उच्छिपिलयार विनायक मंदिर त्रिचीमधल्या इतर अनेक मंदिरांएवढं भव्य-दिव्य नसलं तरी उभ्या खडकाच्या माथ्यावर हे अत्यंत प्रमाणबद्ध व आकर्षक असं मंदिर बांधण्यासाठी शिल्पशास्त्रींनी आपलं ज्ञान व कारागिरांनी आपलं कौशल्य पणाला लावून घडविल्याचं जाणवतं.

विश्वनिर्मितीची क्षमता असणाऱ्या ओंकाराचं मूर्तिमंत रूप असलेला, देवांनाही पूजनीय व परमप्रिय असा  श्रीविनायक! याची जागृत स्थानं लेण्याद्री वा कालाहस्तीच्या पाताळ विनायकाचा अपवाद वगळता सपाट प्रदेशात आहेत. आपल्या प्राचीन संस्कृतीतल्या या नियमाला वा संकेताला छेद देत पृथ्वीतलावरील प्राचीनतम खडकावरचं प्राचीन भारतीय वास्तुशिल्पशास्त्रातला चमत्कार मानलं गेलेलं उच्छिपिलयार विनायक मंदिर हे दक्षिणेतील त्रिची (तिरुचिरापल्ली) शहराचं मानबिंदू मानलं जातं. चोल साम्राज्यातील तेवर या पवित्र स्थळांच्या यादीतलं हे अत्यंत लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे भारतीय प्रज्ञा, कला व कारागिरी यांचा अप्रतिम आविष्कार होय!
प्राचीनकाळी आदिशेष व वायू यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ युद्धात हिमालय पर्वताचे तीन तुकडे उडून दक्षिणेत पडले व त्या तुकडय़ाच्या ठिकाणी तीन शहरं निर्माण झाली, ती म्हणजे आंध्र प्रदेशातील कालाहस्ती व तामिळनाडूतील त्रिकोणमलाई व तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची होय. या पवित्रस्थळी त्रिशिरन् या राक्षसराजाने शिवाची आराधना करून त्याचा कृपाप्रसाद प्राप्त केला म्हणून या स्थळाला त्रिशिरन् व शिखरावर शिव, पार्वती व विनायक यांची तीन मंदिरं असल्याने त्रिशिखरन् म्हणजेच आजचे तिरुचिरापल्ली होय. हे शिखर म्हणजे दक्षिण कैलास होय.
याच त्रिची शहरात असलेल्या ८३ मीटर उंच व ३५०० दशलक्ष वर्षांपेक्षा जुन्या अशा एका भव्य खडकावर असलेल्या या दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अशा गणेश स्थानासंबंधी एक सुरस कथा सांगितली जाते. सीतेच्या अपहरणामुळे तिच्या सुटकेसाठी रामाने रावणाशी केलेल्या घनघोर युद्धात रावण मारला जातो व या युद्धात सर्वार्थाने अतिशक्तिशाली अशा रावणाचा पराजय व्हावा म्हणून बिभिषण-रावणाच्या भावाने रामाला विशेष मदत केली होती. याचा मोबदला म्हणून रामाने प्रसन्न होऊन बिभिषणाला एक शाळीग्रामात घडविलेली विष्णूची अत्यंत सुंदर मूर्ती (रंगनाथ विग्रहम) भेट दिली. बिभिषण हा दानव असल्याने ही गोष्ट देवांना रुचली नाही म्हणून सर्व देवांनी श्रीविनायकाची पूजा करून त्याला मदतीची विनंती केली. बिभिषण लंकेला परतत असताना तो त्रिची येथे कावेरीत स्नानासाठी उतरला असता विनायकाने गुराख्याच्या रूपात जाऊन ती काठावर ठेवलेली विष्णूची मूर्ती तेथून नेऊन एका जागी जमिनीत अशी घट्ट रुतवून ठेवली- जी तेथून काढणे शक्य नव्हते. हे पाहून संतप्त बिभिषणाने गुराखी रूपातील विनायकाचा पाठलाग सुरू केला असता तो गुराखी या खडकाच्या सुळक्यावर जाऊन लपला. बिभिषण त्याच्या मागून जाऊन तेथे पोहोचल्यावर मात्र विनायकाने आपलं मूळ रूप दाखविलं व तो साधा गुराखी नसून श्रीविनायक असल्याचं समजल्यावर बिभिषणाने त्याची माफी मागितली व तसाच श्रीलंकेला परतला. विनायकाने ती विष्णूची मूर्ती ज्या ठिकाणी घट्ट बसविली त्या श्रीरंगम् इथे रंगनाथस्वामींचं मंदिर बांधलं गेलं व खडकमाथ्यावर ज्या ठिकाणी बिभिषणाला विनायकाचं दर्शन झालं त्या स्थानी विनायक मंदिर बांधलं गेलं, जे आज उच्छिपिलयार विनायक मंदिर म्हणून ओळखलं जातं. यालाच फू‘ो१३ ळीेस्र्’ी असंही संबोधलं जातं. हे विनायकाचं अत्यंत जागृत स्थान आहे.
