ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना उपनेते अनंत तरे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी बाद केला. निवडणूक अर्जासोबत एबी फॉर्म न जोडल्यामुळे तरे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून भाजपचे संदीप लेले हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. तरे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे एकप्रकारे ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बंड तांत्रिक कारणांमुळे थंडावले.
अनंत तरे हे शिवसेनेमध्ये बरीच वर्षे होते. पण अचानकपणे ते शनिवारी भाजपच्या तंबूत दाखल झाले. या मतदारसंघातून संदीप लेले यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर या हालचाली झाल्या आणि तरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर तरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यासोबत एबी फॉर्म जोडला नव्हता. याच मुद्दयावरून त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.