राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले. यावरून ‘नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने मैदानातून पळ काढला’ अशी ओरड विरोधकांनी सुरू केली. मात्र, त्याच विरोधकांकडूनही संसदीय प्रतिष्ठेला धक्का घडवणारे वर्तन झाले. अभिभाषणासाठी विधानसभेत येत असलेल्या राज्यपालांनाच काँग्रेसच्या आमदारांकडून धक्काबुक्की करण्यात आली, तर शिवसेनेचे आमदारही यात आघाडीवर होते. या सगळय़ा गोंधळाचा शेवट काँग्रेसच्या पाच आमदारांच्या निलंबनाने झाला. मात्र, महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या या दोन्ही प्रकारांनी मतदारांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास आणि नैतिकता यांचे पानिपत केले.