* संस्था नोंद होण्याच्या पूर्वीपासून तळमजल्यावर दोन सदनिकांचा मालक असलेल्या एका सदस्याने बिल्डरच्या संमतीने त्याच्या सदनिकांसमोरील जागेवर अतिक्रमण करून शेड टाकली आहे. त्या शेडचा वापर तो कमर्शियल कामासाठी करतो आहे.
किशोर तरवडे, कळवा, ठाणे
*  संस्था ही सर्व मालमत्तेची मालक असते आणि सदस्य वा सभासद हे संस्थेच्या जागेत सदस्य/ ताबेदार म्हणून राहात असतात. त्यामुळे कोणत्याही मोकळ्या व अन्य जागेवर संस्थेचा कोणताही सदस्य हक्क सांगू शकत नाही. त्याचा अधिकार हा फक्त त्याच्या ताब्यात असलेल्या जागेव्यतिरिक्त तसेच काही जागा जाण्या-येण्यासाठी वापरणे यासारखे वहिवाटीचे हक्क सोडल्यास कशावरही नसतो. त्या सर्व जागेची मालकी असते ती संस्थेची! म्हणूनच सदस्याने टाकलेली शेड व त्याचा वापर हा अनधिकृत आहे आणि त्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई न्यायालयामार्फत करता येईल.
*  ज्या सदस्याने संस्थेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्याबाबत संस्थेकडे तक्रार केली असता संस्था बिल्डरकडे बोट दाखवते व बिल्डर मोकळ्या जागेचे काहीही करू शकतो. त्या जागेची मालकी त्याच्याकडेच राहील, अशा अर्थाची करारनाम्यातील कलमे त्याच्या पुष्टय़र्थ दाखवते, हे सर्व कायदेशीर आहे का?
किशोर तरवडे, कळवा, ठाणे
* या प्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी सर्व वाचकांसाठी स्पष्ट कराव्याशा वाटतात, त्या अशा- १) एकदा का गृहनिर्माण संस्था नोंद झाली व खरेदीखत झाले नसले तरी सर्व मालमत्तेची खरी मालक संस्थाच असते. यामध्ये गच्ची, मोकळी जागा, भविष्यात मिळणारा एफ.एस.आय व टी.डी.आर. याचादेखील समावेश होतो. तांत्रिकदृष्टय़ा संस्था मालक नसली तरी या गोष्टींचा वापर करण्यासाठी संस्थेची परवानगी लागते. २) जरी करारनाम्यात काहीही अटी शर्ती असल्या व सदर करारनामा जरी नोंद (रजिस्टर) केलेला करारनामा असला तरीही त्यातील बेकायदेशीर किंवा अन्य कायद्यांशी विसंगत असणारा भाग हा आपोआप रद्दबातल ठरतो. या पाश्र्वभूमीवर आपल्या प्रश्नातील संस्था ही त्या सदस्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकते. तसा हक्क संस्थेला आहे. परंतु या ठिकाणी आपण दिलेल्या माहितीच्या आधारावरून तरी संस्था आपली जबाबदारी टाळत आहे असे दिसते.
*  अशा अतिक्रमण करणाऱ्या सदस्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते का? व ती कुणी करायची?
किशोर तरवडे, कळवा, ठाणे
*  खरे तर या सदस्याविरुद्ध संस्थेने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे, पण संस्था जर आपणहून कोणतीच कारवाई करत नसेल तर आपण (वैयक्तिक सदस्य) देखील याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकता. त्यासाठी एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा व मग कारवाई सुरू करावी.
* याच संस्थेच्या गच्चीवर बिल्डरने अनधिकृत कच्चे बांधकाम करून विकून टाकले आहे. त्याविरुद्ध व संस्थेच्या नावे इमारतीसाठी जमिनीचे खरेदीखत करून देण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे, असा दावा प्रलंबित असताना सदर सदस्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करता येईल का?
किशोर तरवडे, कळवा, ठाणे
*  आपल्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. याचे कारण हे दोन्ही दावे भिन्न आहेत. यामधील पक्षकार वेगळे आहेत, तसेच ज्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे ती मालमत्तादेखील वेगळी आहे. त्यामुळे आपल्या मते सदर अतिक्रमण करणाऱ्या सदस्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करता येईल. मात्र कारवाई सुरू करताना कुणाकुणाला पक्षकार करायचे याबाबतीत आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचाच सल्ला घेणे इष्ट ठरेल.
* ३००० चौ. फुटांचा ओपन प्लॉट आहे. तो ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे. त्या प्लॉटचे मला बिगरशेती प्लॉटमध्ये रूपांतर करायचे आहे. आजूबाजूच्या प्लॉटचे बिनशेतीमध्ये अगोदरच रूपांतर झालेले आहे. सदर प्लॉटचे खरेदीखत व ७/१२ माझ्या नावाचे आहे तरी याबाबत आपण योग्य ते मार्गदर्शन करावे.
