मंडळी, दैनंदिन व्यवहारात आपला स्थिर विजेशी (Static Electricity)  संबंध येतो व त्यामुळे शॉक बसण्याची भीती असते. टेरिलीन, टेरीकॉट किंवा पॉलिस्टरचा कपडा अंगात जास्त वेगाने घातला किंवा काढला तर कडकड असा आवाज होतो व केस उभे राहतात. केसांमध्ये कंगवा फिरविल्यानंतर ते कागदाला आकर्षित करतात. दोन रोधक किंवा एक रोधक व एक वाहक यांच्यामध्ये जेव्हा घर्षण होते व रोधकतेमुळे त्या वस्तूवर तिला वाहून जाण्यासाठी मार्ग न सापडल्यामुळे तेथेच रहाते, म्हणून या विजेला स्थिर वीज (Static Electricity) असे म्हणतात. वाहक वस्तूचा म्हणजेच शरीराचा त्या ठिकाणी स्पर्श झाल्याबरोबर शरीरातून ती जमिनीत जाते, यालाच स्थिर विजेचा धक्का (शॉक) म्हणतात.
पाण्याची पी.व्ही.सी. पाइपलाइन यांच्यामध्ये पाणी आणि पाइपच्या घर्षणामुळे वीज निर्माण होते. जर पाइपला अर्थिग मिळत नसेल तर शॉक लागण्याची शक्यता असते. पाण्याचे इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, थ्रेशर यांचेवर फिरते रबरी बेल्ट असतात त्यांच्यावरही घर्षणामुळे वीज जमा होते. म्हणून त्यापासूनही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी पाइपलाइन व संबंधित उपकरणे यांचे अर्थिग चांगले केलेले असावे. अन्यथा शॉक लागेल किंवा जवळ ज्वालाग्रही पदार्थ असल्यास आग लागेल. स्थिर वीजेमध्ये व्होल्टेज जास्त असते; परंतु विजेची गळती कमी असल्यामुळे प्राणघातक अपघात होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून अशा उपकरणांचे अर्थिग चांगले असावे व त्यांना स्पर्श करणे शक्यतो टाळावे. जरी स्थिर विजेच्या शॉकने प्राणांतिक अपघात होत नसले, तरी विजेचा शॉक लागला या जाणिवेमुळे मानसिक धक्का बसून इतर प्रकाराचे यांत्रिक अपघात संभवतात. फायबरच्या ब्रीफकेसवर जोराने एखाद्या कपडय़ाने धूळ घासून साफ करताना हिवाळ्यामध्ये ठिणगी दिसेल एवढा विद्युत भार तयार होतो. याचे कारणही घर्षणाने तयार होणारी वीज आहे व जेव्हा वातावरणातील तापमान कमी असते तेव्हा पदार्थाची रोधकताही कमी होते. रोधकता कमी झाली की वीज प्रवाहाचे प्रमाण वाढते. जेव्हा पेट्रोलजन्य पदार्थ भरलेले वाहन रस्त्याने भरधाव धावत असते; तेव्हा आतील पदार्थाचे आणि टाकीच्या बाहीचे घर्षण होऊन स्थिर वीज जमा होते. याच कारणासाठी मागच्या टायरच्या मडगार्डला लोखंडी साखळ्या जमिनीत घासतील अशा प्रकारे जोडलेल्या असतात. तरीसुद्धा असे वाहन उभे असताना त्याच्या धातूच्या भागास स्पर्श करू नये, अन्यथा शॉक लागू शकतो.
मोबाइल चार्जिगच्या वेळी संवाद केल्याने जे अपघात होतात ते या स्थिर विजेमुळेच. तसेच आपण मोबाइलवर बोलत असताना समजा तो सुरू असतानाच दुसऱ्या कुणाला बोलण्यासाठी दिला आणि त्याचे हात थोडे ओले असतील तर त्याच्या व आपल्या हाताला हलका शॉक लागतो. हा अनुभव मी स्वत: काही वेळेस घेतला आहे. पेट्रोल पंपवर मोबाइल न वापरण्याचे आदेश त्यासाठीच दिलेले असतात. पेट्रोल भरत असताना त्या पाइपभोवती स्थिर वीज निर्माण होते व जवळच कुणी मोबाइलवर बोलत असेल तर या संयोगाने स्फोट होतो. असे अनेक अपघात झाल्याचा इतिहास आहे. पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाचा स्थिर विजेशी संबंध आल्यामुळे असे भयानक अपघात घडतात, हे वाचकांनी लक्षात घेऊन तशी दक्षता घेणे आवश्यक आहे. या विजेच्या पुढील भव्य स्वरूपाचाही आपण येथे विचार करणार आहोत.
आकाशातून कोसळणारी वीज : पृथ्वी आणि आकाश एका कपॅसिटरप्रमाणे आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग एक इलेक्ट्रोड आणि आकाशातील वातावरणाचा थर दुसरा इलेक्ट्रोड; आणि दोहोंमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी या कपॅसिटरच्या  क्षेत्रांमध्ये असतात. आकाशातील भार पृथ्वीच्या पृष्ठभागामार्फत सतत गळत असतो आणि हा भार भरून काढण्यासाठी निसर्गाने आकाशातून वीज कोसळणे हा मार्ग काढला आहे. सर्वसाधारणपणे अशी समजूत आहे, की वीज ही फक्त सर्वात उंच वस्तूवरच पडते. ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. तथापि वीजही कोणत्याही ठिकाणी, त्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती व निर्माण होणारे विद्युत भार यावर अवलंबून असते. परंतु सामान्यत: उंच इमारती व बांधकामांना जास्त धोका असतो. वीज ही वाहक वस्तूवरच पडते हे पूर्णपणे खरे नाही. तिच्या मार्गात जी कोणती वस्तू येईल त्यावर ती पडते. परंतु त्यातल्या त्यात ज्या वस्तू वाहक आहेत त्यावर पडण्याची शक्यता जास्त असते. वाहक वस्तूचे कमी नुकसान होते आणि रोधक वस्तूंचे जास्त नुकसान होते.

आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी खालीप्रमाणे दक्षता घ्यावी.
*  शेतात किंवा पटांगणात वावरत असताना विजा चमकत असतील तर झाडाखाली किंवा झोपडीमध्ये कधीही आश्रय घेऊ नये.
*  पावसात भिजू नये म्हणून छत्रीचा वापर करू नये. पोत्याचा किंवा घोंगडीचा वापर करण्यास काही हरकत नाही.
*  जर आसपास माणसाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीची वस्तू नसल्यास माणसाच्या अंगावर वीज कोसळण्याची बरीच शक्यता असते. अशा वेळी जमिनीवर आडवे झोपावे, चिखलामुळे ते  शक्य नसेल तर पावले एकमेकांना जोडून उभे राहावे. कोणत्याही परिस्थितीत हात डोक्याच्यावर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
*  कुंपण  किंवा लोखंडी आधाराला स्पर्श करू नये.
*  जवळून काही टॉवर लाइन किंवा इलेक्ट्रिक लाइन गेल्या असतील तर त्यांच्यापासून जास्तीत जास्त दूर उभे राहावे.
*  दोन किंवा अधिक माणसे असल्यास एकमेकांना स्पर्श करू नये, तसेच जवळपासच्या अन्य प्राण्यासही स्पर्श टाळावा.
* घर बांधताना शक्यतो आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वात उंच जे बाधकाम असेल त्याच्यापेक्षा घराची उंची कमी ठेवावी.  
* घर जास्त उंच असल्यास त्याला वीज संरक्षण (’lightning protection) देणे आवश्यक आहे. परंपरागत वीज संरक्षण न लावता घराच्या गच्चीवर अर्थमॅट टाइपचे अथवा डेडिकेटेड अर्थ पिटसचे संरक्षण द्यावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
*  वीज संरक्षण दिलेल्या इमारतीवरून जमिनीकडे जाणाऱ्या वीज संरक्षण पट्टीला हात लावू नये. जर असुरक्षित इमारतीत आश्रय घेण्याची वेळ आलीच तर कोठल्याही लोखंडी वस्तूला किंवा धातूच्या पदार्थास स्पर्श करू नये.
* टी.व्ही. सुरू असताना विजा चमकत असतील तर डिस्क किंवा डिश अँटेनापासून जी वायर टीव्हीपर्यंत येते त्याची पिन टीव्हीपासून वेगळी करावी. जिथून पॉवर सप्लाय टीव्ही संचास दिला आहे त्या प्लगचे बटन बंद ठेवून सॉकेट बाहेर काढून ठेवावे.
* विजा चमकत असताना दुचाकी वाहन चालवू नये.
* धातूची बॉडी असलेल्या बससारख्या वाहनातून प्रवास करताना धोका नाही. वीज चमकत असताना रोधक बॉडी असलेल्या वाहनातून प्रवास करू नये. उघडय़ा  वाहनातून प्रवास करू नये.
* विजा चमकत असताना बोटीमधून प्रवास करताना आडवे पडून राहावे.
* विमान प्रवास शक्यतो वाहक धातूपासून बनलेल्या बॉडीच्या विमानातून करावा. फायबर बॉडी किंवा इतर रोधक वस्तूंपासून बनलेल्या बॉडीच्या विमानातून प्रवास करणे टाळावे.
आकाशातील विजेचा वापर करता येऊ शकेल अशी काही लोकांची समजूत आहे. परंतु ती चुकीची आहे. ही शक्ती, उष्णता, प्रकाश, आवाज यात रूपांतरित होते व वापरता येण्यासारखी फार कमी ऊर्जा  शिल्लक राहते, जी साठवण्याची पद्धत अद्याप उपलब्ध नाही. काही ठिकाणी त्या जागेच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आकाशातील वीज वारंवार कोसळते व लोक समजतात की हा
देव-दैवातांचा कोप आहे- जी समजूत अतिशय चूक आहे. पायाळू असणाऱ्या लोकांना
विजेचा धोका जास्त असतो असाही एक
समज प्रचलित आहे, परंतु तो पूर्णपणे
खरा नाही.
मित्रांनो, असे आहेत स्थिर वीज आणि आकाशस्थ वीज यांचे परिणाम आणि त्यापासून सुरक्षित राहाण्यासाठीची दक्षता सूची.
कारखान्यांमध्ये किंवा रासायनिक उद्योगांमध्ये निरनिराळ्या पाइपलाइनचे जॉइंट्स, कपलिंग तसेच फर्नेस इत्यादींना आर्थिग करणे आवश्यक आहे. ज्यामुळे स्थिर विजेपासून सुरक्षा प्राप्त होते. आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी  ’ lightning arrestors मार्फत  संरक्षण देणे आवश्यक आहे. शेवटी, सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, नाही का?
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
plkul@rediffmail.com

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
investor anthony bolton marathi
बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?