घरास अथवा सदनिकेस गॅलरी नसणाऱ्यांनी आता खिन्न होण्याची गरज नाही. तुमच्या घराची छोटी खिडकी तुम्हास मोकळ्या हवेचा आनंद तर देईलच, पण त्याचबरोबर तुमच्या मनातील एका सुंदर छानशा बागेची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधीसुद्धा.

घ र, तेही स्वत:च्या मालकीचे, २-४ खिडक्या आणि बाल्कनी असणारे असेल तर यासारखा अवर्णनीय आनंद दुसरा कुठला असणार? बाल्कनी जरा प्रशस्त असेल तर सारख्या आकाराच्या ८-१० लहान कुंडय़ा ठेवून बाल्कनीमधील छान बाग तयार करता येते. बसावयास एक आराम खुर्ची आणि सोबत या आकर्षक फुलझाडांच्या कुंडय़ा यामुळे सकाळ-संध्याकाळचा वेळ किती सुंदर जात असेल, हे अनुभवल्याशिवाय कसे समजणार! बाल्कनी मोठी असेल तर घरमालक त्याची बागेची हौस निश्चितपणे पूर्ण करू शकतो. मात्र ती छोटी असेल तर आवडीस मुरड घालावीच लागते. अशा वेळी डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या खिडक्या. खिडक्यांचाच उपयोग बागेची हौस पुरी करण्यासाठी केला तर? अगदी खरे आहे. घरास अथवा सदनिकेस गॅलरी नसणाऱ्यांनी आता खिन्न होण्याची गरज नाही. तुमच्या घराची छोटी खिडकी तुम्हास मोकळ्या हवेचा आनंद तर देईलच, पण त्याचबरोबर तुमच्या मनातील एका सुंदर छानशा बागेची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधीसुद्धा. भरपूर प्रकाश आणि हवा येणारी खिडकी या बागेसाठी उत्तम, पण त्याचबरोबर घराची अशी खिडकी जी उघडय़ावर बाहेरचे अनावश्यक सौंदर्य. उदा. झोपडपट्टी, उजाड जागा, रस्त्यावरचा नको वाटणारा कलकलाट अथवा समोरच्या शेजाऱ्याचे उघडे घर दर्शवीत असेल तर तिचा वापर अशा बागेसाठी जरूर करावा. तिच्यामध्ये छान बाग तयार करावयाची असेल तर थोडी प्राथमिक तयारी हवी. खिडकीमध्ये आपल्या सोईप्रमाणे आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस एक छानसा बॉक्स तयार करून घ्यावा. बॉक्स हा लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा असू शकतो. रुंदी खिडकीच्या आकाराची मात्र उंची ९ इंचापेक्षा जास्त नको. हा विंडो बॉक्स हुक्सच्या साहाय्यानं खिडकीमध्ये छानपैकी टांगतासुद्धा येतो. या बॉक्समध्ये लहान आकाराच्या ८-१० फुलझाडांच्या कुंडय़ा सहज बसतात. कुंडय़ाची उंची नऊ इंच असेल तर बॉक्समध्ये ठेवलेल्या त्या दिसणारच नाहीत. दिसतील ती विविध रंगाची पाने, फुले आणि त्यांचे एकत्रित सौंदर्य. बॉक्समधील कुंडय़ांची जागा नियमित बदलली असता तुम्हास प्रत्येक वेळी नवीन बागेचा आनंद लुटता येऊ शकतो. खिडकीमधील ही हिरवाई आपण आतल्या बाजूस करू शकतो अथवा बाहेरसुद्धा. या बागेस तुम्ही लटकणाऱ्या स्थितीत अथवा स्थिरसुद्धा ठेवू शकता. हिवाळ्यामध्ये विविध रंगांची फुले सर्वत्र उमललेली दिसतात. अशा सुंदर फुलांच्या कुंडय़ांना या खिडकीमधील बागेत स्थान असावे. विविध रंगांची पाने असलेल्या वनस्पती या बागेची शोभा वाढवतात. पाणी नेहमी लहानशा झारीने घालावे व ते बॉक्समध्ये पडणार नाही याची काळजी घ्यावी. विंडो बॉक्समध्ये लाकडाचा भुसा, नारळाच्या शेंडय़ा, भाताचे तूस, त्यावर गांडूळ खत अथवा रोपवाटिकेमध्ये मिळणारे सेंद्रिय खत व त्यावर कोळशाचा चुरा थरांच्या रूपात वापरूनसुद्धा छान बाग तयार करता येते. या ठिकाणी अर्थात कुंडय़ा वापरल्या जात नाहीत. या अशा बागेत लहानसा बांबू पूल, छोटे कांरजे, प्लॅस्टिकचे विविध प्राणी आणि छोटे बाक ठेवले तर अनेक वेळा खऱ्या बागेचा आनंद मिळतो.
घरी येणाऱ्या पाहुण्यांना, बच्चे कंपनीसाठी हा वेगळा विरंगुळा आहे. त्याचबरोबर सुदृढ पर्यावरणाचा संदेशसुद्धा. खिडकीमधील या लहानशा बागेत डास अथवा इतर त्रासदायक कीटक येऊ नयेत म्हणून जैविक कीटकनाशक जरूर वापरावे. खिडकीमधील बाग नेहमी चौकोनी अथवा आयाताकृती, उंचीने कमी, मात्र खिडकीच्या आकाराची असावी. खिडकी उघडल्यानंतर तिच्यावर सकाळ अथवा सायंकाळचा थोडा तरी सूर्यप्रकाश येणे गरजेचे आहे. या बागेसाठी सावलीत वाढणारी झाडे जास्त उपयुक्त. याव्यतिरिक्त छोटा झेंडू, पिटय़ुनिया, चिनी गुलाब यांसारख्या लहान फुलांच्या आणि त्यांच्या विविध रंगांनी नटलेल्या वनस्पती खिडकीच्या माध्यमांतून घराची शोभा वाढवतात. काही वनस्पतींना लोंबणाऱ्या आकर्षक फांद्या असतात. अशा वनस्पती बॉक्सच्या आतल्या बाजूस आणि कडेने लावल्यास त्यांच्या नाजूक फांद्यांनी बॉक्स झाकला जातो आणि या हिरवाईच्या पाश्र्वभूमीवर आतील फुले छानपैकी उठून दिसतात. तुमची सदनिका अथवा घर नवीन असेल तर अंतर्गत सजावट करतानाच रचनाकारास या खिडकीमधील बागेची कल्पना द्यावी. विंडो गार्डनमध्ये रचनाकाराच्या कलागुणास खूपच संधी आहे. दिवाणखान्यात असलेल्या खिडक्यांमध्ये ही हिरवाई जास्त उठून दिसते. ‘वृक्ष, पाने, फुले यांच्यावर प्रेम करा, त्यांना तोडू नका, मारू नका,’ असा संदेश पाठय़पुस्तकांतून मुलांना दिला जातो. या संदेशाचे प्रत्यक्ष अवलोकन व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तुमच्या घरात ही खिडकीमधील अनोखी बाग हवीच हवी.
डॉ. नागेश टेकाळे