गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही मुलं शेताच्या बांधावर आणि मोकळ्या वाटेवर उभे राहून रस्त्यावर जाणाऱ्या गणपतींकडे बघत राहायचो. रस्त्यावरून जाणारे गणपती बघताना आनंद द्विगुणित व्हायचा. त्याच हमरस्त्यावरून हातगाडीवरून आमचा गणपती यायचा. गुलालाची उधळण करीत.. ताशे-वाजंत्र्यांच्या गजबजाटात..! ‘गणपती बाप्पा मोरया..’ भाऊ मोठय़ाने ओरडायचे.. आम्ही कोरस द्यायचो.
प्रदूषणाने ग्रासलेल्या शहराच्या कोंडीत गुदमरलेला मी.. जेव्हा शहराची बकाल सीमा ओलांडून बाहेर येतो तेव्हा वाटे वाटेवर एक दीर्घ श्वास सोडून कोंडलेल्या शरीराला हलके करून घेतो.. आणि हळूहळू गावकुसाजवळ पोहोचतो. गावाच्या सीमेवर पाऊल ठेवताना हिरव्यागार पाऊलवाटा पायघडय़ा घालतात आठवणींच्या.. अन् आकाशाची फिक्कट निळाई अलगद उतरते.. उंच डोंगरावरून हिरव्यागर्द झाडांच्या शेंडय़ावर! ओळखीचे पक्षी साद घालू लागतात तेव्हा मोकळ्या आकाशाचे अंतरंग कवेत घेऊन मी चालू लागतो प्रसन्न मनानं.. माझ्या पायात अचानक बळ येतं.. दहा हत्तींचं.. रोमारोमात शक्ती येते. मातीचं अतूट नातं एकरूप होतं. मी शहर विसरतो.. प्रदूषण विसरतो.. बकाल वस्ती विसरतो. पायात बळ आणि श्वासात मंतरलेली माती घेऊन मी चालत राहतो.. अधाशासारखा! माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसतं.. दूर झाडांच्या सावलीत विसावलेलं माझं कौलारू घर..! आणि दुरूनच ओळखणारी छपरावरची लाल-लाल कौलं. मग मी भेटतो दगडांना.. खडकांना.. उतरणीवरच्या झुडपांना.. नदीकाठच्या लव्हाळींना. मी बांध ओलांडून घराच्या अंगणात येतो.. जिथं माझी माय उभी असते.. वाटेकडे डोळे लावून.. काठोकाठ डोळे भरून..! मी तिच्या पवित्र चरणांना स्पर्श करतो आणि घरटय़ातल्या पिल्लासारखा तिच्या पंखात विसावतो.. अमृत स्पर्शाने न्हाऊन जातो.. शहर सोडल्यावर!
मला आठवतंय.. श्रावण संपून भाद्रपदाचं आगमन झालं की, आम्हा मुलांना केवढा आनंद वाटायचा त्या दिवसात..! कोकणातल्या घराघरांतून आनंदाचं वारं वाहू लागतं. प्रत्येकजण आपलं घर साफसूफ करायला लागतो. घरातली मोठी माणसं केरसुणी घेऊन घर झाडायला घेत. माजघर.. देवघर.. पडवी.. ओटी.. माळा सर्व घर केरसुणीनं झाडलं जायचं. काळी जळमटं झाडूला चिकटून खाली पडायची. आमची लुडबुड बघून मोठी माणसं खेकसायची.
‘काय आहे तुमचं या कचऱ्यात? जा तिकडे ओटीवर बसा. जळमटं डोळ्यात जातील.’ आमचे भाऊ मोठी केरसुणी काठीच्या दांडय़ाला बांधायचे आणि कौलारू छपरातील रिप आणि नळ्यातील जळमटं काढायचे. देवघर, माजघर जळमटं काढल्यावर स्वच्छ दिसायचं. माजघरात काळोख होता, पण छपरावरचं एक कौल काढून भाऊंनी तिथे काच बसविली होती. त्यामुळे देवघरापर्यंत उजेड यायचा. भाऊ म्हणजे आमचे काका. एक-दोन दिवसांत घर साफसूफ व्हायचं. घर साफ झालं की, अंगणात वाढलेलं गवत काढलं जायचं.
