दिवाळी हा संपूर्ण वर्षांतील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी सण. दिवाळी म्हणजे आबालवृद्धांना आनंदाने आणि आपलेपणाने बांधून ठेवणारा सण. या अत्यंत उत्साही वातावरणात सर्व जण फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. परंतु हा आनंद कायम रहावा आणि दिवाळी निर्विघ्नपणे साजरी व्हावी यासाठी गृहनिर्माणसंस्थांनी आणि सभासदांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दणाणून जाते. आवाजी फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण त्रासदायक तर आहेच; परंतु त्याचा विशेष त्रास ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांना होतो. तसेच या फटाक्यांतून निघणारा धूर वायुप्रदूषणातही भर घालतो. याशिवाय मोठय़ा फटाक्यांमुळे आगीसारख्या दुर्घटनाही अधिक प्रमाणात घडतात. यासाठी आपण कोणती उपाययोजना केली पाहिजे याची माहिती घेऊ .

सभासदांनी हे करावे-

दिवाळीत मुलांना सर्वात मोठा धोका निर्माण होतो तो फटाक्यांमुळे. सर्वच वयोगटांच्या मुलांना खूपच जपावे लागते. त्यांच्यावर सतत बारीक लक्ष ठेवावे लागते. फटाक्यांमुळे त्यांच्या शरीरास कोणत्याही प्रकारची इजा होऊ  नये म्हणून काळजी घ्यावी लागते. पालकांनी आपल्या मुलांना आवाजविरहित फटाके  वाजविण्यास प्रोत्साहित करावे. आवाजी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन नीट समजावून सांगावे व आपणही त्याप्रमाणे वागावे. फटाके वाजविताना मुलांच्या पायात स्लीपर/ चप्पल असल्याची खात्री करावी. फटाके वाजविण्याच्या नादात, वाजवून झालेल्या फुलबाजांच्या गरम तारांवर तसेच जळलेल्या भुईचक्रावर पाय पडून पाय भाजण्याच्या घटना दर वर्षी नोंदविल्या जातात.

हवाई डे आऊट, नाइट आऊट व रॉकेटसारखे फटाके रस्त्यावर, इमारतीत किंवा इमारतीपासून  ५० फुटांच्या आत वाजविण्यास बंदी असूनही मोठय़ा मुलांना असे फटाके वाजविण्याचा मोह आवरत नाही. दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या इमारतीबाहेर असे फटाके वाजविल्याने आग लागण्याच्या घटना दिवाळीच्या काळात अधिक प्रमाणात घडतात. दिवाळीच्या दिवसांत रोज कुठे ना कुठे फटाक्यांमुळे लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. अगदी क्षुल्लक फटाक्यांमुळे मोठी आग लागून वित्तहानी होण्याच्या घटना घडत असतात. दर वर्षी अशा घटनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना याबाबत योग्य ती समज देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

दिवाळीत प्रत्येक घरात बाल्कनीमध्ये आकर्षक कंदील लावलेले असतात. त्याचबरोबर विविध रंगांच्या विजेच्या माळा बाल्कनीच्या ग्रिलला लावण्यात येतात. अनेकदा बाल्कनीमध्ये थ्री-पिन सॉकेट सुविधा नसल्यामुळे कंदील व विजेच्या माळांच्या वायर्स थ्री-पिन सॉकेटमध्ये काडय़ापेटीच्या कांडय़ाच्या साहाय्याने घुसवून ठेवतात. हे अत्यंत धोकादायक आहे. आपल्या घरातील मुले असे काही प्रकार करीत असतील तर पालकांनी त्यांना त्वरित रोखले पाहिजे व वायर्स थ्री-पिन प्लगने जोडण्याची सक्ती केली पाहिजे. अन्यथा ऐन दिवाळीत एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांच्या व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांकरिता दिवाळीपूर्वी एक सूचना जारी करावी व त्याची एक प्रत संस्थेच्या सूचना-फलकावर लावण्यात यावी. या सूचनेत दिवाळीच्या काळात मोठय़ा फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात तसेच इमारतीचा पॅसेज, रस्ते, इमारत व इमारतीपासून ५० फुटांच्या आत कोणत्याही स्वरूपाचे फटाके वाजविण्यास आणि रात्रौ १० ते सकाळी ६ या वेळेच्या दरम्यान फटाके वाजविण्यावरही पोलीस खात्यातर्फे र्निबध घालण्यात आल्याची माहिती देण्यात यावी व सहकार्यासाठी आवाहन करण्यात यावे.

संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनातील पोलिसांनी प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था व अन्य इमारतीस भेट देऊन बेकायदेशीरपणे फटाके वाजविण्याबाबतच्या नियम व र्निबधांबाबत संस्थेच्या सूचना-फलकावर सूचना लावली असल्याची खात्री करावी. तसेच रस्त्यावर फटाके लावण्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना होणारा त्रास व गैरसोय टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास स्वतंत्र हेल्प-लाइन अथवा टोल- फ्री क्रमांक उपलब्ध करून नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावी. पोलिसांनी त्यांच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी केल्यास सर्वसामान्य नागरिकांना ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणापासून मोकळा श्वास घेता येईल व अग्निशमन दलाला फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगी विझविण्याचा ताण हलका होईल.

– विश्वासराव सकपाळ

vish26rao@yahoo.co.in