राजकीय नेते आणि बाबा-बुवा यांची ‘युती’ महाराष्ट्राला काही नवीन नाही. निवडणुकीच्या काळात बरेच नेते आशीर्वादासाठी या बाबा-बुवांच्या आश्रयाला जातात. राजकारणाशी संबंधित असलेल्या या राजकीय ‘महाराजां’विषयी..
लोकसभेची निवडणूक सुरू व्हायची होती. काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करायचे असेल तर काय करावे, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांसमोर होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कळविण्यात आले की, बाबाजींची आवर्जून भेट झाली की, सारे काही नीट होईल.. कोण हे बाबाजी?  
प्रसिद्ध वेरुळ लेण्यांच्या पायथ्याशी ‘बाबाजीं’चे मोठे प्रस्थ आहे. गंडेदोरे आणि बुवा-बाबांच्या मागे फिरणारे लोक असतात, तेव्हा श्रद्धा-अंधश्रद्धांचे चर्वण अधूनमधून होत असते; परंतु बाबाजींच्या मागे धावणाऱ्या व्यक्ती नेते असतील तर? तेव्हा मात्र त्यांच्या अंधश्रद्धाही कमालीच्या श्रद्ध होतात. औरंगाबादच्या नेत्यांना गंडा-दोऱ्यांचा भारी नाद. मनगट दोरे बांधले जातात, बुवा-बाबांना आवर्जून बोलावले जाते, मान-सन्मान केला जातो. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्यांनी वेरुळच्या आश्रमात चार-पाच चकरा मारल्या. कधी मोहन प्रकाश गेले, तर कधी पालकमंत्री. नेत्यांच्या या चकरा शांतीगिरी महाराजांच्या मतदानात दडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भगवे कपडे परिधान करून २००९ मध्ये त्यांनी मिळवलेली मते १ लाख ४८ हजार २६ होती. प्रमुख उमेदवारांमध्ये त्यांना तिसऱ्या क्रमांकाची २०.२४ टक्के मते मिळाली होती. एवढी मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली तर विजय सहज पदरी पडेल, असे प्रत्येकाला वाटत होते. निवडणुकीत स्वत: न उभे राहता केवळ ‘आशीर्वादा’चा हात डोक्यावर ठेवला तरी चालेल, यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी जंगजंग पछाडले; पण संत आणि बाबांचे आशीर्वाद आपल्याच बाजूने वळविण्यासाठी मोठी कसरत झाली. एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने ‘मध्यस्थी’ केली. तेव्हा बाबाजी अचानक म्हणाले, ‘‘मांस-मच्छी खाणाऱ्या आणि दारू न पिणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा असेल.’’ मोठी गंमत झाली. मग निवडणुकीच्या रिंगणातील प्रत्येक माणूस मी कसा शाकाहारी, हे सांगण्याचा प्रयत्न करीत राहिला. यात काँग्रेसचे नेते आघाडीवर होतेच; पण मी तर काहीच करीत नाही, असे स्वत:ला राष्ट्रीय म्हणवून घेणारे नेतेही सांगत होते. मोदी लाटेत बाबाजींचा प्रभाव दिसलाच नाही आणि विधानसभा निवडणुकीत बाबाजींच्या आशीर्वादासाठी सुरू असणारा नेत्यांचा राबता आता थोडासा कमी झाला आहे म्हणे; पण अगदी नेते जातच नाहीत, असे होत नाही. नुकतेच पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी करणाऱ्या एका नेत्याने शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. नेता आला की महाराज आशीर्वाद कसे देतात, हे सांगण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना बोलावले जाते. नेता व महाराज यांची छबी एकत्रित यावी, असेही प्रयत्न केले जातात.
शांतीगिरी ओघवत्या शैलीत बोलतात किंवा आध्यात्मिक पातळीवरही त्यांनी नवीन विचार दिले आहेत, असे नाही. तरीही त्यांना मानणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे. लोकसभेची २००९ ची निवडणूक ते लढवत होते, तेव्हा त्यांनी शपथपत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर नाशिक, औरंगाबाद आणि वेरुळ परिसरातील तब्बल ४० गावांमध्ये ७५ हेक्टर ६ आर जमीन असल्याची नोंद आहे. २००९ मध्ये त्याचे बाजारमूल्य ६३ लाख ८३ हजार ५०० रुपये नोंदविले गेले होते.