चंद्रकांत कामेरकर, पांडुरंग वाडी, डोंबिवली (पूर्व)
*  तत्त्वत: आपल्या प्लॉटचे आपण बिनशेती प्लॉटमध्ये रूपांतर करू शकता. तो तुमचा हक्क आहे. मात्र त्यासाठी पुढील गोष्टींची खातरजमा करून घ्यावी त्या अशा- १) सदर प्लॉटवर कोणतेही आरक्षण नाही ना? कारण आजूबाजूचे सर्व प्लॉट हे बिनशेती झालेले आहेत म्हणून ही शंका आली. त्याची खात्री करून घ्यावी व रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सदर प्लॉट बिनशेती करण्यासाठी अर्ज करावा व अर्जासोबत मागितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करावी. त्यानंतर आपला प्लॉट बिनशेती प्लॉट होऊ शकेल.
* ओपन पार्किंग अ‍ॅलॉट करण्याचे अधिकार कुणाला असतात. एखाद्या संस्थेचे अध्यक्ष अथवा सचिव त्यासंबंधी व्यवहार करू शकतात का?
सेक्रेटरी, प्रभादेवी को. ऑप.हौ.सो.लि. न्यू प्रभादेवी, मुंबई
*  ओपन पार्किंग प्लेस ही खरे तर संस्थेची मालकी असते. त्याबाबतचा निर्णय संस्थेची सर्वसाधारण सभाच घेऊ शकते. कोणीही पदाधिकारी वैयक्तिकरीत्या याबाबत व्यवहार करू शकत नाही. केल्यास तो बेकायदेशीर ठरतो. याबाबत पार्किंगसाठी उपलब्ध असणाऱ्या पार्किंग स्पेसपेक्षा जास्त मागणी असेल तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (फर्स्ट कम फर्स्ट) या तत्त्वाने किंवा चिठय़ा टाकून पार्किंग स्पेसची अ‍ॅलॉटमेंट करता येते. हे अ‍ॅलॉटमेंट किती दिवसांसाठी किंवा किती कालावधीसाठी असेल याबाबतदेखील संस्थेची सर्वसाधारण सभाच निर्णय घेऊ शकते व तो घेतलेला निर्णय अमलात आणायचा असतो.
ws05* एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या सदस्याला एखादी पार्किंग स्पेस देण्यात आली तर तो सदस्य सदर पार्किंग स्पेस संस्थेच्या परवानगीविना अन्य त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो का?
सेक्रेटरी, प्रभादेवी गृहनिर्माण संस्था, न्यू प्रभादेवी, मुंबई
*   या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. कोणीही सदस्य त्याला देऊ केलेली पार्किंग स्पेस ही परस्पर त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही. त्याला जर ती पार्किंग स्पेस नको असेल तर त्याने ती संस्थेकडे परत करणे आवश्यक आहे. अशा परत केलेल्या पार्किंग स्पेसचे नवीन अ‍ॅलॉटमेंट संस्था त्यांनी ठरवलेल्या धोरणानुसार करील. संस्थेचे पार्किंगबाबतचे धोरण हे सर्वसाधारण सभेने ठरवायचे असते.
*  संस्थेकडे पार्किंगसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे, अशा वेळी एखादी पार्किंग स्पेस रिकामी झाली तर त्याची अ‍ॅलॉटमेंट कशी करावी?
सेक्रेटरी, प्रभादेवी गृहनिर्माण संस्था, न्यू प्रभादेवी, मुंबई
*  संस्थेकडे पार्किंगसाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी असेल व संस्थेने ती प्रतीक्षा यादी मंजूर केलेली असेल, तर त्या प्रतीक्षा यादीमधील ज्येष्ठतेनुसार त्या पार्किंग स्पेसचे अ‍ॅलॉटमेंट करावे.
* संस्थेचे अध्यक्ष सभेला हजर नव्हते, ते उशिरा आले. त्यानंतर सभेचा अध्यक्ष निवडला गेला तर त्याला पार्किंगविषयी कोणताही आदेश देण्याचा अधिकार आहे का?
सेक्रेटरी, प्रभादेवी गृहनिर्माण संस्था, न्यू प्रभादेवी, मुंबई
* संस्थेचे धोरण निश्चित असेल व त्याप्रमाणे जर अ‍ॅलॉटमेंटची ऑर्डर काढली गेली असेल, तर ती कोणी ऑर्डर दिली याला महत्त्व नसून ती अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने दिली असे समजले जाते. त्यामुळे संस्थेचे धोरण निश्चित असेल व त्या धोरणाप्रमाणे कोणताही आदेश द्यावयाचा असेल तर तो अध्यक्ष पदावरील व्यक्ती देऊ शकते.
घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स,
ब्लॉक नं. २, ए विंग, चंदन सोसायटी, कीर्तिकर कंपाउंड, नुरीबाबा दर्गा रोड,
ठाणे. (प.)४००६०७.
संपर्क : ०२२- २५४१६३३६