पारंब्या म्हणजे अखंड जीवन प्रवाहाचा दृश्य दुवा! पारंब्या जमिनीत अलगद रुततात, वटवृक्षाच्या विराट डोलाऱ्याला नवा आधार देतात!  त्या रुजत नाहीत तोवर कुणी त्यांच्या संगतीनं झोके घेतं.. मनाला सुखोन्दोलित करतं.. तसंच, या विचार पारंब्यांनी झोके घेत मनात मोकळं आभाळ भरून घ्या..किंवा जीवनाचा अध्यात्म जाणिवेशी सांधा जोडणाऱ्या या विचार पारंब्यांचा अंत:करणानं मातीच्या मृदुलतेनं स्वीकार करा या विचारांच्या पारंब्या मनात रुजू द्या..जीवनाच्या विराट डोलाऱ्याला त्यातून कदाचित नवा आधार मिळेल.. कदाचित नवा जीवनरसही गवसेल, त्यासाठीचं हे सदर दर पंधरवडय़ाने.

दलित चळवळीला एकेकाळी आकार देणारं, तिचा वैचारिक पाया विस्तारणारं आणि नवं नेतृत्वही घडविणारं एक प्रख्यात महाविद्यालय. तिथल्या एका विभागप्रमुखांशी विविध विषयांवर गप्पा होत. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. चळवळ तेव्हा जोरात होती, पण अनेक गटांत विखुरली होती. त्यामुळे समूहाची शक्ती क्षीण होऊन गटा-गटांतल्या वादविवादांत आणि प्रसंगी हाणामाऱ्यांत ती वाया जात होती. या वादाचे पडसाद महाविद्यालयांमध्ये अधिक तीव्रपणे उमटत होते. अशा वातावरणात शिकवायचं तरी कसं, असा प्रश्न प्राध्यापकांना भेडसावत असे. विभागप्रमुखांनी सांगितलं की, ‘‘ना कुणाला ओरडता येत ना कारवाई करता येते. कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गटाचा. त्याला ओरडणं म्हणजे जणू त्या गटाला विरोध असणं. त्यामुळे ‘शिका’ या बाबासाहेबांच्या पहिल्या आज्ञेकडेच दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाचं वातावरण खालावत आहे. यावर काय करता येईल?’’

Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

तोवर त्यांचं बोलणं मी सहज म्हणून ऐकत होतो. ‘काय करता येईल?’ हा प्रश्न थेट भिडणारा आणि जागवणारा होता आणि मला एकदम ऊसगांव डोंगरी इथल्या आदिवासी पाडय़ांवर काम करणाऱ्या किसन या कार्यकर्त्यांची आठवण झाली. माझ्या एका परिचिताचं पुस्तकांचं मोठं नावाजलेलं दुकान आहे. वेळ मिळाला की तिथे जाऊन बसायचं, पुस्तकं आणि त्याहीपेक्षा माणसं वाचायची सवय मला जडली होती. एकदा असाच पुस्तकं चाळत असताना एकाचं बोलणं कानावर पडत होतं. त्याला साने गुरुजी यांच्या ‘भारतीय संस्कृती’ पुस्तकाच्या तीसेक प्रती हव्या होत्या. मी कुतूहलानं त्याच्याकडे पाहिलं. सर्वसाधारण रूपारंगाचा आणि मोकळ्या ढाकळ्या मनाचा तरुण होता तो. ‘यांना या पुस्तकाच्या तीस प्रती एकदम का हव्या असतील?’ असं कुतूहल मनात दाटलं. मी विचारलं, ‘‘वाचनालयांसाठी घेत आहात का?’’

‘‘नाही.’’ तो उद्गारला.

‘‘मग?’’

‘‘आदिवासी पाडय़ांवर द्यायची आहेत.’’ तो उत्तरला. मला आश्चर्यच वाटलं. मी विचारलं, ‘‘का?’’

