सत्तेच्या भागीदारीसाठी शिवसेनेसोबतच्या चर्चेतील फलिताची वाट न पाहता हाती असलेल्या संख्याबळाच्या जोरावर लवकरात लवकर सत्ताग्रहण करण्याचा विचार भाजपमध्ये बळावत असून लक्ष्मीपूजनानंतरच्या कोणत्याही मुहूर्तावर मुंबईत शानदार शपथविधी सोहळा घडविण्यासाठी राज्याची प्रशासन यंत्रणाही वेगवान झाली आहे. शपथग्रहणानंतर राज्यात सरकार कार्यान्वित करून पुन्हा बहुमताची जुळवाजुळव करण्याच्या हालचालींना वेग दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत. मोदी करिष्म्यात न्हाऊन निघालेला भाजप सत्तेच्या अभिषेकासाठी सज्ज झाला असून यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दिवाळीसारखा शुभमुहूर्त नाही, असा सूरही भाजपमध्ये आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी राज्यभरातून दाखल झालेल्या विजयवीरांच्या साक्षीने जोरदार जल्लोष साजरा होत असतानाच, राज्याची प्रशासन यंत्रणा शपथविधीच्या तयारीला लागली होती. या समारंभाचे साक्षीदार होण्यास उत्सुक असलेल्या भाजपच्या चाहत्यांची राज्यभरातून होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शपथविधी सोहळ्यासाठी योग्य स्थळाची शोधमोहीम सुरू असून नव्या सरकारच्या कामाची दिशा स्पष्ट करणारे राज्यपालांचे अभिभाषणही आकारास येत असल्याचे समजते.
बहुमताची जुळवाजुळव सुरू
बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप विविध पर्याय तपासून पाहात आहे. ताठर भूमिका न घेतल्यास शिवसेनेबरोबर, अन्यथा अपक्षांची मदत घेऊन किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा पर्यायही अजमावला जात आहे. – सविस्तर.. सत्ताबाजार

उद्धव यांची नरमाईची भूमिका
* सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने युतीच्या चर्चेला आकार येण्याची चिन्हे स्पष्ट होताच भाजपचा उत्साह दुणावला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालेल्या या यशाच्या साक्षीनेच भाजपची यंदाची दिवाळी साजरी होईल, असे चित्र दिसू लागले आहे.
* मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मात्र योग्य तो सन्मान
मिळाल्यास युतीबाबत विचार करता येईल असा सकारात्मक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
* अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून सन्मानजनक प्रस्ताव भाजपकडून आल्यास पाठिंब्याचा विचार करता येईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
* ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची
शिवसेनाभवनात बैठक घेतली. यावेळी निवडणुकीतील यशापशयाची चर्चा झाली.  शिवसेनेच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्याचे अधिकार ठाकरे यांना देण्याचा निर्णय आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला.