मागच्या लेखात आपण घरातील प्रकाशाची चर्चा सुरू केली होती. बाहेरून घरात कोणत्याही वेळी आलो तर अंधार कोठडीत आलो असे वाटू नये इतपत तरी घरात प्रकाश असला पाहिजे, अशी माफक अपेक्षा सर्वाचीच असते. घरात प्रकाश किती आहे हे पाहण्याचे प्रकाशमापक म्हणजेच लाइट मीटर आता तुमच्या स्मार्ट फोनवरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या खोलीत वाचनासाठी किंवा हातात घेतलेले कोणतेही काम करण्यासाठी पुरेसा प्रकाश आहे का, हे आपल्याला सहजपणे कळते. विद्युत ऊर्जा वाचविण्याच्या नादात घरात सर्व दिवे एल. ई. डी.चे किंवा सी. एफ. एल.चे लावायचे ठरविले तर ते योग्य असेलच असे सांगता येणार नाही. सी. एफ. एल.चे दिवे टय़ुब लाइटच्या दिव्यांपेक्षा, तर एल. ई. डी.चे दिवे सी. एफ. एल.च्या दिव्यांच्या मानाने खूपच महाग आहेत. पण त्यांचा कार्यकाळ बराच मोठा आहे. ज्या घरात विद्यार्थी असतील किंवा जेथे वाचन हा नित्याचा दिनक्रम असेल त्या घरांमधून तर सी. एफ. एल.चे दिवे त्रासदायक ठरू शकतात. कारण त्यांचा उजेड वाचनासाठी पुरेसाही नसतो व डोळ्यांवर ताणही निर्माण करू शकतो. एल. ई. डी.चे दिवे परवडत नसतील तर वाचन करण्यासाठी त्यांच्यापेक्षा टय़ुब लाइटचा पर्याय अधिक चांगला असतो. त्यामुळे अभ्यासाच्या खोलीत तरी टय़ुब लाइट असणे आवश्यक आहे.
ws04पूर्वी वापरात असणाऱ्या बल्बमध्ये टंगस्टनचे फिलामेंट असते व ते विद्युत ऊर्जेने तापले की त्यातून प्रकाश उत्सर्जित केला जातो. हा प्रकाश अधिक पिवळसर असतो. सी.एफ. एल.च्या दिव्यांमध्ये आर्गान आणि पाऱ्याचा वापर केलेला असतो. या दिव्यात प्रथम अतिनील किरणे उगम पावतात व ती किरणे दिव्याच्या काचेवर जे दुधी आवरण असते त्यावर पडली की त्यातून आपल्याला जो दिसतो तो पांढरा प्रकाश परावर्तित होतो. त्यातून मिळणारा प्रकाश एकसंध नसण्याचीदेखील शक्यता असते. पर्यावरणाच्या दृष्टीने पारा हा घातकच असतो. एल. ई. डी.च्या दिव्यांमध्ये प्रकाश उत्सर्जित करणारे दोन अर्धगोलाकृती अर्धवाहक डायोडस एकमेकांना जोडलेले असतात. या जोडणीतून विद्युत प्रवाह सोडला की या डायोडसमधून इलेक्ट्रोनचे झोत बाहेर पडतात व त्यातून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश डोळ्यांसाठी सुखद असतो. हे दिवे बल्बसारखे तापत नाहीत व त्यांचा कार्यकाळदेखील दीर्घ मुदतीचा असतो व साध्या बल्बच्या तुलनेत हा पाच ते सहा पटीने अधिक असतो. फक्त त्यांची किंमतदेखील तशीच मजबूत असते.
घर किंवा इमारत बांधतांना सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी खिडक्यांचा योग्य वापर करणे जरुरीचे आहे. खिडक्या जितक्या वरच्या पातळीवर ठेवता येतील तेवढय़ा ठेवाव्यात, म्हणजे घरात प्रकाश सतत झिरपत राहील. घराभोवती जेवढी रिकामी जागा असेल, तेवढा त्याचा चांगला प्रकाश मिळण्याच्या दृष्टीने फायदा होतो. दाटीवाटीने वाढणाऱ्या शहरांमध्ये ही चैन परवडत नाही, कारण जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे आकाशातील सूर्यप्रकाश मात्र दुर्मीळ होऊन बसला आहे! छतावर गच्चीची सोय असली (मुंबईमध्ये तशी शक्यता फारच कमी!) तर तिथे टाइल्स लावण्यापेक्षा टाइल्सचे बारीक बारीक तुकडे लावले तर याचा एक उपयोग घर थंड ठेवण्यासाठी होतो. कारण त्यामुळे छतावर पडणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन करणारे क्षेत्रफळ खूप वाढते व त्यामुळे छत तापत नाही.
