अल्युमिनियम धातूची भांडी सुरक्षित असतात की नाही;  तसेच त्यासाठी कोणते पर्याय आहेत याविषयी अनेक वाचकांनी विचारणा केली आहे. उतारवयात जो स्मृतिभंश होतो त्याला अल्झायमर या नावाने संबोधले जाते. या अल्झायमरचा अल्युमिनियमच्या रक्तातील अंशांशी निकटचा संबंध असतो. सहज उपलब्धता, उष्णतेचे शीघ्रवाहक व वजनाला हलके अशा महत्त्वाच्या गुणधर्मामुळे अल्युमिनियमची भांडी व्यवहारात रूढ झाली. पण त्यांचा स्वयंपाक घराशी इतका निकटचा संबंध प्रस्थापित झाला, की त्याचे दुष्परिणाम अधिक व उपयोग कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. वैज्ञानिक दृष्टीने अल्युमिनियमकडे पाहायचे म्हटले तर पृथ्वीच्या पोटात सर्वात जास्त मुबलक असलेला हा धातू मानवी तर सोडाच, पण कोणत्याच जैविक प्रणालीचा घटक बनलेला नाही. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मातीमध्ये अल्युमिनियम असले तरी वनस्पती त्यांच्या मुळाच्या  माध्यमातून ते अंश स्वीकारीत नाहीत. कारण त्यांच्या जीवन प्रक्रियेत अल्युमिनियमला स्थान नाही. आदिमानवाने मातीची भांडी सोपी म्हणून बनविली आणि ती आपल्याला भावली. मातीची भांडी जाऊन त्यात कालानुरूप बदल होत लोखंड, स्टील व तांब्याची भांडी वापरली जाऊ  लागली. हळूहळू आपल्या जीवनशैलीमध्ये आपण तांबे, लोखंड, जस्त व कथिल या घटकांची भांडी सहजपणे सामावून घेऊ  शकलो. कारण हे सर्व घटक आपल्या शरीराचे अविभाज्य अंश आहेत आणि त्यात शास्त्रीयदृष्टया गैर असे काही नव्हते. पितळ हा मिश्र धातूदेखील आपण सामावून घेतला. कारण त्याचे दोन्ही घटक तांबे व जस्त हे आपल्या जैविक प्रणालीस परके नाहीत. पण जर पितळ ओतताना त्यात शिसे मिसळले तर ते पितळ स्वयंपाकासाठी वापरले जाता कामा नये. नुसत्या पितळेची भांडी चकाकत असली तरी ती आम्ल पदार्थासाठी घातक असतात व आपल्या शरीरात असे पदार्थ गेले तर शरीरासाठीदेखील ते विषारी असतात. म्हणून त्यांना कथिलाचा लेप देण्याचा मार्ग निघाला. पण आता कल्हई इतिहासजमा होऊ  पहात आहे व पितळेच्या भांडय़ांचा वापरही कमी होत चाललेला आहे. तांबे, लोह, जस्त, कथिल हे धातू आपल्या शरीरात काही महत्त्वाच्या भूमिका निभावीत असतात आणि अन्नाचे पचन, स्नायूंचे आकुंचन प्रसरण, मेंदूचे संदेश वहन इत्यादी अनेक जैव रासायनिक प्रक्रियांच्या नियंत्रणात त्यांचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे जर स्वयंपाकाच्या भांडय़ांच्या माध्यमातून त्यांचे अंश थोडय़ा फार प्रमाणात जरी शरीरात गेले तरी शरीराला त्यांचे फारसे वावगे वाटत नाही, कदाचित ते शरीरात शोषले जाणार नाहीत, पण निदान अतिप्रमाण वगळता त्यांचा विषारी परिणाम तर नक्कीच होणार नाही. पण तसा प्रकार अल्युमिनियमच्या बाबतीत आपण स्वीकारू शकत नाही. कारण वर लिहिल्याप्रमाणे हा धातू आपल्या शरीर प्रणालीचा घटक नसल्यामुळे, जर त्याचे अंश शरीरात गेले तर त्याचा विषारी परिणाम शरीरावर होण्याची दाट शक्यता असते. शिसे वा कॅडमियम या धातूंना देखील हेच तर्कशास्त्र लागू पडते. शिशामुळे नुकताच जो गदारोळ अनुभवण्यास मिळाला तो वाचक विसरले नसतीलच!
ws08अल्युमिनियम वापरायचेच असेल तर ते निदान खाली दिलेल्या गोष्टींसाठी तरी अजिबात वापरू नये. चिंच, लिंबू, आमसूल यांचा वापर करून शिजविण्याच्या अळू, भेंडीसारख्या भाज्या किंवा आमटी, दह्याची कढी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फोडणी किंवा तळण करण्यासाठी दह्याचे विरजण लावण्यासाठी इडली, डोसा यांसाठी जे भिजविलेल्या डाळीचे व तांदळाचे वाटून झाल्यावर मिश्रण केले जाते ते ठेवण्यासाठी, पाणीपुरी घरी करणार असाल तर त्यासाठी चिंचेची व पुदिन्याची पातळ चटणी बनविण्यासाठी तेलाचा वापर करून थालीपीठ, चकली, शेव यांसारखे पदार्थ करण्यासाठी जी पिठे भिजवून ठेवतो त्यासाठी दूध तापविण्यासाठी किंवा त्यापासून बासुंदी अथवा खवा बनविण्यासाठी तुपाचा वापर करून पाव किंवा केक बनविण्यासाठी हे सर्व अशासाठी करावयाचे नाही, की अल्युमिनियम व तेल, तूप किंवा आंबट पदार्थामुळे ज्या रासायनिक प्रक्रिया घडतात त्यातून या धातूचे काही प्रमाणात तरी अंश मुक्त होतात. हे अंश अन्न पदार्थामध्ये मिसळतात व मग ते सर्व शरीरात हळूहळू भिनू लागतात. नेहमी जर असे होत राहिले तर मग शरीरातले या अंशांचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता असते. शरीरातील उत्सर्जन प्रणाली या अंशांना मूत्रपिंडामार्फत फॉस्फेटच्या स्वरूपात बाहेर फेकत राहते, पण ती क्षमता ओलांडली की हे अंश मग मेंदू, यकृत, प्लीहा आणि स्नायूंमध्ये साठून राहातात व स्मृतिभंश होऊ  शकतो. या अंशांमुळे
शरीरातील लोहाच्या कार्यात अडथळे येतात आणि अनिमिया सदृश स्थिती निर्माण होते. पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होऊन मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मेंदूत अल्युमिनियमचे अंश आढळून आलेले आहेत.
