स्वच्छ सदरा, पायघोळ धोतर आणि तिरकी टोपी. माणूस मात्र कमालीचा सरळ. किती? तो काळ सहकारी बँकांवरून विश्वास कमी होण्याचा होता. माधवपुरा बँकेतून पसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. देवगिरी बँकेतून गुंतवणूक काढावी, अशी अनेकांची मानसिकता होती. हेडगेवार रुग्णालयाची काही रक्कम अनामत म्हणून देवगिरी बँकेत ठेवली होती. ती काढून घ्यावी, असा विचार सुरू झाला तेव्हा ‘नाना’ आले. हवा तर माझा सात-बारा देतो, पण रक्कम काढू नका. संस्थेवर आपणच विश्वास वाढवायचा असतो, असे सांगून गेले. हे नाना म्हणजे हरिभाऊ बागडे. औरंगाबादकरांसाठी सरळ असणारे हरिभाऊ विधिमंडळात मात्र पहिल्याच दिवशी वादग्रस्त ठरले.
तसा हा माणूस  निरलस.. त्यांच्यासमवेत काम करणारे दाजी जाधव सांगत होते. त्यांच्या कामामुळे अनेक चांगले बदल होत गेले. १९७२ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुष्काळ विमोचन समिती नेमली होती. त्याचे प्रांत कार्यवाह म्हणून हरिभाऊ बागडे कामाला लागले. आणीबाणीतही ते सक्रिय होते. नंतर सहकाराच्या वेगवेगळ्या प्रकल्पांत रमले. विशेष म्हणजे दोन्ही संस्थांचा कारभार नावाजला जातो. एक शब्द वावगा न बोलता स्पष्टपणे नकार देण्याची धमक, हे त्यांचे गुणवैशिष्टय़ आवर्जून सांगतात.