चतुर्थीच्या आधीचा दिवस तर कसोटीचा असे. सकाळी गुरे चरायला घेऊन जातानाच साऱ्यांचे बेत आखलेले होते. इधळ्या खडकाजवळ गुरे रानात लावली आणि आम्ही सारे रानात घुसलो. खटखटीच्या फांद्या उभ्या भेतून त्याचे दोर काढले. मग शेरवडा, कांगले, हरणे, तेरडा आदी फुलपत्री जमा झाली.
कोकणातला सर्वात मोठा उत्सव चतुर्थीचा. प्रत्येकाच्या घरी गणपती. चतुर्थीच्या दिवशी घरातल्या मखरात मूर्ती विराजमान होईपर्यंत धावपळ सुरू असायची. गणपतीच्या निमित्ताने अनेक घरांची कुलपे उघडत. चाकरमानी मंडळी येण्यापूर्वी सारी साफसफाई उरकावी लागे. घराभोवताली वाढलेले रान काढण्यापासून घराची रंगरंगोटी, घराचा गिलावा, सारवण ही कामे आवर्जून असायची.
चतुर्थीच्या आधीचा दिवस तर कसोटीचा असे. सकाळी गुरे चरायला घेऊन जातानाच साऱ्यांचे बेत आखलेले होते. इधळ्या खडकाजवळ गुरे रानात लावली आणि आम्ही सारे रानात घुसलो. खटखटीच्या फांद्या उभ्या भेतून त्याचे दोर काढले. मग शेरवडा, कांगले, हरणे, तेरडा आदी फुलपत्री जमा झाली. रानात कोण कुठे शिरलाय याचा कोणालाच ठाव लागत नव्हता. जाळीतून एकेक जण बाहेर पडू लागला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य त्यांना मनाजोगती फुलपत्री गवसल्याची पावती होती.
दुपारी गुरांना गोठय़ात बांधून देवपूजेची भांडी घासण्यासाठी सारी मुले व्हाळावर जमली. घराकडून जातानाच प्रत्येकाने गडू तांब्या, ताम्हण, पळी, घंटी, समई ही देवपूजेची भांडी घेतली. त्यांना चिंचेचा कोळ लावून तशीच जाळीत लपवून ठेवली. तळ्यात बुडक्या (डुबकी) मारून आल्यावर सगळी भांडी घासून चकचकीत केली. आपलं प्रतिबिंबही या भांडय़ावर दिसू लागलं.
तिन्हीसांजेला घासूनपुसून कंदील स्वच्छ केला आणि ते पुढल्या दारच्या दांडीला अडकवला. दुपारचं शिळंपाकं पोटात ढकलून मंडपी सजावटीच्या कामात मग्न झालो. वळईत कांबळे अंथरून सारी फुलपत्री त्यावर आणून ठेवली. मंडपी बांधताना काही शिरस्ताही पाळावा लागतो. मध्यभागी आंब्याचा टाळ, गणपतीच्या उजव्या बाजूला कवंडळे, सुपारीचे शिपट आणि दर्शनी भागावर हरणे, तेरडा, शेरवड, कांगळे. खटखटीच्या दोराने लोंबकळत बांधली तेव्हा खऱ्या अर्थाने मंडपीला शोभा आली.
भिंत रंगवणे हे आणखी एक जिकिरीचे काम असायचे. काही जणांच्या भिंतीवर विविध देवदेवतांची चित्रे काढली जात. आमच्या भिंतीवर गेली कित्येक वर्षे कमळेच फुलत आली आहे. मग ती ६, १२, २४ पाकळ्यांचीही असत. नामग्याकडून आणलेल्या कंपासपेटीने कमळ काढले आणि त्यात बिंबलीने विविध रंग भरले. पण खडबडीत भिंतीवर हे रंग चढू लागले. मग त्यावर सफेद रंग लावला आणि काहीशी मलमपट्टी केली. कमळाखाली दोन्ही बाजूला हिरवीगार पाने आणि लालभडक कळी खुलून दिसू लागली. कमळाखाली नक्षीदार कुंडी. ही कलाकृती मात्र केवळ आदल्या दिवशीच दिसायची. पूर्वजांपासून चालत आलेला परंपरेचा वारसा आमच्या पाचव्या पिढीपर्यंत येऊन पोचला आहे. चार-सहा व्यक्तींना उचलताना शिकस्त करावी लागणारे बाकडे, त्यावर सागवानी चौरंग अन् त्यावर श्रीगणेश. दोन्ही बाजूला मंडपीला टांगलेले लामणदिवे.