भाऊ आम्हा मुलांना गवत काढायला लावत. अंगणात पडवळ, दोडकी, काकडीचे वेल असायचे, वेलांना मातीचा, शेणखताचा पुरवठा असायचा आणि सभोवार उंच काठय़ा..! आणि वेलांच्या सभोवार लहान काठय़ांचा आडवा मांडव. उद्देश हा असायचा की, कोंबडी किंवा इतर पक्षी आत जाऊ नयेत. वेलांना तोडू नयेत. पुढे पुढे वेल मोठे होऊन मांडवाखाली पडवळं लोंबायची. या पडवळांचा सुगावा लागून शेजारच्या आंब्यावर गरुड येऊन बसायचे. मांडवावर झपकन झेप यायची आणि पडवळ तोडून गरुड पसार व्हायचा. गरुडाच्या झेपेचा अंदाज कोंबडय़ांना यायचा. कोंबडय़ा कलकलाट करायला लागल्या की, घरातली माणसं बाहेर येऊन बघायची. गरुड किंवा एखादा कोल्हा.. मुंगुस कोण आलंय का? याचा अंदाज घ्यायची. ‘झो.. झो.. झो..’ करीत ओरडायची. माणसांच्या आवाजानं कोल्हा, मुंगुस अथवा गरुड दिसेनाशी व्हायची.
गरुडाचा अंदाज घेऊन आम्ही गवत काढायचो. मग भाऊ ओरडायचे. ‘अजून खळ्यातलं गवत काढून होत नाही. काय चाललंय तुमचं? एवढं साधं काम करता येत नाही.. जा तिकडे, हात धुवा आणि अभ्यासाला बसा.. नको तुमची मदत.’ मग भाऊ एकटेच सगळं खळं साफ करायचे. फावडय़ाने बारीक गवत तासून काढायचे आणि शेताच्या बांधावर मातीत पुरायचे. संध्याकाळपर्यंत खळं स्वच्छ आणि सुंदर दिसायचं. आजूबाजूला वाढलेलं गवत.. पुढे भातशेती आणि भातशेतीतून सरळ जाणारी वाट..! वाटेवरचं गवत काढून चिखलात पाय जाऊ नयेत म्हणून नदीच्या पात्रातले मोठाले दगड वाटेवर व्यवस्थितपणे लावायचे. गणपती येण्याच्या अगोदर आठ-दहा दिवस भाऊंचा हा उद्योग चालूच असायचा.
तेव्हा आजी घरी होती. ती भाऊंच्या कामाची तारीफ करायची. साफसूफ घर बघून आणि घरासमोरील स्वच्छ अंगण बघून आजी खूश व्हायची आणि म्हणायची. ‘घरादाराकडे माझ्या भाऊचंच लक्ष.. पोरांना मदतीला बोलावील आणि सगळी कामं चोख करून घेईल. कामावरून आला तरी स्वस्थ बसणार नाही. शेतात जाईल.. गुरं-ढोरं बघील. सगळी व्यवस्था करील, तेव्हा घरात येईल. गणपती आले की, तो चार पटीने अधिक काम करतो. तेव्हा त्याचा हुरूप वाढतो, पण बरोबरच हाय.. आपलं घर म्हणजे येत्या जात्याचं घर..! एवढी लोकं येतात.. बसतात ..आपली पुण्याई म्हणून एवढय़ा लोकांचे पाय आपल्या घराला लागतात..!
आजीचं हे बोलणं आम्ही ऐकत असू. तेव्हा भाऊ कामावर गेलेले असायचे. आमच्या घरी खूप माणसं यायची. सन १९६७ च्या चक्रीवादळात आणि भूकंपात जुन्या घराची पडझड झाली. त्या वेळी आम्ही मुलं लहान होतो. भूकंपाचा तो थरथराट आणि घोंघावणारं चक्रीवादळ आजही मनात घर करून आहे.. रात्री सर्व माणसं त्या वेळी घराबाहेर तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या, बांबू गवतानं झाकारलेल्या निवाऱ्यात राहत असू. नंतर मग १९६८ साली हे नवीन मोठं पूर्वाभिमुख घर बांधण्यात आलं. भाऊंचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांना ज्योतिष विद्या अवगत होती. भाऊ ज्योतिष बघायचे. घराच्या जागा दाखवायचे. विहिरींसाठी पाण्याची जागा दाखवायचे. शनिवार आणि रविवार भाऊंना सुट्टी असली की सकाळपासून लोक घरी यायचे. भाऊ प्रत्येकाला पंचांग बघून मुहूर्त सांगायचे. दक्षिणेचा आग्रह नसायचा. लोक आपल्या मनाने दक्षिणा द्यायचे आणि समाधानाने आपल्या घरी परतायचे. कोणाचे मूल घाबरले, खूप रडू लागलं तर मंत्र म्हणून अंगाराही द्यायचे. लोकांची श्रद्धा होती, गुण यायचा.
