एकीकडे राज्यात भाजप सरकारमध्ये सहभागी होणार की विरोधी पक्षात बसणार याबाबत तळ्यात- मळ्यात असलेल्या शिवसेनेने विधानसभेत मंगळवारी सरकारविरोधात उघडउघड दंड थोपटले. सोमवारी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलेल्या शिवसेनेने आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करावी आणि जय विदर्भाचा नारा देणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत थेट विरोधी पक्षाच्या भूमिकेतून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेत पहिली ठिणगीही पडली. सेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादीबरोबरच अध्यक्षांनीही पाठिंबा दिला आणि अखंड महाराराष्ट्राच्या सभागृहात जय विदर्भाचे फुटीरवादी भाष्य करण्यास हंगामी अध्यक्षांनी मज्जाव केला.
विधानसभेत सकाळी कामकाजाला सुरुवात होताच शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी अनेक सदस्यांचा अजून शपथविधी झालेला नसतानाच विधानमंडळ सचिवालयाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नियमानुसार सर्व सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतरच पुढचे कामकाज होणे अपेक्षित असतानाही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हा सगळा प्रकार लोकशाहीचा गळा घोटणारा असून निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे, तर सेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत याबाबतचा निर्णय होईपर्यंत सभागृह तहकूब करण्याची मागणी लावून धरीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने उपस्थित केलेल्या या हरकतीच्या मुद्दय़ास राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील आणि शेकापचे गणपतराव देशमुख यांनीही पाठिंबा दिला. संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच शिवसेना सदस्य मात्र अधिकच आक्रमक झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुद्दय़ाबाबत अध्यक्षांच्या दालनात गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्या, मात्र शपथविधी सुरू असताना सभागृह बंद पाडून नवीन परंपरा सुरू करू नका असा टोला शिवसेनेला मारला. तर तुम्हाला वेळच हवा आहे तर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून घ्या असा शिवसेनेवर पलटवार केला. यावेळी सेना आणि फडणवीस यांच्यात प्रथमच आमने-सामने शाब्दिक चकमक झडली. अखेर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवत अध्यक्ष गावीत यांनी या वादावर पडदा टाकला.

विदर्भवाद्यांना तंबी
विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना सोमवारी विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भ’चे नारे दिले होते. त्यावर ही विधानसभा महाराष्ट्राची आहे. अखंड महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा जयघोष न करता विदर्भाचा जयजयकार करणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. हा राज्यद्रोह आहे. त्यामुळे  सभागृहात जय विदर्भाचा नारा देणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. आजही शपथविधी सुरू झाल्यानंतर आशीष देशमुख यांनी जय विदर्भचा नारा दिला. त्यास शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. मग अध्यक्ष गावीत यांनीही शिवसेनेच्या भूमिकेशी सहमती दर्शवीत काल ज्या सदस्यांनी जय विदर्भाचा नारा दिला ते कामकाजातून काढून टाकण्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्राच्या सभागृहात फुटीरवादी भाष्य करू नका असे सांगत जय विदर्भच्या घोषणा देण्यास मज्जाव केला. एवढेच नव्हे तर सभागृहात अशी घोषणा देणाऱ्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र नंतर हा निर्णय मागे घेतला.

Wardha, sea islands, Shailesh Aggarwal,
वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप