विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनेला तिसरा राजकीय पर्याय देण्याच्या नावाने विविध पक्ष-संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन समित्या, आघाडय़ांची स्थापना केली आहे. आता रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे, शिवराज्य पक्षाचे सुधीर सावंत, निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत, बी.जी. कोळसे-पाटील यांच्या पुढाकाराने आणखी एक राजकीय आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुधवारी  या नव्या आघाडीची घोषणा होणार आहे.
मुंबईत या संदर्भात आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला हनुमंत उपरे, कोळसे-पाटील, सुधीर सावंत व अन्य काही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ३ सप्टेंबरला मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे. त्यात अन्य काही परिवर्तनवादी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत आघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती हनुमंत उपरे यांनी दिली.