गणपती जवळ आले की, भाऊंच्या उत्साहाला पार राहायचा नाही. घर, अंगण अगोदर साफ केलेलं असायचं. भाऊ वाण्याच्या दुकानातून रंग आणायचे. हिरवा, पोपटी आणि गुलाबी रंग पिशवीतून घेऊन यायचे. बरोबर साबुदाणे किंवा गव्हाचे पीठ. रात्री साबुदाण्याची कांजी बनवायचे आणि घरातील लहान मोठे टोप आणून त्याच रंग तयार करायचे. रंग काढण्याचा आमचा उत्साह वाढायचा. आम्हा मुलांना छोटय़ा-छोटय़ा भांडात रंग ओतून द्यायचे. भिंतीचा वरचा भाग स्वत: रंगवायचे. आमचा हात पुरेल तेवढा रंग आम्ही काढीत असू. मग भाऊ एक सफेद दोर रंगात बुडवून भिंतीच्या तीन फूट वर आडवी रेषा मारायचे आणि त्या रेषेखाली गुलाबी रंग काढायचे. देवघर, ओटी आणि पडवीच्या रंगाचं काम दोन-तीन दिवसांत पूर्ण व्हायचं.
गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही मुलं शेताच्या बांधावर आणि मोकळ्या वाटेवर उभे राहून रस्त्यावर जाणाऱ्या गणपतींकडे बघत राहायचो. रस्त्यावरून जाणारे गणपती बघताना आनंद द्विगुणित व्हायचा. त्याच हमरस्त्यावरून हातगाडीवरून आमचा गणपती यायचा. गुलालाची उधळण करीत.. ताशे-वाजंत्र्यांच्या गजबजाटात..! ‘गणपती बाप्पा मोरया..’ भाऊ मोठय़ाने ओरडायचे.. आम्ही कोरस द्यायचो. भाऊंना गणपतीची खूप हौस होती.
..आम्ही मुलं मोठी झालो. नोकरी-धंद्याला लागलो. भाऊ निवृत्त झाले आणि त्याच वर्षी गणपतीत भाऊ हृदयविकाराच्या झटक्याने गेले. भाऊंचा मृत्यू झाला तो दिवस गौरी-पूजनाचा होता..! घरात गौरी-गणपती आणि भाऊंचा मृत्यू..! हा अनाकलनीय धक्का आम्हा कोणालाच सहन झाला नाही. तो दिवस आम्ही कोणीही विसरू शकत नाही. संपूर्ण घरावर काळोखाची छाया पसरली. ज्या भाऊंनी गणपतीची वर्षांनुवर्षे मनोभावे सेवा केली, त्यांचा मृत्यू साक्षात गणपती घरात असताना व्हावा, हे आम्हाला मान्यच होईना. पुढे ज्योतिष, पंचांग मुहूर्त त्यांच्या सोबतच गेले.
पुढे आम्ही सर्वानी मोठय़ा मनानं दु:खं पचवलं. भाऊंचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले. त्यांची गणपतीच्या मूर्तीची हौस, मखर सजावट आणि ओटीवरची आराम आजही आम्ही दरवर्षी करतो. भाऊंची आठवण येते तेव्हा जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला मानून मनाची समजूत करून घेतो.
भाऊ जाऊन आता तीस वर्षे झाली. दुर्दैवाने गेल्या गणपतीत काकी पण गेली. मायेची पाखर घालणारी आजी तर आम्हाला केव्हाच सोडून गेली. आता भाऊही आमच्यात नाहीत, पण त्यांनी पेरलेली संस्कारांची बीजं या घरात अंकुरली आहेत. या घरानं कित्येक उन्हाळे-पावसाळे पाहिले, दु:खाचे क्षण भोगले आणि कित्येकदा आनंदाचे क्षण अक्षरश: अंगाखांद्यावर झेलले. नवी पिढी आता समर्थपणे उभी राहिली आहे.. घराचे प्राथमिक संस्कार जोपासण्यासाठी आणि घरपण टिकविण्यासाठी..! आज वर्षांनुवर्षे आम्ही घरापासून दूर असलो तरी आमचं मन घराभोवती सदैव घिरटय़ा घालत असतं. हे घर आम्हाला केवळ घर नव्हे तर साक्षात एक मंदिर वाटतं..!