हे विनायक मंदिर त्रिचीमधल्या इतर अनेक मंदिरांएवढं भव्य-दिव्य नसलं तरी उभ्या खडकाच्या माथ्यावर हे अत्यंत प्रमाणबद्ध व आकर्षक असं मंदिर बांधण्यासाठी शिल्पशास्त्रींनी आपलं ज्ञान व कारागिरांनी आपलं कौशल्य पणाला लावून घडविल्याचं जाणवतं. हा खडक अत्यंत कठीण असून, अतिप्राचीन असल्याचं शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाल्याचं पुरातत्त्व (भारत सरकार) विभागाने नमूद केलं आहे. अखंड पहाडात कोरलेलं हे मंदिर पल्लव राजांनी बांधण्यास सुरुवात केली व मदुराईच्या नायक राजांनी ते पूर्णत्वाला नेलं. या अजस्र पहाडावरील विनायक मंदिरात जाण्यासाठी अत्यंत युक्तीने कोरलेल्या ४१७ पायऱ्या चढून जावं लागतं. या पवित्र ठिकाणी शिव-पार्वतीची मंदिरंही आहेत. या पहाडाला असलेल्या तीन सुळक्यांवर प्रथम थात्रूमनवर (मातृभूतेश्वर) म्हणजे स्त्री रूपातील शिवाचं मंदिर लागतं. हे या पहाडाच्या मध्यभागी कोरलेलं असून, बाजूलाच पार्वतीचं मंदिर आहे. या दोन मजली शिवमंदिराच्या बाजूस चित्तीर मंडप असून, इथल्या छतावरील चित्रकला व रंगसंगती वाखाणण्याजोगी आहे. मध्यावर कंगलमूर्ती स्वरूपात (शिवाच्या ६४ मुद्रांपैकी एक) असून, मध्येच पाषाणात कोरलेला १०० खांबांचा हॉल अतिशय विस्तीर्ण असा आहे. इथे एका प्रेक्षणीय दगडात बनविलेल्या ९ वर्तुळांची एक साखळदंड आहे. जो धातूचाच वाटावा, अशा विशिष्ट प्रकारच्या दगडात कोरलेला आहे. इथून पुढे वर गेल्यावर पहाडाच्या शिखरावर हे विनायक मंदिर आहे. इथलं कोरीव काम व आरेखन करणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचंबित करणारी आहे. दगडाच्या दक्षिण बाजूच्या मणी मंडपात मिश्रधातूत बनविलेली अजस्त्र घंटा असून, इथला घंटानाद हा संपूर्ण त्रिची शहरात पोहोचतो. अखंड पाषाणाच्या शिखरावर बनविलेली ही मंदिरं बनवायला हजारो कारागीर ११ वर्षे सतत काम करीत होते. ही गोष्ट या मंदिराला भेट दिल्यावर पटते. संपूर्ण सोन्याचा कळस व शिखर (विमान) असलेल्या या विनायक मंदिरात ६ प्रकारच्या सेवा (पूजा) अर्पिल्या जातात. चैत्रातील ब्रह्मोत्सवात विशेषकरून व आदिपुरुष व पानगुनी या इथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या वार्षिक उत्सवात उच्छिपिलयार गणेशाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असले तरी भाग्यकारक समजले जाते. तामिळनाडूतील इतर सर्व मंदिरांप्रमाणे संपूर्ण पहाडावर प्लास्टिक वा कचऱ्याचा अजिबात मागमूसही नसून संपूर्ण परिसर हा अत्यंत स्वच्छ ठेवला जातो व इथं फक्त पर्यावरणस्नेही वस्तूंचाच वापर होताना दिसतो. या पहाडाच्या एका भागात अभेद्य किल्ला असून त्याच्या तटबंदीचे बांधकाम हा भारतीय वास्तुकलेचा नमुना व एक आश्चर्य मानलं जातं. या किल्ल्याचा वापर सुरक्षेसाठी सैन्याकडून विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात केला जात असे. या मंदिराचं चोख व्यवस्थापन व किल्ल्याची निगराणी ठेवण्यात भारतीय पुरातत्त्व खात्याची शिस्तबद्धता व काटेकोरपणा इथे विशेषकरून जाणवतो. या सुळक्यावरून संपूर्ण त्रिची शहर व श्रीरंगमच नव्हे तर कावेरी नदीचे नयनरम्य पात्र व काठची वृक्षराजी व भातशेती, कोलीधरण हे सर्व नजरेच्या टप्प्यात आल्यानं नीट न्याहाळता येतं.  असं हे उच्छिपिलयार विनायक मंदिर हे प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राचं महदाश्चर्यच म्हणावं लागेल.