लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कन्या प्रणिती शिंदे यांची आमदारकी कायम राखण्यासाठी सुशीलकुमारांचा झगडा सुरू असताना त्यांच्या विरोधात विश्वासू सहकाऱ्यांनीच बंड पुकारून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याने शिंदे पिता-पुत्रीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.
विधानसभेच्या सहा जागांपैकी दोन जागा काँग्रेस, एक काँग्रेस पुरस्कृत अपक्ष, दोन भाजप व एक राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसने आपल्या जागा राखल्या तरी खूप, अशी परिस्थिती दिसते. या बहुरंगी लढतींमध्ये विकासकामांपेक्षा वैयक्तिक ताकद, जात, थैलीशाही या बाबी महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. एमआयएमसारख्या संघटनेने प्रथमच उभे केलेले उमेदवार शिवसेना व भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे व विष्णुपंत कोठे यांच्यात अखेरच्या क्षणी दिलजमाईचा प्रयत्न झाला, परंतु तो अयशस्वी ठरला.
सोलापूर शहर मध्य
आमदार प्रणिती शिंदे या दुसऱ्यांदा लढत असलेल्या या मतदारसंघातून शिंदे यांचे जवळचे विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांचे पुत्र माजी महापौर महेश कोठे यांनी शिवसेनेकडून आव्हान उभे केले आहे. कोठे यांचे शिष्य तौफिक शेख यांनी निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये प्रवेश करून तेथून उमेदवारी आणली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचेही कडवे आव्हान आहे. भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की, राष्ट्रवादीच्या विद्या लोळगे यांच्यासह इतरांची गर्दी आहे. या मतदारसंघात कामगार, कष्टकऱ्यांसह मुस्लीम, पद्मशाली, मोची आदी समाजांचा प्रभाव आहे. मुस्लीम मतांवर निकाल अवलंबून आहे.
सोलापूर शहर उत्तर
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजय देशमुख हे तिसऱ्यांदा निवडून जाण्यासाठी सज्ज झाले असतानाच त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत ११ नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे देशमुख यांची अडचण झाली आहे. काँग्रेसकडून माजी आमदार विश्वनाथ चाकोते हे भवितव्य आजमावत आहेत. भाजपचे देशमुख व काँग्रेसचे चाकोते हे दोघेही लिंगायत समाजाचे आहेत. येथे २५ वर्षे लिंगायत समाजाकडेच आमदारकी आहे. राष्ट्रवादीअंतर्गत साठमारी होऊन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी उमेदवारी मिळविली आहे. सेनेकडून माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे हे रिंगणात आहेत.
अक्कलकोट
भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यातील तुल्यबळ लढतीत मनसेचे फारुख शाब्दी, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, शिवसेनेचे मनोज पवार यांच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली आहे. येथे लिंगायत, मुस्लीम व दलित समाजाचा प्रभाव असून, यात शाब्दी यांच्यामुळे काँग्रेसची अडचण होऊ शकते. गेल्या निवडणुकीत खूनखराब्याच्या राजकारणामुळे अक्कलकोट गाजले होते. पाटील व म्हेत्रे दोघे साखर कारखानदार व एकमेकास तोडीस तोड ठरल्यामुळे लढत लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसला शून्यातून मतांची उभारणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
पंढरपूर-मंगळवेढा
राष्ट्रवादीचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत उमेदवारी आणली आहे. त्यांची लढाई काँग्रेसमध्ये आलेले आमदार भारत भालके यांच्या विरोधात आहे. दोघेही साखर कारखानदार आहेत. मंगळवेढय़ाचे समाधान अवताडे यांनीही शिवसेनेतून उमेदवारी आणली आहे. राष्ट्रवादीचे चंद्रकांत बागल, मनसेचे जयंवत माने यांचेही आव्हान आहे. यात मोहिते-पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. परिचारक हे मोहिते-पाटील गटाच्या ‘रडार’वर असल्याने त्याचा लाभ भालके यांना कसा मिळणार, हे औत्सुक्याचे.
सोलापूर दक्षिण
सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब शेळके, मनसेचे युवराज चुंबळकर, कर्नाटकातील इंडीचे अपक्ष माजी आमदार रवी पाटील हे उभे आहेत. आमदार माने व सुभाष देशमुख हे दोघे मराठा समाजाचे व साखर कारखानदार आहेत. सेनेचे वानकर हेसुद्धा मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जातीपातीची गणिते मांडली जात आहेत. दक्षिण सोलापूरसह उत्तर सोलापूरचा काही भाग तसेच शहर हद्दवाढ भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात खरी लढत माने व देशमुख यांच्यातच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. बाळासाहेब शेळके व  रवी पाटील हे परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ल्लमोहोळ राखीव
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना मोहोळमधून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारून रमेश कदम यांना संधी दिली आहे. कदम यांचा अर्ज भरताना सोबत केलेले प्रा. ढोबळे यांनी नंतर बंडाचे निशाण फडकावले. भाजपचे संजय क्षीरसागर यांनी विजयासाठी मोठी ताकद पणाला लावली आहे. सेनेचे मनोज शेजवाल, काँग्रेसचे गौरव खरात यांच्यासह अनेक उमेदवारांनी भाऊगर्दी केली आहे. कदम यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांना प्रतिष्ठा राखावी लागणार आहे.