भाजप ‘सुशेगात’ असताना आणि जागावाटपाचे गाडे अडलेले असताना शिवसेनेने मात्र निवडणुकीसाठी आघाडी उघडल्याचे चित्र आहे. जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर करुन सत्ता आल्यावर कोणती पावले टाकणार, याचा प्रचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारविरोधात ‘चले जाव’ चा नाराही दिला आहे.
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना भाजपमध्ये सध्या बैठका, विभागवार मेळावे काही प्रमाणात होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘आयाराम’ नेत्यांचे प्रवेश होत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी ‘जनतेमध्ये जा आणि केंद्र सरकारची चांगली कामगिरी पोचवा,’ हा संदेश देऊनही जनतेमध्ये पोचण्यासाठी भाजपने अजून फारसे काहीच सुरु केलेले नाही. प्रदेश नेत्यांचा बहुतेक वेळ बैठका, जागावाटपाची बोलणी आणि स्वतचे मतदारसंघ सुरक्षित राखण्यासाठीची तयारी यामध्ये जात आहे. स्वतपेक्षा पक्ष मोठा करा, अशी भूमिका असूनही पक्षापेक्षा आपली प्रतिमा कशी उजळेल, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष आहे. स्वातंत्र्यदिन, ऑगस्ट क्रांती दिन झाला, पण भाजपने संघटित होऊन ‘चले जाव’ नारा देत वातावरण ढवळून काढल्याचे चित्र नाही. पंकजा मुंडे यांनी काही जिल्ह्य़ात संघर्ष यात्रा सुरु केली. मात्र त्यापासून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस वगळता अन्य नेते लांबच राहिले. विदर्भात देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार हे काही भागात फिरत आहेत. पण राज्यात सर्वत्र संघटितपणे भाजप नेते निवडणूक मैदानात उतरुन तयारी करीत असल्याचे दिसून येत नाही.
प्रचार गाणी, ध्वनिचित्रफीती व अन्य साहित्य तयार नाही. जाहीरनामा, निवडणुकीत उपयुक्त होतील अशा लोकप्रिय घोषणा, व्हिजन डॉक्युमेंट असे काहीच अजून भाजपने जाहीर केलेले नाही. पुढील काही दिवस जागावाटप व उमेदवार निश्चितीमध्ये जाणार असल्याने भाजप नेत्यांना प्रचारकार्यावर अतिशय कमी वेळ देता येणार आहे.
याउलट शिवसेनेने राज्य सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडून ‘व्हिजन डॉक्युमेंट’ व अन्य तयारीही केली आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य या जनतेला सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा क्षेत्रांसाठीचे शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करुन भाजपसह अन्य पक्षांवर आघाडी घेतली आहे. वचननाम्याचे कामही सुरु आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. ठाकरे हे राज्यातील अनेक भागात फिरत असून त्यांनी राज्यसरकारला ‘चले जाव’ चा नारा दिला आहे. महायुतीचा संयुक्त प्रचार तर दूरच अजून जागावाटप झाले नसल्याने भाजपने फारशी तयारी सुरु न केल्याचे चित्र दिसून येत आहे.