कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख सांगणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आघाडीला पराभवाचा स्वीकारावा लागल्याने बालेकिल्ल्यास तडे गेले आहेत. लोकसभेतील यशावर महायुती समीकरण तयार करत असली तरी विधानसभा निवडणुकीतील बदलत्या परिस्थितीमुळे आघाडीचे त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे. काही जागांवर बंडखोरीचा उपद्रव युती व आघाडीला सहन करावा लागण्याची परिस्थिती आहे.
या लोकसभा मतदारसंघात सेना व भाजपचे प्रत्येकी दोन तर, लोकसंग्राम आणि तिसरा महाजचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे एकही जागा नसल्याने कागदावर तरी युतीचे वर्चस्व दिसते. अलीकडेच तिसरा महाजचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांना राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचल्याने मालेगाव मध्य मतदारसंघातील दावेदारीवरून आघाडीतच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. शेजारील मालेगाव बा’ा मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे संकट उभे राहू शकते.
धुळे शहर
युतीच्या जागा वाटपात कायम शिवसेनेकडे असूनही आजपर्यंत एकदाही विजय मिळवता न आलेला मतदारसंघ. युतीच्या जागा वाटपात कळीच्या बनलेल्या कायम पराभूत जागांमध्ये या मतदारसंघाचाही समावेश आहे. सेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे व राष्ट्रवादीतून अलीकडेच आलेले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले हे इच्छूक आहेत. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मालेगाव बाह्य़
प्रथम शिवसेनेची मदत मिळून अपक्ष आणि नंतर शिवसेनेकडून आमदार झालेले दादा भुसे यांच्याशिवाय सेनेला या मतदारसंघात पर्याय नाही.राष्ट्रवादीकडून राजेंद्र भोसले व ऐनवेळी दाखल झालेले सुनील गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्यातील कोणा एकाला उमेदवारी मिळाल्यास बंडखोरीची शक्यता आहे. जनराज्य आघाडीचे प्रमुख अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी शिवसेनेच्या कोटय़ातील ही जागा असल्याने भाजपची अडचण झाली आहे. मनसेकडून संदीप पाटील हे इच्छुक आहेत.
धुळे ग्रामीण
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील यांना पराभूत केले होते. तेव्हापासून रोहिदास पाटील यांनी वर्चस्वाची लढाई सुरू केली आहे. दरम्यानच्या काळात त्यांचे आप्तगण सेना व भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाल्याने त्यांची कोंडी झाली. या स्थितीत ते स्वत: मैदानात उतरणार की पुत्र कुणालला रिंगणात उतरविणार याची स्पष्टता झालेली नाही. त्यातच, मनोहर भदाणे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून काँग्रेसपुढील अडचणी वाढविल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने या जागेवर दावा सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मताधिक्य या मतदारसंघातून मिळाल्याने त्याचा लाभ उठविण्याचा सेनेचा प्रयत्न आहे.
बागलाण
गतवेळी निसटता विजय मिळविणारे भाजपचे उमाजी बोरसे हे पुन्हा इच्छुक आहेत. माजी आमदार दिलीप बोरसे यांनी शेतकरी संघटनेकडून येथून एकदा विजय मिळविला असल्याने महायुतीकडून उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या कोटय़ातील या जागेवर राष्ट्रवादीकडून माजी आमदार संजय चव्हाण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. जात प्रमाणपत्राचा मुद्दा ही चव्हाण यांच्यासाठी उमेदवारीच्या वाटेवरील अडचण मानली जात आहे.
शिंदखेडा-दोंडाईचा
भाजपचे जयकुमार रावल यांनी मागील निवडणुकीत खान्देशातून सर्वाधिक मताधिक्य मिळवले होते. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांच्यासमोर कोण उमेदवार राहणार, याची स्पष्टता झालेली नाही. शासकीय अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले संदीप बेडसे यांचे नांव चर्चेत आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आहे. गतवेळी पराभूत झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हे काँग्रेसकडून पुन्हा इच्छूक आहेत.
मालेगाव मध्य
जनसुराज्य पक्षातर्फे विजयी झालेले ‘तिसरा महाज’चे प्रमुख मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ही जागा खेचून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेससाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसतर्फे माजी आमदार शेख रशिद यांचे पुत्र आसीफ शेख हे इच्छूक आहेत. राष्ट्रवादीकडून माजी महापौर मलीक युनुस ईसा यांचे नाव चर्चेत आहे. मालेगावचे माजी आमदार धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते निहाल अहमद यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.