शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी फलटण येथे झालेल्या प्रचारसभेत भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. २५ वर्षांची युती तोडून भाजपने बाळासाहेबांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा नव्हती, तर जागावाटपासाठी युती का तोडलीत? असा सवालदेखील उद्धव ठाकरे यांनी सभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी या भागातील काँग्रेस नेते आणि साखर कारखानदार म्हणजे जनतेचे शोषण करणारे लुटारू असल्याची टीका केली. त्यामुळे येथील जनतेने सामान्य माणसांचे सरकार असणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी मतदारांना केले. याशिवाय सत्तेत आल्यास, रंगराजन समितीच्या शिफारशींप्रमाणे साखर कारखान्यांच्या निर्मितीवरील झोनबंदी उठवण्याचे आश्वासनही उद्धव यांनी दिले.
केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी असलेली युती नकोशी झाली. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे असून, आगामी निवडणुकीत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ शिवसेनेला संपवण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र, महाराष्ट्र तोडण्याचे पाप आम्ही कुणालाही करू देणार नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.