दिवाणखान्यात विशेषत: धातूची प्रकाशीय मांडणी (पुस्तकांची मांडणी किंवा शोभेच्या वस्तूंची मांडणी) ठेवली तर त्यावरून अपवर्तित झालेला प्रकाश सर्वत्र पसरतो व त्याचा परिणाम होऊन घर प्रकाशमान राहते. घरात सूर्यप्रकाश प्रत्यक्ष आत येण्यापेक्षा तो असा अपरिवर्तित होऊन आला तर ते डोळ्यांसाठी आल्हाददायक असतो, हे आवर्जून सांगावयाचे आहे. जर झोताच्या स्वरूपात सूर्यप्रकाश खोलीत येत असेल तर मग कमी उजेडाचा व प्रखर उजेडाचा असे विभाग निर्माण होतात व डोळ्यांना त्यांच्याशी जुळवून घेणे अवघड होते. त्याचे कदाचित मग दीर्घकालीन परिणाम आपल्याला सोसावे लागण्याची दाट शक्यता असते.
पूर्वीच्या मंदिरांमध्ये आणि विविध घरांमध्ये राजवाडय़ांमध्ये केलेल्या प्रकाश योजना आपल्याला थक्क करून सोडतात. मीनाक्षी मंदिरातील भिंतींवर व छतांवर केलेले रंगीत नक्षीकाम तीन हजार वर्षांनीदेखील अबाधित असलेले पाहून यावर प्रकाशाचा परिणाम का  झाला नाही, हा अभ्यासासाठी विषय पीएच. डी.च्या प्रबंधासाठी उत्तम संशोधन मुद्दा होऊ शकतो. आपण आज रंगविलेले घर तीन-चार वर्षांनी परत रंगवितो!
स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेणे प्रत्येकाच्या आवडीचे काम असले तरी स्वयंपाकघर हे प्रत्येकाला आवडेल असे मात्र नाही. हल्ली तर घरच्या स्वयंपाकघरापेक्षा बाहेरची क्षुधाशांतीगृहे आवडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे! वास्तविक स्वयंपाकघर ही माझ्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे; आणि या स्वयंपाकघरात काम करणारी गृहिणी ही या प्रयोगशाळेत सातत्याने संशोधन करणारी एक शास्त्रज्ञ आहे, यात शंकाच नाही. या प्रयोगशाळेत काय काय निर्माण होईल हे त्या त्या शास्त्रज्ञाच्या सृजनशीलतेवर अवलंबून असते असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे घरातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे विसरायचे नाही. अन्यथा जसा शतकानुशतके हा शास्त्रज्ञ उपेक्षित राहिलेला आहे, तसाच तो पुढेही राहील. या शास्त्रज्ञाला तिच्या निर्मितीचे आपण श्रेय तर देत नाही, पण त्यातील चुका मात्र आवर्जून दाखवून देतो! या शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेची म्हणजेच स्वयंपाकघराची रचना करताना आपल्याला काही बारकावे माहीत असले तर गृहिणीचे काम सोपे होईल व स्वयंपाकघर आणि गृहिणी दोन्हीही प्रसन्न राहतील.
स्वयंपाकघरात प्रवेश करताच झुरळे किंवा पाली नजरेस पडल्या तर कुणालाच आवडत नाही, पण कीटनाशकांचा भरमसाट वापर करून त्यांना दूर ठेवण्यापेक्षा जर आपण काही पथ्ये पाळली तर पर्यावरणास घातक ठरणारी ही कीटनाशकांची विषे आपल्याला आणावी लागणार नाहीत व आपले स्वयंपाकघरसुद्धा छान राहील. हल्ली स्वयंपाकघरासाठी मुद्दाम जाहिरात करून झकपक दिसणारी चाकांची कपाटे विकली जातात, पण असली खरेदी करताना किंवा तसली कपाटे बनविताना दोन कपाटांमध्ये जागा राहाणार नाही एवढय़ा सुबकतेने हे काम झाले पाहिजे. कारण झुरळांची व पालींची वस्ती या ठिकाणी होऊ  
शकते. या कपाटांचे दरवाजे नीट बंद होतात की
नाही ते पाहणे व त्यात कोणतीही सांडासांड होणार नाही याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण सांडलेल्या या पदार्थाचा या विविध प्राण्यांना अन्न म्हणून उपयोग होतो व एकदा का त्यांचे
प्रजनन सुरू झाले की मग ते थांबविणे आपल्याला कठीण असते.   
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग,
डॉ. शरद काळे – sharadkale@gmail.com
भाभा अणुशक्ती केंद्र