ठाणे जिल्ह्य़ातील वसई-विरार ही शहरे परवडणाऱ्या घरांसाठी एक मोठे आशास्थान आहे. वसई-विरारचा होणारा विकास, दळणवळणाची साधने या अनुषंगाने अनेक जण या शहरांचा घरासाठी विचार करीत आहेत. वसई-विरार ही महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाची मोठी शहरे आहेत. मुबलक जमीन, जंगल आणि उंच ठिकाणे यामुळे या शहरांमध्ये राहून निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यासारखे वाटते. परिणामी इथे रिअल इस्टेटसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लोकांनाही इथे मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध होत आहेत. दळणवळणाची साधने, साधनसामग्रीची उपलब्धता आणि उपलब्ध जमीन यामुळे रिअल इस्टेटसाठी वसई-विरार येथे अनेक विकासक आकर्षित होत आहेत. वसई-विरारमध्ये २,४०,०८२ निवासी संकुले आणि ३६,२७७ व्यावसायिक संकुले उपलब्ध आहेत. येत्या काही काळात या शहरांमध्ये आधुनिक सुविधांची भर पडणार आहे. अनेक अन्य शहरे या शहरांशी जोडली जात आहेत. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना अन्य शहरांकडे सहज जाता येते. कमी दरात घरे घेणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. रेल्वे आणि रस्ते यांच्या माध्यमातून विरार-वसईशी अन्य शहरे जोडली जात आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना नोकरी-धंद्यासाठी मुंबई व अन्य शहरे गाठणे सोयीचे ठरत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वसई-विरारमध्ये पाणी, वीज आणि रस्ते यांमध्ये मोठय़ा प्रमाणात उल्लेखनीय बदल होत आहेत. नवीन पॉवर प्रोजेक्टमुळे वीजेसंदर्भातली इथली परिस्थिती बदलली आहे. रेल्वे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेमुळे ही शहरे अन्य शहरांशी जोडली गेली आहेत. मुंबईतील अनेक कार्यालये ही गोरेगाव, अंधेरी आणि मालाड इथे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे विरार-वसई येथे राहणाऱ्या नोकरदारांसाठी हेही शहर गाठणे सोपे झाले आहे. विवा कॉलेज, नॅशनल इंग्लिश हायस्कूल आणि शास्त्री विद्यालय, संजीवनी हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, देसाई मॅटर्निटी हॉस्पिटल, मुलांसाठीचे जोशी हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल अशा अनेक शैक्षणिक व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. नवीन प्रकल्प, मध्यमवर्गासाठी त्यांच्या खिशाला परवडेल असे अनेक गृहप्रकल्प उभारले जात आहेत. मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वसई-विरार हे एक मोक्याचे ठिकाण आहे.