अल्युमिनियमला पर्याय काय?
लोखंडाची भांडी पूर्वापार चालत आलेली आहेत. लोखंडाची जागा स्टेनलेस स्टीलने कधी घेतली हे फारसे लक्षात देखील आले नाही. स्टेनलेस स्टील हा लोखंडाचाच मिश्र धातू असून त्यात निकेल व कोबाल्ट मिसळलेले असते त्यामुळे ते गंजत नाही व चकाकूसुद्धा लागते. मुख्यत: औद्योगिक क्षेत्रात झालेला हा बदल स्वयंपाक घरातदेखील स्थिरावला. कारण स्टेनलेस स्टील तसे खूपच बहुगुणी आहे. मात्र आजकाल बाजारात चांगल्या प्रतीचे स्टील मिळेल याची खात्री देता येत नाही. स्टीलचे पेले, वाटय़ा, पातेली किंवा ताटल्या बऱ्याच वेळा ठेवून ठेवून फाटलेल्या दिसतात. असले स्टील अर्थातच अतिशय कमी प्रतीचे असते. आता स्टील व तांबे असा जोडधातु
भांडी बनविण्यासाठी वापरला जातो व तो स्वयंपाकासाठी
अगदी उपयुक्त आहे. स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी सोपी असतात. अन्न पदार्थाबरोबर त्यांची परस्पर क्रिया होत नाही
व त्याचे अंशदेखील लवकर मुक्त होत नसल्यामुळे अन्न
सुरक्षित राहते. केक, पाव वा बिस्किटे भाजण्यासाठी अल्युमिनियमचा ट्रे न वापरता स्टीलचा ट्रे वापरणे त्यामुळेच संयुक्तिक असते.
काळाच्या ओघात टिकून राहिलेले व नेहमीच नव्याने झळाळी प्राप्त झाली असे नवे वाटणारे मूलतत्त्व म्हणजे काच. सिलिका या मूळ स्वरूपात आकर्षक नसली तरी एकदा ओतल्यानंतर मात्र ही काच अतिशय सुरेख दिसते. काचेच्या भांडय़ांचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांची आम्ल किंवा अल्कधर्मी अशा कोणत्याच पदार्थाशी कसलीही आंतरक्रिया होत नाही. एकदम गरम करणे किंवा गरम भांडे एकदम थंड करणे जर कटाक्षाने टाळले तर आणि हलक्या हातांनी वापरले तर काचेइतके चांगले मूलतत्त्व आपल्याला पदार्थाच्या सारणीत शोधून देखील सापडणार नाही. चिनी मातीच्या किंवा सेरामिक नावाच्या एका विशिष्ट मिश्रणापासून तयार केलेल्या भांडय़ांचीसुद्धा अन्नाशी फारशी आंतरक्रिया होत नाही. पण  घरातील सारी भांडी काचेची किंवा सेरामिकची ठेवता येत  नाहीत. गृहिणींना ते आवडणारदेखील नाही व फुटण्याचा वेग अधिक असेल तर ही असली भांडी परवडणारदेखील नाहीत.  आजकालच्या मायक्रोवेव्हच्या जमान्यात खास त्यासाठी बनविलेली काचेची भांडी उपलब्ध झाली आहेत. मायक्रोवेव्ह आपल्या स्वयंपाक घरात वापरायचा की नाही हा अर्थात वेगळा मुद्दा आहे व त्यावर भाष्य पुन्हा केव्हा तरी!
हिन्दालियम नावाच्या मिश्र धातूची भांडी बाजारात उपलब्ध आहेत. अल्युमिनियम व मैग्नेशियम या दोन प्रमुख घटकांसह अल्प प्रमाणात क्रोमियम व मैंगनीज या एकूण चार धातूंनी बनलेला हा मिश्र धातू मोठय़ा प्रमाणावर स्वयंपाकाची भांडी बनविण्यासाठी वापरला जात आहे. हिंदालियम अल्युमिनियमपेक्षा अधिक टिकाऊ असतो. तसेच तो अन्नातील विविध घटकांशी फारसा क्रियाशील नसतो. त्याच्या उपयुक्ततेबद्दल फारशी शंका न घेता ती वापरण्यास काही नाही, पण शक्यतो आंबट पदार्थाना यांच्यापासून दूर ठेवलेले चांगले! आपल्याकडे भांडी घासताना फारशी काळजी घेतली जात नाही. राखेने किंवा नदीकाठी मातीने भांडी घासली जातात. जर मिश्र धातूच्या भांडय़ांवर असे घासल्यामुळे चरे पडले तर मग त्यातील क्रोमियमसारखे मूलतत्त्व मुक्त होऊन अन्नात मिसळू शकते आणि ते आपल्याला घातक ठरू शकते.
 सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र
डॉ. शरद काळे – sharadkale@gmail.com

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो