शिवसेना-भाजपमधील २५ वर्षांची युती कुणामुळे तुटली, यावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच, ‘शिवसेनेसोबतच्या युतीला कार्यकर्ते कंटाळले होते. त्यामुळे आम्ही युती तोडणारच होतो,’ असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी सोमवारी म्हटले. महाराष्ट्रात आलेल्या मोदी सुनामीत शिवसेनेसह सर्व पक्ष वाहून जातील, असेही ते नगर जिल्ह्यातील जाहीर सभेत म्हणाले.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सोमवारी घेतलेल्या सभेत रुडी यांनी युती तुटण्याची कारणे जनतेसमोर मांडली. ‘भाजपला राज्यात १३० पेक्षा कमी जागा नको होत्या. हे युती तुटण्याचे मुख्य कारण आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते राज्यातील शिवसेनेच्या युतीला कंटाळले होते. अमित शहा यांनी ते नेमकेपणाने ओळखले होते. त्यामुळे आम्ही युती तोडणारच होतो,’ असे ते म्हणाले. शहा यांनीच आता भाजपचे कार्यकर्ते व मतदारांना स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याची संधी दिली आहे.
आता सर्व चॅनल्सनी व वृत्तपत्रांनी राज्यात भाजपचे सरकार येणार हे सांगितले आहे. ‘शिवसेनेवर आरोप करणार नाही’ असे म्हणत त्यांनी मतदारांना काय हवे हे आता तरी ओळखा, असे आवाहन केले. दिल्लीवरून निघालेली भगवी राजधानी एक्स्प्रेस मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, छत्तीसगढ घेत अता महाराष्ट्रात सुसाट येत आहे, असे ते म्हणाले.