नवी मुंबईच्या निर्मितीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सिडको, बेलापूरजवळ रायगड जिल्ह्य़ात तिसऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ लवकरच रोवणार आहे. राज्य शासनाने सिडकोकडे दिलेल्या २७० गावांजवळच्या जमिनीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून २४ गावांचा विकास आराखडा तयार केला जात आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमिनी दिल्यास सिडको एक आगळी वेगळी इको सिटी बनविण्याचा विचार करीत असून नवी मुंबई निर्मितीत झालेल्या चुका या ठिकाणी टाळल्या जाणार आहे. थोडक्यात उत्तम सुविधा असलेली एक वेगळी नगरी निर्माण करून सिडको परांपरागत शासकीय नियमांना फाटा देऊन खासगी बिल्डरांच्या स्पर्धेत लवकरच उतरणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या जवळ विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, फॉम्युला वन, इमाजिकासारखी खासगी मनोरंजन केंद्रे असलेली तिसरी मुंबई येत्या काही वर्षांत उभी राहणार आहे. ही मुंबई-पुणेकरांनादेखील जवळची वाटणारी आहे.
नवी मुंबईला भविष्यात अन्यन्यसाधारण महत्त्व येणार आहे. बेलापूर ते दिघा या परिसरात पसरलेल्या पालिका क्षेत्रात येत्या काळात इमारत पुनर्बाधणी होणार असून सरकार अडीच एफएसआय देण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या सध्यापेक्षा दुप्पट होणार असून ती तीस लाखांपर्यंत जाणार आहे, मात्र या भागात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास जमीन शिल्लक नाही. याचवेळी सिडकोकडे सरकारने ६०० हेक्टर जमीन विकास आराखडा तयार करण्यास दिली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नयना) ही जमीन मुंबई क्षेत्रापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे सिडकोने पनवेल, उरण, पेण, खोपोली क्षेत्रातील या जमिनींचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. रस्ते, पाणी, वीज आणि सार्वजनिक सुविधा यांची आखणी झाल्यानंतर त्यांची उभारणी करण्याची तयारी देखील सिडकोची आहे. शेतकऱ्यांनी जमिनी देण्याची तयारी दाखविल्यास सिडको त्या शेतकऱ्यांना चार एफएसआय देऊन त्यांच्या जमिनींचे सोने करणार आहे. चार एफएसआयमुळे या भागात तीस मजल्यांच्या टोलजंग इमारती उभ्या राहण्यास मदत होणार आहे. विकासासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे जमीन न देणाऱ्या शेतकऱ्यांना कमी एफएसआयवर समाधान मानावे लागणार असून त्यांना रस्ते गटारासारख्या सुविधादेखील मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांचा विकास हा अस्तव्यस्तरीत्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेत सामील व्हावेत यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, मोनो, फॉम्र्युला वनसारख्या स्पर्धा भरविण्याचे ठिकाण, वसई-विरार कॉरिडोअर, दिल्ली-मुंबई कॉरिडोअर यांसारखे मोठे प्रकल्प पनवेल उरण आणि नवी मुंबईच्या आसपास येत आहेत. पनवेल रेल्वे स्थानक लवकरच कात टाकणार असून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्ससारखे राष्ट्रीय रेल्वे गाडय़ांना सामावून घेणारे जंक्शन होणार आहे. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी बदलण्यात आलेल्या नियमांमुळे नवी मुंबईच्या वाढीलादेखील मर्यादा आली आहे. त्यामुळे अथांग समुद्रकिनारा व विस्र्तीण पर्वतरांगा मिळालेल्या रायगड जिल्ह्य़ाला यानंतर मुंबईच्या अतिरिक्त राजधानीचा भविष्यात दर्जा प्राप्त होईल, असे चित्र दिसून येत आहे. सिडकोच्या मदतीवर रेल्वेने पनवेलपर्यंत रेल्वेचे जाळे विणले असून यानंतर ही लोकल रेल्वे खोपोली पेणपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याने अनेक बिल्डरांनी खासगी प्रकल्प सुरू केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रस्ते, पाणी, वीज या नागरिकांसाठी लागणाऱ्या प्राथामिक गरजा मानल्या जात असून तीन वीज प्रकल्प आणि मोरबे, हेटवणे, बाळगंगासारखी धरणे यामुळे तिसऱ्या मुंबईकडे नागरिकांचा लोंढा वाढणार हे निश्चित दिसून येत आहे.