राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले साटेलोटे उघड होऊ नये, यासाठी विधानसभेत गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे यांनी केला. विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणी करुनही मतदान होऊ दिले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीचा विषय पुढे ढकलल्याने गोंधळ निर्माण होईल, या हेतूने ते करण्यात आले. त्यातच विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. भाजपच्या रणनीतीला शिवसेना बळी पडली का, असे विचारता शिंदे यांनी त्याचा इन्कार केला. मतदान नाकारल्याने आम्ही सरकारचा निषेध करीत सभात्याग केला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची गाडी अडविली आणि त्यांना अध्यक्षांच्या निर्णयाबाबत चौकशी करुन योग्य ती पावले उचलण्याची विनंती केली, असे शिंदे यांनी सांगितले.
सरकारची चुकीची कामे आणि बेकायदेशीर निर्णयांविरोधात पाच वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस आमदारांच्या दोन वर्षे निलंबनाला आमचा विरोध असून ही शिक्षा कमी करावी अशी विनंती आम्ही केल्याचेही त्यांन नमूद केले.