अकाली दल-भाजप यांची युती कायम टिकणारी आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या घडामोडींची तुलना करणे योग्य नाही असे मत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केले. राज्यात जागावाटपावरून भाजपचे शिवसेनेशी संबंध ताणले असतानाच अकाली दल-भाजप संबंधाबाबत विचारले असताना बादल यांनी हे स्पष्टीकरण दिले.
दोन्ही पक्ष एकमेकांना वेगळे समजत नाहीत, लोकशाहीत आमची मैत्री वैशिष्टय़पूर्ण आहे असा दावा बादल यांनी केला. गेल्या काही दशकांत काही तणावाचे प्रसंग आले मात्र त्यातून प्रत्येक कसोटीत आम्ही यशस्वी झालो, असे बादल यांनी सांगितले. आमची आघाडी भक्कम आहे. त्यावर आक्षेप घेणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे, असा टोला बादल यांनी लगावला. महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीचा संबंध अकाली दलाशी जोडू नका, असे आवाहन बादल यांनी केले. पंजाबला अकाली दल-भाजप युतीने विकासाच्या मार्गावर नेल्याचा दावाही बादल यांनी केला.