माध्यमिक शाळेत असता शेजारचा मुलगा मुंबईच्या मिलमध्ये बदली कामगार म्हणून जायचा. रोज लवकर उठून कामगार लोकलनं त्याला मुंबईला जावं लागे. तो गिरणगावातल्या मिलच्या गेटसमोर उभा राहायचा. जो कामगार आला नसेल त्याच्या बदली त्याला आत सोडायचे. ज्या दिवशी आत सोडणार नाहीत त्या दिवशी ‘खाडा’. आम्हालाही गेटवर उभं राहायचं होतं. पण घरच्यांनी गेटात काय पाहायचंय? असं म्हणून जाऊ दिलं नाही. आम्हा पांढरपेशांच्या घोळक्याला तो ‘कामगार’ कसा, याची उत्सुकता असायची. प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडायचो. तो खूप गमती सांगायचा. कॉ. डांग्यांपासून सगळ्या सामान्य ज्ञानाचा परवचा व्हायचा. आमची कशी एकी आहे. मुंबई आम्हाला घाबरते. आम्ही मुंबई बंद पाडू शकतो. आमची किती पॉवर आहे तुम्हाला नाही कळायचं..
पण मोठी माणसं सांगायची, नीट शिकला नाहीत तर कामगार होऊन गेटवर उभं राहावं लागेल. आम्ही धसका घेतला. उनाड असून अभ्यासात डोकं घालू लागलो. एकीकडे सामान्यज्ञानात भर पडत होती. खाडा, खोली, खवडय़ा, काटा, काला, कोथळा, करकर आवाज करणारा रामपुरी चाकू, बोटात घालायची पितळी फाईट असं बरंच काही. या सगळ्या शालेय जीवनात माहीत झालेल्या गोष्टी..
कॉलेजला जाऊ लागल्यावर त्यांची पॉवर कळली. तेव्हा कामगार लोकल कल्याण-ठाणे-कुर्ला येथून सुटायच्या. त्या गाडीत कामगाराशिवाय दुसरा चालत नसे. सगळे मिळून त्याला फलाटावर उतरवून देत. अशी त्यांची वट. मोर्चा असला की फोर्टातून चालता येत नसे. नंतर खूप नव्या गोष्टींची ओळख झाली. नंतर कामगार लोकल- भाटिया लोकल बंद झाल्या.
कॉलेजला असताना मुंबईत भटकणं चाले. त्यामुळे चाळी कळल्या. गेटमधून डोकावून गिरण्या पाहिल्या. गिरगावपेक्षा गिरणगावातल्या चाळी आवडायच्या. दोन्ही ठिकाणी गेलं की आपण मराठी आहोत याचा अभिमान वाटायचा. काहीही चांगलं वाचलं की भारावून जायचं हा स्थायी स्वभाव झाला. ‘भटक्याची भ्रमंती’ असो की ‘पडघवली’ जे वाचू नये असे संकेत असत ते आधी वायायचं नंतर मग ‘भीमरूपी’. आपल्याला माहीत नाही असं काही असू नये हे व्रत.
कालांतरानं मुंबई सुटली, पण प्रेम अबाधित आहे.. दत्ता सामंतांचा खून झाला आणि गिरण्या बंद पडल्या. मुंबईबरोबर त्या वृत्तांताची कात्रणं जमवली. नोकरी लागल्यावर हाती कॅमेऱ्याचं कोलीत आलं. आपसूक दृश्य इतिहास हार्ड डिस्कवर जमा झाला.
मुंबईच्या कापड गिरण्या बंद पडल्या. कामगारांची दु:ख वाचून कळली. कापड गिरण्यांच्या जागेतून गगनचुंबी इमारती उगवू लागल्या. विष्णु गोविंद दिवाकर यांच्या ‘पंत मेले, राव चढले’ या नाटय़छटेसारखं घडलं. ती कथा पाठय़पुस्तकात होती. पंत मेल्यावर त्यांचं सुतक रावांना नव्हतं, कारण ते मजेत होते आणि राव मेले तर बबनरावांनाही असणार नाही. फार तर ते स्मशानात जाऊन म्हणतील ‘चांगला माणूस होता’ आणि उद्योग धंद्याला जोमानं लागतील. ज्या गिरण्यांच्या चात्यांवर हजारो कामगार काम करत होते त्या ठप्प झाल्या. त्यांच्या जमिनी कल्पना करता येणार नाही अशा किमतीत बिल्डरांनी विकत घेतल्या. त्यांना खात्री होती की गगनचुंबी सदनिका बांधल्या तर हापूस आंब्यासारख्या चटाचटा विकल्या जातील. आणि आज त्यातल्या सदनिका पटापटा विकल्या जात आहेत.
पांढरे कपडे घालणारे बहुसंख्य झाले. मुंबईकरांची मानसिकता पार बदलली. मध्यम वर्गाची युरोप-अमेरिकेशी लिंक लागली. कोणाची मुलं तिकडे आहेत. युरोप-अमेरिकेच्या वाऱ्या वाढल्या. खिशात चार पैसे खुळखुळल्याने युरोपच्या सहलीला जातात.
आल्पस्च्या टोकावर भारतीय रेस्टॉरंट आहे. बिल्डरांकडे इतके पैसे होते की त्यांनी न्यूयॉर्क, शिकागो किंवा सिंगापूर येथील गगनचुंबी इमारती बांधण्याचा अनुभव असलेल्या आर्किटेक्ट इंजिनीयरांना आणि ठेकेदारांना गाठलं. त्यांची तगडी फी चुकवली. तसंच मुंबईच्या तज्ज्ञांना हाताशी धरलं. दोघांनी मिळून योजना बनवून दिल्या. सगळ्यांनाच कळलं की उंच उंच इमारती बांधणं सोपं नाही. त्यासाठी अनुभवी इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, मेकॅनिकल इंजिनीयर इंटेरियर डिझायनर लॅन्डस्केपिंग सल्लागार यांना बरोबर घेतलं. आयात केलेली बांधकाम सामग्री, लिफ्टस् जमवली.
इमारती बनत गेल्या आणि सदनिका विकल्या जाऊ लागल्या. एकेका सदनिकेसाठी लोक बारा-पंधरा कोटी सहज देत आहेत हे पाहून नव्या इमारतींच्या योजना आखल्या जात आहेत. एका इमारतीसाठी तीन-चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून तीन-चार वर्षांनी पैसे हाती येण्याची वाट पाहता येईल असे धिप्पाड बिल्डर आहेत. त्यात भलत्यांचीही बिनबिशेबी गुंतवणूक असते. काहींची एकाच वेळी तीन-चार संकुलं उभी होत असतात. आठ-दहा कोटींच्या मोबदल्यात ग्राहकांना संतोष होईल अशा सदनिका ते देतात. जाहिरातीत ते ग्वाही देतात की ‘घरातून समुद्रदर्शन होईल, तसे वास्तुज्योतिषांचा सल्ला घेतला आहे. फेंगशुईची योजना केलेली आहे.’ प्रत्येकाला ‘जीवनातली ही घडी अशीच राहू दे’ हे गीत मनातल्या मनात गायचं असतं, ही गोष्ट बिल्डरांना माहीत असते.
मुंबईच्या गगनचुंबी इमारतींची प्रेरणा ‘शिकागो’त असली तरी शिकागो आणि मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या निर्मिती प्रक्रियेत फरक आहे. शंभर वर्षांपूर्वी जेव्हा शिकागोत त्या उभ्या होत होत्या त्याच वेळी शिकागोच्या नूतनीकरणाचंही काम जोरात चालू होतं. ‘बूथ’ हे मॅनेजमेंटचं स्कूल जन्माला येत होतं. मोठमोठे बगीचे निर्माण होत होते. ‘मिशिगन लेक’च्या किनाऱ्याचा आल्हाददायक विकास चालू होता. आर्किटेक्ट इंजिनीयरांच्या करामतीमुळं लोक अचंबित होत होते. इतकंच नाही तर युरोपातही नव्या तंत्रज्ञानाचं कौतुक होतं. तसं मुंबईकरांना गगनचुंबी इमारतींचं मनापासून कौतुक करावंसं वाटत नाही. कारण ते तंत्रज्ञान त्या भूखंडापुरतं भाडय़ानं घेतलेलं असतं. त्याचीही हरकत नाही. पण आजूबाजूचा परिसर शंभर र्वष जुना असतो. शिवाय गरीब आणि श्रीमंतांमधली दरी अमेरिकेतल्या ग्रॅन्ड कॅनियनसारखी प्रचंड होते आहे.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईची श्रीमंती होती ती दृष्टिआड होती. कारण ती मलबार हिलवर होती किंवा बांद्रय़ाला होती. सकाळी उठल्यावर तोंड धुताना कधी दिसली नव्हती. प्रत्येकाच्या गॅलरीतून दुसऱ्याची तशीच गॅलरी दिसत असे. पण आता गॅलरीत उभं राहिलं की समोर चाळीस मजली चकचकीत इमारती दिसतात. त्या इमारतीभोवतीचं कंपाऊंड दहा फूट उंच असतं. प्रवेशद्वारावर निळ्या कपडय़ातले दोन-तीन गुरखे उभे असतात. ते आत डोकावूही देत नाहीत. पूर्वपरिचित दृश्यचित्र फाटलं. चाळकऱ्यांनी असा आमूलाग्र बदल कधी कल्पिलाही नव्हता.
एक गोष्ट मनात आल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेतलं अठरा लाख वस्तीचं श्रीमंत डेट्रॉईट महानगर मोटार कारखाने डबघाईला आल्यावर भिकारी झालं. रस्त्यावर मोटारींच्या ऐवजी कुत्री फिरायला लागली. मुंबईच्या कापडगिरण्या, मोटार कारखाने आणि केमिकल कारखाने बंद पडले. तरी मुंबई नादार झाली नाही. उलट आर्थिक गुंतवणूक वाढली.
गिरणगावातल्या जमिनी लवकरच संपतील, त्यानंतर काय करायचं हे बिल्डरांनी ठरवलं असेल. क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा जास्तीचा एफएसआय घेऊन झोपडपट्टय़ांचं पुनर्वसन यात हात घालू शकतील. दुसरं असं की, हजारो चाळी जर्जरित झाल्या आहेत. त्यातले लोक त्यांची सुधारणा केव्हा होणार याची चातकासारखी वाट पाहताहेत. त्या जुन्या जागी नव्या इमारती झाल्या तर सगळ्यांना हव्या आहेत. आणि जेव्हा अनेक लोकांची इच्छा असते तेव्हा ती तडीस जाण्याचा संभव वाढतो. गिरण्या बंद पडून तीन दशकं उलटली आहेत. नव्या पिढीला उंच इमारती पाहायची सवय झाली असेल. त्यांचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतोय ते कळायला वेळ लागेल.
पूर्वी गिरणगावातून समुद्र दिसत नसे. पण आज गिरणगावात मलबार हिल अवतरलं आहे. तिथल्या गगनचुंबी इमारतींच्या खिडकीतून मलबारहिलवरून दिसतं तसं विशाल सागराचं दर्शन होत आहे. म्हातारीचा बूट आणि हँगिंग गार्डन बाणगंगा सोडलं तर आपण मलबारहिलच्या प्रेमात तेव्हाही नव्हतो. आताही नाही. पाहीनात ते उंचावरून समुद्र. खिशात पैसे नसल्यानं आपण मरीन ड्राइव्हच्या कट्टय़ावर बसून किंवा गिरगाव चौपाटीला पाण्यात पाय सोडून पाहू. बाकी गिरणगावात राहिलो नसलो तरी तो माझा प्रिय विस्तार आहे.