त्याच्या सांगण्यातून एक विलक्षण नवा प्रयोग.. एक नवा उपक्रम समजला. साने गुरुजी यांची जन्मशताब्दी येणार होती. त्याआधी या आदिवासी पाडय़ांवर ही पुस्तकं कार्यकर्त्यांना दिली जाणार होती. ते कार्यकर्ते ती पुस्तकं खऱ्या अर्थानं अभ्यासणार होते. त्या पुस्तकातील साने गुरुजी यांनी मांडलेल्या विचारांचा वेध घेणार होते. त्या विचारांतून आज नेमकी कोणती कामं उभी राहू शकतात, याचा शोध घेणार होते आणि साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत आदिवासी पाडय़ांवर ती कामं प्रत्यक्षात सुरूही करणार होते. मला ही कल्पनाच फार आवडली. अशा कृतिशील पद्धतीनं व्यक्त केलेली ती आदरांजली होती. नव्हे, ‘धडपडणाऱ्या मुलांची’ परंपरा आजही आहे, ही जाणीव सुखावणारी होती.

आदिवासी पाडय़ांवरील त्या आठवणींतून मी भानावर आलो. त्या विभागप्रमुखांना म्हणालो, ‘‘सगळं वातावरण काही आपण पालटू शकणार नाही, पण एक प्रयोग करू या. तुम्ही प्रत्येक वर्गातील दोन-तीन मुलं-मुली निवडा. त्यांची आपण बैठक घेऊ.’’ तशी निवड केली गेली. एकूण मिळून तीसेक विद्यार्थी होते. त्या सर्वाची पहिली बैठक झाली. बैठकीतल्या चेहऱ्यांवर संमिश्र भाव होते. काहीसं कुतूहल, काहीशी साशंकता. बैठकीला जाण्याआधी महाविद्यालयाच्या वाचनालयातनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तीसेक पुस्तकं मी घेतली होती. त्या गठ्ठय़ाकडेही सर्वाचं कुतूहलमिश्रित लक्ष होतं. मी पुस्तकं त्यांच्यात वाटली. वेगवेगळ्या विषयांवरची तीस पुस्तकं होती ती. त्यात शिक्षणापासून समाजकारणापर्यंत, वेडगळ समजुतींविरोधातील लढय़ापासून बौद्ध धर्मातल्या तत्त्वचिंतनापर्यंत अनेक विषयांना स्पर्श होता. मी म्हणालो, ‘‘डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेत तुम्ही आज शिकत आहात ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांचा वैचारिक वारसा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न जर या वास्तूपासून सुरू झाला तर त्यांना किती आनंद वाटेल. म्हणूनच आपण एक उपक्रम करणार आहोत. ६ डिसेंबरला एक महिना बाकी आहे. ही पुस्तकं मी तुम्हाला दिली आहेत. प्रत्येकानं त्याला दिलेलं पुस्तक पंधरवडय़ात वाचायचं आहे. नुसतं वाचायचं नाही, तर त्यात बाबासाहेबांनी मांडलेल्या विचारांतून आज प्रत्यक्षात कोणतं काम सुरू करता येईल, याचा शोध घ्यायचा आहे. काम लहान भासो किंवा मोठं, आपण ते शोधायचं आहे आणि या पुस्तकातला कोणता विचार तुम्हाला परिवर्तनासाठी प्रेरक वाटला ते ही तुम्ही सांगायचं आहे. हे सर्व एका पानात प्रत्येकानं लिहून पंधरवडय़ात द्यायचं आहे.’’

सर्वानाच ही कल्पना वेगळी वाटली. उत्साहानं पुस्तकं वाचली गेली. मुद्दे काढले गेले. त्यातून काही सामाजिक कामंही प्रत्येकाला सुचली. त्यातली काही तर अगदी आपल्या घरापासून सुरू करता येतील, अशीही होती. नव्या विचारांनी भरलेली, नव्या कार्याची प्रेरणा देणारी तीस पानं जमा झाली! मग सुवाच्च अक्षरात त्यातून तीस पोस्टर्स तयार झाली. मग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रत्येक पुस्तक आणि त्या पुस्तकाच्या वर एक पोस्टर! त्या पुस्तकातल्या विचारांतून आज प्रत्यक्ष कोणतं काम करता येईल, हे त्या पोस्टरवर मांडलेलं! असं तीस पुस्तकांचं अभिनव प्रदर्शन ६ डिसेंबरला महाविद्यालयातच भरलं. ज्यानं ज्यानं पाहिलं तो त्या विचारांनी अंतर्मुख झाला.

या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी जी बैठक झाली ती देखील हृदयस्पर्शी होती. पुस्तकं वाचणाऱ्यांनी ती पुस्तकं वाचून काय वाटलं, ते सांगावं, असं सुचविण्यात आलं होतं. प्रत्येक जण भरभरून बोललाच, पण बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आयुष्यात आम्ही प्रथमच वाचलं, अशी प्रांजळ कबुलीही प्रत्येकानं दिली. काही दलितेतर मुलांनी सांगितलं की, ‘‘बाबासाहेबांबद्दल आमच्या मनात अनेक गैरसमज होते ते दूर झाले. सर्वच समाजासाठीची त्यांची कळकळ मनाला भिडली.’’

गेल्या कित्येक वर्षांत त्या प्रयोगातल्या कुणाची कधी भेट झाली नाही. त्या विचारांचं बीज त्यांच्या मनात पुढेही राहिलं का? त्यातून काही कामं त्यांनी प्रत्यक्षात केली का? माझं कुतूहल आजही कायम आहे. आदिवासी पाडय़ावरचा तो छोटासा प्रयोग अध्यात्माच्या वाटेवरही मला दीपस्तंभासारखा भासला.

अध्यात्माचा मार्ग म्हणजे मोठमोठी मंदिरं उभारणं नव्हे. लाखोंचे सत्संग मेळे भरवणं नव्हे. मोठमोठय़ा धर्मप्रचारक संस्था काढणं नव्हे. अध्यात्म म्हणजे स्वत:हून स्वत:ला घडवू देणं.. जो बोध वाचतो-ऐकतो त्यातलं सत्य आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणं..

पण वाचलेलं जगण्यात उतरवण्याचं धाडस कमी पडतं! खरंच अध्यात्म हा आजही ऐकण्या-बोलण्याचा, लिहिण्याचा-वाचण्याचा विषय उरला आहे. जगण्याचा नव्हे! कारण मुक्तीबाबत आपण वारेमाप चर्चा करू, अध्यात्माशिवाय खरं समाधान नाही, असंही सांगू-ऐकू, पण जगत असतानाच खुजेपणातूनसुद्धा मुक्त होण्याची आपल्याला भीती वाटते. विमला ठकार यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपल्याला खरी मुक्ती नकोच आहे.. खरी आध्यात्मिक क्रांती नकोच आहे.’

त्यामुळे आध्यात्मिक ग्रंथ आपण भारंभार वाचतो, पण जगतो पूर्वीप्रमाणेच! आणि मग म्हणतो सुद्धा की, इतकी वर्ष देवाचं करतोय, पण त्याची कृपा काही होत नाही.. साक्षात्कार होत नाही.. अनुभव येत नाही. अध्यात्म मार्गावरचे प्राथमिक धडे ज्यांनी गिरवून घेतले ते घरतभाऊ म्हणत की, ‘‘आध्यात्मिक ग्रंथ ही ‘रेसिपी बुक्स’ आहेत. पाककलेची पुस्तकं आहेत. ती वाचून का कुठे पोट भरतं? ते पदार्थ करावे लागतात, खावे लागतात, पचवावे लागतात तेव्हा पोट भरतं.’’

तसंच जे वाचतो त्यातलं थोडं तरी कृतीत आणायला हवं. मगच अनुभव येईल ना? कारण अनुभव ही कल्पना नसते. तो प्रत्यक्ष असतो आणि प्रत्यक्ष अनुभव हा प्रत्यक्ष कृतीशिवाय अशक्यच आहे. मग मलाही सवय लागली. रात्री निजण्याआधी श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ‘प्रवचन’ ग्रंथातलं कोणतंही पान उघडून वाचत असे. त्यातून एखादी कृती सुचत असे. मग उद्या ही कृती आचरणात आणायची आहे, असं जणू, श्री महाराज सुचवत आहेत या विचारानं दुसऱ्या दिवशी वागण्याचा प्रयत्न करीत असे. त्या बोधाचा गूढार्थ प्रत्यक्ष कृतीनंतरच्या अनुभवातून गवसत असे.

प्रयोग खरंच सोपा आहे. तुम्हीही करून पाहा. मग एखादा ग्रंथ असेल, एखादी पोथी असेल, एखादं संत चरित्र असेल, अभंगाची गाथा असेल.. त्यातलं अगदी थोडं रोज रात्री वाचा.. त्यातला बोध काय आहे, हे लक्षात घ्या.. मनात घोळवा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कधी जमेल, कधी जमणार नाही.. पण जितकं जमेल तितका अनुभवही आनंदाचाच असेल, यात शंका नाही. अनुभवानं सांगतोय बरं मी!!

चैतन्य प्रेम – chaturang@expressindia.com