एव्हाना मध्यान्ह रात्र उलटून गेली होती. डोळे पेंगू लागले. आकानेही सारवण आवरते घेतले. मंडपीला बांधलेल्या फुलपत्रीचे निर्माल्य टोपलीत भरून ठेवले आणि वळईतच मुटकुळी मारून झोपी गेलो. आका झोपली की नाही याचा मला थांग लागला नाही, पण पहाटेच्या कोंबडय़ाच्या आरवण्याने ती उठली आणि मलाही जागवले. डोळे चोळीतच मी कसाबसा उठलो आणि न्हाणीघरात पळालो. आकाने पाणी तापून ठेवलं होतं. ती आता स्वयंपाकघरात शिरली होती.
दिवस उजाडला. बाळू कुंदरकर घरी आला तसा मी घरात पळालो आणि मोठा पाट घेऊन बाहेर आलो. तेरईच्या बाबी मेस्त्रीकडे गणपती आणायला निघालो. आमचे घर ते तेरई साधारण पाऊण तासांचं अंतर. एक घाटी चढायची अन् एक उतरायची, असा प्रवासाचा मार्ग. गणपती शाळेत झुंबड उडाली होती. बाबीची लेखणी लाजबाब होती. मागच्या पडवीत सारे गणपती रांगेत झाकून ठेवले होते. एक छोटी, पण देखणी मूर्ती बाळू कुंदरकरने उचलून पुढच्या दारी आणली. पानाचा विडा आणि २१ रुपये त्या मूर्तीच्या पुढय़ात ठेवून मनोभावे नमस्कार केला. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत बाळूने मूर्ती डोक्यावर घेतली. गर्द झाडी, तेरईचा डोंगर आणि पायलेकोंडाची घाटी उतरून देवळाकडे येईपर्यंत दमून गेलो होतो. खळ्यात आल्यावर ‘गणपती बाप्पा मोरया’चा नारा दिल्यावर आकाने बाहेर येऊन पाणी ओवाळले.
गणपती चौरंगावर येऊन बसला; पण अजून भटजीकाकांचा पत्ता नव्हता. आकाच्या उकडीच्या मोदकाच्या वासाने भूक चाळवली. इतक्यात कुणी तरी ओरडले- ‘भटजीकाका इले रे.’ आमचे भटजीकाका म्हणजे ९-१० वर्षांचा मुलगा. चंदूभटजी अंथरुणाला खिळल्यापासून त्याचा मुलगा आमच्या वाडीची सेवा करतो. गणेशपूजन आणि गणेश विसर्जन याचवेळी मात्र तो नजरेस पडतो. वाडीत कोणाकडे सत्यनारायण पूजा असली की बाहेरच्या गावचा भटजी बोलवावा लागतो. आमची वाडी भटवाडी, पण आज मंगलकार्यासाठीसुद्धा भटजी मिळणे कठीण झालेय. अवघ्या ५ मिनिटांत माझी पूजा आटोपली. हातावर गंधफुले घेतली आणि त्यावर आकाने आणून दिलेले २ रुपये भटजीकाकांच्या हातावर ठेवून चरणावर डोके ठेवले.
केळीच्या भल्यामोठय़ा पानावर आकाने नैवेद्य आणून गणपती, महादेव, उंदीरमामा यांच्या पुढय़ात ठेवला. मी पाणी सोडले आणि त्यातलेच एक पान पुढय़ात ओढून जेवायला बसलो. दुपार टळून गेल्याने चापून भूक लागली होती. आकाने भरगच्च चूण भरलेले उकडीचे मोदक चांगलेच हादडले. गणपतीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. सगळ्यांच्या घरी आरती नित्याचीच. आपापसातील भेदभाव विसरून सारे गणपतीमय होऊन जातात. १० दिवस रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या भजनात सारे रममाण होऊन गणपतीच्या सेवेत तल्लीन होतात.
मुलांचे शिक्षण, मधनूच उद्भवणारे आकस्मिक आजारपण, कामावर न मिळणारी सुटी यामुळे गणपतीच्या पहिल्या दिवसाचा आनंदआज घेता येत नाही. पण ११ दिवसांत गणपतीच्या दर्शनासाठी गावाकडे आवर्जून पावले वळतात आणि गतस्मृतींच्या हिंदोळ्यावर मी आपसूक सुखावून जातो. ल्ल ल्ल
vasturang@expessindia.com