६ कुंडय़ांसाठी ५ ते ६ लिटर पाणी ६ दिवस पुरते. या प्रयोगात  capillary action ने पाणी वर चढते व कुंडीतील मातीपर्यंत पोहचते व झाडे टवटवीत राहतात. प्रयोग अधिक यशस्वी होण्यासाठी पाण्याची बादली वर ठेवावी व कुंडय़ा खाली ठेवाव्यात; जेणेकरून बादलीतील पाण्याची पातळी कमी झाली तरी पाणी कपडय़ाबरोबर खाली उतरण्यास कोणतीही अडचण येत नाही.

महत्त्वाच्या सूचना
* शक्यतो सुती कपडा वापरावा.
* पाण्याची बादली ही कुंडीच्या पातळीत असावी. कुंडीच्या पातळीच्या वर असल्यास उत्तम.
* कपडा capillary action ने भिजत असला तरी भिजवून एक टोक कुंडीतील मातीत तर दुसरे टोक एका पाण्याने भरलेल्या बादलीत तळाला बुडवावे.
* कपडय़ाचे टोक पाण्याने भरलेल्या बादलीत तळाला बुडेल याची काळजी घ्यावी. अन्यथा पाण्याची पातळी कमी झाल्यास प्रयोग यशस्वी होणार नाही.
* लागणारे पाणी हे कुंडय़ांचा आकार व संख्या यावर अवलंबून असेल.
* डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बादली हलक्या अ‍ॅल्युमिनीयम फॉइलने झाकावी.
* बादलीएवजी ५ लिटरच्या जुन्या बिसलेरी कॅनचा वापर करता येऊ शकतो. त्याच्या अरुंद तोंडातून कपडा बाहेर काढून पाण्याचे बाष्पीभवन टाळता येईल व डासांचा प्रादुर्भाव कमी होईल.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या