विरोधी बाकावर बसण्याची मानसिक तयारी केलेल्या शिवसेनेने ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीने येऊन केलेले शक्तिप्रदर्शन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोधी बाकांवरील सर्व जागा पटकविल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांना सभागृहात बसण्यासाठी जागेची करावी लागलेली शोधाशोध, १५ वर्षे सत्तेत राहिल्याने सत्ताधारी बाकांवर बसण्याची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची अद्यापही न गेलेली सवय ही सगळी १३ व्या विधानसभेच्या पहिल्या दिवसाची वैशिष्टय़े ठरली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी पक्षाचे सदस्य एकत्र येऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. पण भाजपने पहिल्या दिवशी काहीच शक्तिप्रदर्शन केले नाही. याउलट शिवेसेनेच आमदार भगवे फेटे परिधान करून शिवालय या पक्षाच्या नरिमन पॉईंट कार्यालयापासून ढोलताशांच्या गजरात विधानभवनात आले. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मग घोषणा देत सारे आमदार सभागृहात हजर झाले. शिवसेनेनेने घोषणाबाजी सुरू करताच भाजपच्या बाकांवरून त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘शिवाजी महाराज की जय’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या.
 विरोधी बाकांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी जागा निश्चित करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात येऊन आधीच जागा पटकावल्या. त्यानंतर शिवसेनेचे सदस्य आले. शेवटी काँग्रेसचे आमदार सभागृहात दाखल झाले तेव्हा त्यांना बसण्यासाठी जागाच नव्हती. माजी मुख्यमंत्र्यांना पहिल्या रांगेत जागा दिली जाते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने पहिल्या रांगेतील सर्व जागा अडविल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण आणि गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना जागा शोधावी लागली. शेवटी चौथ्या रांगेत या दोघांना कशीबशी जागा मिळाली. काँग्रेसच्या अन्य आमदारांना तर जागा शोधावी लागली. या घडामोडींमुळे काँग्रेसचे आमदार संतप्त झाले होते.
आपण विरोधी बाजूला बसायचे हे बहुधा राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या आमदारांना विसर पडला होता. कारण दोन्ही काँग्रेसचे बरेचसे सदस्य सत्ताधारी सदस्य बसतात त्या बाजूनेच सभागृहात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राणा जगतसिंह पाटील हे तर काही काळ भाजप सदस्यांसाठी राखीव आसनावर बसले होते. राष्ट्रवादीच्या सदस्यांना ही बाब लक्षात येताच पाटील यांना विरोधी बाकावर येण्याचे खुणावण्यात आले.
वारिस पठाण आणि एम्तियाज जलिल या एमआयएमच्या दोन आमदारांनी साऱ्या सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. सदस्यांचा शपथविधी सुरू असताना हे दोन सदस्य काळ्या रंगाचे कपडे परिधान करीत सभागृहात दाखल झाले आणि थेट सत्ताधारी बाकावर बसले. नंतर दोघेही विरोधी बाकावर गेले.

आई-वडिलांना स्मरून..
हंगामी अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी पहिल्या दिवशी १८० सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. आदिवासी विकासमंत्री विषणू सावरा यांच्यासह गिरीष बापट आणि गिरीष महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. काही आमदारांनी आपल्या आई-वडिलांना स्मरून शपथ घेतली. भाजपचे राम कदम यांनी जन्मदात्या आई-वडिल असा उल्लेख करीत शपथ घेतली. ज्योती कलानी यांनी सिंधी भाषेतून शपथ घेतली. उद्या उर्वरित सदस्यांचा शपथविधी होईल.